महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
नळदुर्ग किल्ल्याचे पर्यटकांना आकर्षण बुधवार, ०६ डिसेंबर, २०१७
विशेष लेख :

मुंबई-हैद्राबाद या राष्ट्रीय महामार्गावरील उस्मानाबाद जिल्ह्यातील नळदुर्ग येथील ऐतिहासिक किल्ल्याचे रुपडे सध्या पालटले असून, या किल्ल्याचे संगोपन व संवर्धन करीत असताना या किल्ल्याला पंचतारांकित रूप देण्यात आले असल्याने हा किल्ला सध्या पर्यटकांना आकर्षित करीत आहे. या किल्ल्याच्या सर्वांगीण विकासासाठी व हे केंद्र देशभरातील पर्यटकांचे आकर्षण केंद्र बनावे यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत.

महाराष्ट्र वैभव राज्य संरक्षित स्मारक योजनेअंतर्गत सोलापूरच्या युनिटी मल्टिकॉन्स या डेव्हलपर्स कंपनीच्या माध्यमातून सामंजस्य करारानुसार सध्या या किल्ल्याच्या संगोपनाचे काम सुरू आहे. 26 ऑगस्ट 2014 रोजी या कंपनीने येथील सुशोभिकरणाचे काम हाती घेतले. आणि अवघ्या तीन वर्षांच्या कालावधीत नष्ट होण्याच्या मार्गावर असलेल्या या किल्ल्याचे रुपडेच पार पालटून टाकले आहे. आता या किल्ल्यात पर्यटकांचा ओघ दिवसेंदिवस वाढतच चालला आहे.

नळदुर्ग किल्ल्याच्या सुशोभिकरणामुळे सध्या नळदुर्ग शहराच्या विकासालाही चालना मिळणार आहे. त्यामुळे येथील उद्योगाची भरभराट होणार आहे. आता या किल्ल्यात ऐतिहासिक ठेव्याबरोबरच पर्यटकांना अन्य मनोरंजनाची साधने उपलब्ध करून दिली आहेत. क्रीडा प्रकाराला प्रोत्साहन
साहसी क्रीडा प्रकाराच्या माध्यमातून आत्मनिर्भर होण्यासाठीचे विविध उपक्रम येथे सुरू करण्यात येणार आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील सर्वात मोठी 600 मीटर लांबीची अशी उपळी बुरुज ते परांडा बुरुज झिपलाइन वायररोबचा समावेश आहे. याशिवाय बोटिंग, रायफल शूटिंग, रोप क्लायबिंग, पराग्लायडिंग, चक्रव्यूह, आर्चरी, लहानासाठी एटीव्हीट्रॅक, गिर्यारोहण, स्विमिंग आदी साहसी खेळांचा समावेश आहे.

येथील नर-मादी धबधबा हा पावसाळ्यात नैसर्गिकरित्या चालू असतो. यावेळी येथे पर्यटकांची मोठी गर्दी असते. हीच बाब लक्षात घेऊन या कंपनीने हा धबधबा सुट्टीच्या दिवशी व अन्य दिवशी ठराविक वेळी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करीत चालविण्याचे नियोजन केले आहे. यासाठी आवश्यक असणारे 2 कोटी लिटर साठवण क्षमतेचे दोन साठवण तलाव तयार केले आहेत.

किल्ल्यात बोटिंगसह गोल्फकार्ट कार

येथे पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी बोटिंगची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी किल्ल्यातील नदीपात्राचे खोलीकरण व रुंदीकरण करण्यात आले असून, या पात्रात जलसाठा करून येथे बोटिंगची व्यवस्था करण्यात आली आहे. या किल्ल्याचा परिसर सुमारे 125 एकर इतका आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना या किल्ल्यात फेरफटका मारण्यासाठी गोल्फकार्ट कारची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

- मोतीचंद बेदमुथा
ज्येष्ठ पत्रकार, उस्मानाबाद.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा