महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
राष्ट्रीय महामार्ग,रेल्वे भूसंपादन संदर्भात अडचणी दूर करा - पालकमंत्री येरावार बुधवार, १३ सप्टेंबर, २०१७
यवतमाळ : जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग आणि वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे प्रकल्प राज्य शासनाच्या प्राधान्यक्रमावरील विषय आहेत. या दोन्ही संदर्भात जमिनीचे भुसंपादन आणि नागरिकांना मिळणारा मोबदला याबाबत काही अडचणी असल्यास त्या त्वरीत दूर करा, अशा सुचना पालकमंत्री मदन येरावार यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रीय महामार्ग व रेल्वे भुसंपादनाबाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, उपजिल्हाधिकारी (भुसंपादन) चंद्रकांत जाजू, उपविभागीय अधिकारी स्वप्नील तांगडे, अपार, नितीनकुमार हिंगोले, श्री. कापडनीस उपस्थित होते.

वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे मार्ग सुरूवातीला 625 कोटी रुपयांचा होता. वर्षानुवर्षे रखडलेल्या या प्रकल्पाची किंमत आता 2500 कोटींवर गेली आहे. मात्र राज्यात नवीन सरकार आल्यानंतर राज्य सरकारने आपल्या हिश्याची 40 टक्के रक्कम म्हणजे 1 हजार कोटी रुपये या प्रकल्पासाठी त्वरीत उपलब्ध करून दिले आहे. जिल्ह्यातून दोन राष्ट्रीय महामार्ग आणि रेल्वे जात आहे. यवतमाळच्या विकासासाठी ही सुवर्ण संधी आहे. त्यामुळे अडलेल्या गोष्टीवर त्वरीत तोडगा काढून त्या निकाली काढाव्यात. दोन्ही प्रकल्पासाठी भुसंपादनाचे दिलेले उद्दिष्ट गाठण्यासाठी अधिकाऱ्यांनी विशेष लक्ष द्यावे. प्रशासनाने हे दोन्ही प्रकल्प मिशन मोडवर घेऊन कामाची प्रगती काय आहे, यासंदर्भात आठवड्यातून एकदा त्याचा आढावा घ्यावा, अशा सूचना पालकमंत्री श्री. येरावार यांनी दिल्या.

यावेळी त्यांनी घोषित झालेल्या जमिनीबाबतची गावनिहाय माहिती, जमीन मोजणीविषयक सद्यस्थिती, ठराविक वेळेत कराव्या लागणाऱ्या कामाचे नियोजन यांच्यासह कर्जमाफीसाठी नोंदणी, आधार लिंकिंग आदी बाबींचा आढावा घेतला. बैठकीला उपविभागीय अधिकारी, रेल्वेचे अधिकारी आदी उपस्थित होते.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा