महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
बीड जिल्ह्यातील पाच तालुक्यात केंद्रीय पथकाद्वारे पीक नुकसानीची पाहणी शनिवार, २३ नोव्हेंबर, २०१९

बीड : राज्यात अवेळी झालेल्या पावसामुळे शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या पावसाने खरीप हंगामातील पीक हातचे गेले. त्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करुन केंद्र शासनाला अहवाल सादर करण्यासाठी केंद्रीय कृषि विभागाच्या पाहणी पथकाने आज बीड जिल्ह्यातील पाच तालुक्यातील जवळपास 15 शेतकऱ्यांच्या शेतात प्रत्यक्ष भेट देऊन पिकांच्या नुकसानीची पाहणी केली व शेतकऱ्यांशी संवाद साधून परिस्थितीचा आढावा घेतला.

या पाहणी पथकाचे प्रमुख केंद्र शासनाचे अतिरीक्त सचिव व्ही. थिरुप्पुगाझ व सदस्य डॉ. के. मनोहरण यांनी हा आढावा घेतला. यावेळी आमदार लक्ष्मण पवार, औरंगाबाद विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर, जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडेय, विभागीय सहसंचालक (कृषी) एस. के. दिवेकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र निकम, उपविभागीय अधिकारी नामदेव टिळेकर, माजलगावच्या उपविभागीय अधिकारी शोभा ठाकूर, माजलगावच्या तहसीलदार प्रतिभा गोरे, वडवणीच्या तहसीलदार व्ही. एस. शेडोळकर आदि उपस्थित होते.

दौऱ्याच्या सकाळच्या सत्रात गेवराई आणि माजलगाव तालुक्यातील विविध शेतकऱ्यांच्या शेतात भेट देऊन पाहणी केली. या केंद्रीय पथकाने गेवराई तालुक्यातील धोंडराई येथे छाया पूजदेकर यांच्या शेतात कापूस, बाग पिंपळगाव येथे विलास कोटंबे यांच्या शेतात बाजरी, रांजणी येथे कुंडलिक जाधव यांच्या शेतात सोयाबीन, जळगाव मांजरा येथे दामोदर इदगे यांच्या शेतात कापूस तसेच, वाहेगाव आमला अरुणा चव्हाण यांच्या कापूस पिकाच्या नुकसानीची पाहणी केली. संबंधित शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या.

त्यानंतर माजलगाव तालुक्यातील माजलगाव येथे शिवाजीराव रांजवण यांच्या शेतात डाळिंब पिकाची पाहणी केली. तसेच, प्रणिता रेवणवार यांच्या सोयाबीन पीक नुकसानीची पाहणी केली. लहामेवाडी येथे अल्लाउद्दीन खाजामिया यांच्या शेतात पाहणी करून संबंधित शेतकऱ्यांशी संवाद साधला.

दौऱ्याच्या दुपारच्या सत्रात धारूर तालुक्यातील तेलगाव येथे उत्तमलाल कासलीवाल यांच्या शेतात सोयाबीन आणि प्रेमलता तोष्णीवाल यांच्या शेतात कापूस पीक नुकसानीची माहिती घेतली.

वडवणी तालुक्यातील पुसरा येथे सोनाबाई व्हावळ यांच्या शेतात बाजरी, मोरवड येथे माऊली शेळके यांच्या शेतात सोयाबीन आणि वडवणी येथे कैलास मुंडे यांच्या कापूस पिकाची पाहणी करून परिस्थितीची माहिती घेतली. बीड तालुक्यातील घाट सावळी येथे महादेव लांडे यांच्या बाजरी आणि जरूड येथे बाबासाहेब कोरडे यांच्या शेतात कापूस पिकाची पाहणी केली.

'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा