महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
जळगावच्या केळीची गोडी वाढतेय सातासमुद्रापार... मंगळवार, १३ मार्च, २०१८
विशेष लेख :

जळगाव जिल्हा हा राज्यात सर्वाधिक केळी पिकवणारा जिल्हा मानला जातो. एक वेगळीच गोडी असलेल्या या केळीला आतापर्यंत देशभरातून मोठ्या प्रमाणावर मागणी होती. मात्र आता कोल्हापूरच्या संजीवनी ॲग्रो या शेतकरी सदस्य असलेल्या सोसायटीच्या माध्यमातून गेल्या तीन वर्षांपासून केळीची यशस्वी निर्यात होऊ लागली आहे. यंदा आठ हजार टन केळीचे उद्दिष्ट ठेवले गेले आहे. तर जिल्ह्यातून यंदा बारा हजार टनाहून अधिक केळी निर्यात होण्याचे संकेत मिळत आहेत.


जळगाव जिल्ह्यात आज 45 हजार हेक्टरमध्ये केळीचे उत्पादन घेतले जाते. येथील हवामान-माती यांचा परिणाम म्हणून या केळीची एक वेगळीच चव, गोडी अनुभवाला येत आहे. याच्या वेगळेपणाने आज जळगावच्या केळीला काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत देशभर मागणी आहे. देशभर जाणारी ही केळी परदेशात जावी म्हणून प्रयत्न झाले पण परदेशात निर्यात केली गेलेली केळी ही त्यावर पडणाऱ्‍या डागांमुळे नाकारली गेली होती. सर्व केळी समुद्रात फेकून देण्याची वेळ केळी उत्पादकांवर आली होती. हे पाहता केळी निर्यात करण्याचे आव्हान येथील केळी उत्पादकांसमोर होते. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील केवळ शेतकऱ्‍यांसाठी काम करणारी संजीवनी ॲग्रो ही संस्था केवळ केळी पिकाबाबत काम करते. तेथील केळीची निर्यात देखील करते. या संस्थेचे कार्यकारी संचालक बाबासाहेब आडमुठे यांनी या संस्थेचे एक संचालक प्रमोद चौगुले यांना जळगाव हा केळी उत्पादक जिल्हा असतांना केळी निर्यात का होत नाहीत याबाबत अभ्यास करण्यास सांगितले. चार वर्षांपूर्वी प्रमोद चौगुले यांनी जिल्ह्यात येऊन केळी उत्पादकांना भेटून अभ्यास केला. पूर्वी चार वेळा केळी निर्यात केली गेली असता केळीवर पडणाऱ्‍या डागांमुळे केळी नाकारली गेल्याचे लक्षात आले. या कारणाचा चौगुले यांनी शोध घेतला असता बागेत केळीची तोड केल्यानंतर केळीची अयोग्य हाताळणी, वाहतुकी दरम्यान केळी एकमेकांवर घासली गेल्याने डाग पडत असल्याचे त्यांच्या लक्षात आले.

यावर कोल्हापूरच्या संजीवनी ॲग्रोने जळगावच्या शेतकऱ्‍यांना निर्यातीबाबत प्रशिक्षित करण्याचे ठरवून ती जबाबदारी प्रमोद चौगुले यांच्यावर सोपवली. जळगाव जिल्ह्यात टिश्यु कल्चर पद्धतीने तयार केलेली केळीची रोपे लावण्यास तेव्हा प्रारंभ झाला होता. चौगुले यांनी टिश्यु कल्चर असलेली केळी बाग निवडून खोडाला लागलेल्या घडांपैकी आठ ते नऊ घड ठेवून खालचे घड कापून टाकले. तयार केळी कापल्यावर बागेतच त्याचे पॅकींग करण्यात येऊन केळी निर्यातीसाठी पाठवली गेली असता ती केळी नाकारली गेली नाहीत. परिणामत: 2015-16 यावर्षात 120 कंटेनर म्हणजेच 2400 टन केळी इराण, इराक, दुबईला रवाना झाली. केळी उत्पादकांना चांगला भाव मिळाला. यातून आपण निर्यातक्षम केळी उत्पादन करू शकतो. हा आत्मविश्वास निर्माण होऊन रावेर तालुक्यातील तांदलवाडी परिसरातील शेतकऱ्‍यांनी अकरा लाख केळीची खोडे लावली.

शेतकऱ्‍यांना मदत करण्यासाठी कोल्हापूरच्या संजीवनी ॲग्रोने रावेर तालुक्यात गाते शिवारात एकदंत ॲग्रो ही संस्था स्थापन केली. आणि प्रमोद चौगुले यांना केळी उत्पादकांना सातत्याने मार्गदर्शन करण्यासाठी जिल्ह्यात थांबण्यास सांगितले. जळगाव जिल्ह्यातील शेतकरी हा अत्यंत मेहनती, प्रयोगशील असल्याने एकदंतला चांगला प्रतिसाद मिळू लागला. चौगुले हे शेतकऱ्‍यांच्या शेतावर जाऊन मार्गदर्शन करू लागले. केळीचे पॅकींग हे बागेतच होऊ लागले. याचा चांगला परिणाम दिसून आला. दुसऱ्‍या वर्षी 310 कंटेनर 6200 टन केळीची निर्यात झाली. निर्यातीसाठी केळी निवडल्यानंतर निर्यातक्षम नसलेल्या केळीवर प्रक्रिया होऊन बाय प्रॉडक्ट तयार होऊ लागले. यंदा चोपडा, यावल, रावेर तालुक्यातील शेतकऱ्‍यांनी 14 लाख टिश्यु कल्चरची रोपे लावली असून जिल्ह्यातून चारशे कंटेनर केळी एकदंतमार्फत निर्यातीचा संकल्प असल्याचे प्रमोद चौगुले यांनी सांगितले. निर्यातीचे तंत्र, मंत्र जाणल्यानंतर सोलापूर मुंबईचे व्यापारी जिल्ह्यात धडकले असून त्यांनी देखील केळी निर्यातीत रस दाखवला आहे. यामुळे यंदा जिल्ह्यातून केळीची निर्यात ही बारा हजार टनांवर जाईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

कृषी विभागाचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, कृषी उपसंचालक अनिल भोकरे यांचे वेळोवेळी चांगले सहकार्य मिळत असल्याचे प्रमोद चौगुले सांगतात. जिल्ह्याचा कृषी विभाग जिल्ह्यातून भाजीपाला केळी व अन्य फळांच्या निर्यातीसाठी शेतकऱ्‍यांना मार्गदर्शन व प्रोत्साहन देत आहे. जिल्ह्यातून केळी बरोबरच डाळींब, भेंडीची देखील मोठ्या प्रमाणावर निर्यात होत आहे. एरंडोल, धरणगाव येथील शेतकरी निर्यातक्षम भेंडीचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर करीत असून यंदा आता पर्यंत या दोन तालुक्यातून तीस टन भेंडीची निर्यात झालेली आहे. तर खाजगी व्यापाऱ्‍यांमार्फत डाळींबाची निर्यात होत आहे. योग्य मार्गदर्शन व कृषी विभागाचे पाठबळ यामुळे जळगाव जिल्हा हा केळी व अन्य पिके निर्यातीच्या बाबतीत जागतिक नकाशावर आलेला आहे.

- विजय पाठक
जेष्ठ पत्रकार, जळगाव. मो. ९३७३३६७३७४
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा