महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
ग्रामीण भागातील नऊ हजार पोस्टर्स, बॅनर्स हटवले- डॉ. अभिजीत चौधरी गुरुवार, १४ मार्च, २०१९

सांगली : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार सांगली जिल्ह्यातील ग्रामीण भागातील 9 हजार 51 तर शहरी भागातील 397 फलक, पोस्टर्स, बॅनर्स हटवले असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहितेचा भंग होणार नाही, या दृष्टीने आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येत असल्याचे सांगून डॉ. चौधरी म्हणाले, भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार सर्व शासकीय कार्यालये आणि कँपसमधील सर्व शासकीय इमारती तसेच बसस्थानक, रेल्वेस्थानक आदि सार्वजनिक जागा अशा शासकीय संपत्तीच्या भिंतीवरील लेखन, पोस्टर्स, पेपर्स किंवा कटआऊट, होर्डिंग्ज, बॅनर्स, झेंडे इत्यादि निवडणुका जाहीर झाल्यानंतर त्वरित काढून टाकण्याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश आहेत. त्यानुसार सांगली जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शासकीय इमारतीवरील 2 हजार 57, सार्वजनिक ठिकाणी असलेली 5 हजार 370 आणि खाजगी ठिकाणी असलेले 1 हजार 624 लहान-मोठे फलक, पोस्टर्स, बॅनर्स काढून घेण्यात आले आहेत. तसेच, सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्रात भिंतीवर रंगवलेले दीडशे, बॅनर्स, फलक 133, झेंडे 199 आणि बाकांवर रंगवलेल्या 15 जाहिराती हटवण्यात आल्या आहेत.

भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार निवडणूक जाहीर झाल्यापासून 24 तासामध्ये राजकीय पक्ष, उमेदवार किंवा अन्य निवडणुकांचा प्रचार व प्रसार अथवा निवडणुकीसंबंधी कामकाजासाठी शासकीय वाहनाचा उपयोग करण्यासाठी संपूर्ण बंदी करण्याबाबत कार्यवाही करण्याच्या सूचना आहेत. त्या दृष्टीने सांगली शहरातील 30 वाहने अधिग्रहित करण्यात आली आहेत. तसेच, तालुकास्तरावरही ही कार्यवाही करण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले.

स्थिर सर्वेक्षण पथके, भरारी पथके, आदिंची स्थापना करण्यात आली असून, त्यांनी कामकाज सुरू केले आहे. उत्पादन शुल्क विभागाचीही पथके तयार करण्यात आली आहेत. आचारसंहिता भंगाच्या तक्रारी दाखल करण्यासाठी सीव्हिजील ॲप सुरू करण्यात आले आहे. सुविधा ॲपद्वारे सर्व परवानग्या ऑनलाईन देण्यात येणार आहेत. तसेच, एक खिडकी योजनाही कार्यान्वित करण्यात आली असून, त्या ठिकाणी विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी असणार आहेत, असेही डॉ. चौधरी यांनी सांगितले.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा