महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
शहराच्या सर्वांगीण विकासासाठी लोकसहभाग महत्त्वाचा- गिरीष महाजन रविवार, ०४ नोव्हेंबर, २०१८चाळीसगाव :
आपले शहर स्वच्छ, सुंदर, हिरवेगार होण्यासाठी तसेच शहराच्या सर्वांगीण विकासासाठी लोकसहभाग महत्वाचा असल्याचे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री गिरीष महाजन यांनी केले.

चाळीसगाव नगरपरिषदेच्या शताब्दी महोत्सवाचा शुभारंभ व 346 कोटींच्या विविध विकासकामांचे भूमिपुजनप्रसंगी श्री.महाजन बोलत होते. यावेळी आमदार उन्मेश पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा उज्ज्वलाताई पाटील, जिल्हा परिषदेचे शिक्षण व कृषी सभापती पोपटतात्या भोळे, जिल्हा परिषदेच्या सदस्य मंगलाताई जाधव, पंचायत समितीच्या सभापती स्मितल बोरसे, उपसभापती संजय पाटील, राज्य महिला आयोगाच्या सदस्या देवयानी ठाकरे, नगराध्यक्षा आशालता चव्हाण, उपाध्यक्षा आशाबाई चव्हाण, पारोळा नगरपालिकेचे अध्यक्ष करण पवार, पोलीस निरीक्षक रामेश्वर गाढे पाटील, तहसीलदार कैलास देवरे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष के. बी. साळुंखे, गटनेते राजु चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.

श्री.महाजन म्हणाले की, नगरपरिषदेचा हा शताब्दी महोत्सव भावस्पर्शी आहे. येथील अनेक लोकांनी केलेल्या चांगल्या कार्यामुळे जिल्ह्याचा नावलौकिक आहे. पाणी, शेती याबरोबरच रस्त्यांना आज खूप महत्व आहे. यासाठी रस्त्यांच्या कामांचे भूमिपुजन केले आहे. आज चाळीसगाव तालुक्यात सर्वदूर रस्त्यांची कामे सुरु आहेत. चाळीसगाव तालुक्यात महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य संकुल शासकीय ग्रामीण रुग्णालय, वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयाची मागणी पूर्ण झाली आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा येत्या 3 महिन्यात पूर्ण करण्यात येणार आहे. वरखेडी-लोंढे प्रकल्पाला निधी उपलब्ध करुन दिल्यामुळे हा लवकरच पूर्ण करण्यात येईल. या प्रकल्पामुळे पिण्याचे पाणी उपलब्ध होणार असून शेतीलाही याचा लाभ होणार आहे. गिरणा नदीवर 7 बलून बंधारे लवकरच पूर्ण करण्यात येतील. नदीजोड प्रकल्प झाला तर पश्चिम भागातील नद्यांचे पाणी आपल्या भागात आणता येईल. या प्रकल्पामुळे आपल्या भागाचा विकास होवून हे नंदनवन होईल असेही त्यांनी सांगितले. नागरिकांची डेंगू, मलेरिया सारख्या आजारांपासून मुक्तता होण्यासाठी भुयारी गटारींचा डीपीआर त्वरीत तयार करुन सादर करावा. त्यास लागणारा संपूर्ण निधी देण्यात येईल. यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. यासाठी पाण्याचे नियोजन करावे, पाण्याचा थेंब अन थेंब वाचवावा. उपलब्ध असलेले पाणी आताच वापरले तर भविष्यात पाणी राहणार नाही. यासाठी सर्वांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

आमदार पाटील म्हणाले की, ऐतिहासिक वारसा असलेल्या या तालुक्याच्या विकासाच्या बाबतीत जिल्ह्यात पहिला क्रमांक असला पाहिजे. नगरवासियांना विकासात पुढे नेत असताना हायब्रीड ॲन्युटी मॉडेल अंतर्गत 346 कोटीचे विविध विकास कामांचे भूमिपुजन करुन ऐतिहासिक काम करण्यात आले आहे. या रस्त्यांच्या कामांमुळे नगरपरिषदेच्या 15 कोटी रुपयांची बचत होणार आहे. 135 कोटी रुपये खर्चाचा चाळीसगाव ते मालेगाव रस्ता, 125 कोटी रुपये खर्चाचा सायगाव ते बहाळ व चाळीसगाव ते नागद रस्ता, 5 कोटी रुपये खर्चाचे नागद चौफुली ते पाटणादेवी रस्ता काँक्रिटीकरण करण्यात येत आहे. लोकांना वेळेवर व एकाच वेळी शुध्द पाणी मिळावे यासाठी शहरात 68 कोटी रुपये खर्चाची नवीन वितरण व्यवस्था व जलकुंभ निर्माण करण्यात येणार आहे. शहरात नवीन पाईनलाईन, पाण्याची टाकी, गिरणा धरणातून पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीवरील 50 ठिकाणी एअरव्हॉल नवीन बसविण्यात येणार आहे. तसेच शहरात 5 कोटी रुपये खर्चून चार हजार 500 नवीन एलईडी पथदिवे बसविण्यात येणार आहेत. या पथदिव्यांमुळे 50 टक्के विजेची बचत होणार असून अनावश्यक विजेचा होणारा वापर टळणार असून खर्चाची बचत होणार आहे. शहरात स्वच्छाग्रह अभियानाची सुरवात झाली असून नगरपरिषदेने 8 कोटी रुपये खर्चून स्वत:च्या मालकीचे घेतलेल्या डिजीटल घंटागाड्या व जेसीबीचे लोकार्पण हे स्वच्छ, सुंदर, हरीत चाळीसगावच्या दिशेने एक महत्वाचे पाऊल असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी नगरपरिषदेच्या शताब्दी महोत्सवाच्या लोगोचे अनावर, पाणीपुरवठा योजनेच्या कोनशिलेचे अनावरण, डिजीटल घंटागाड्या, जे.सी.बी.चे लोकार्पण झाले. तत्पूर्वी चाळीसगाव ते मालेगाव रस्ता, सायगाव ते बहाळ व चाळीसगाव ते नागद रस्ता, नागद चौफुली ते पाटणादेवी रस्ता काँक्रिटीकरणाचे भूमिपुजनही करण्यात आले.

यावेळी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांनी आपल्या प्रास्ताविकात नगरपरिषदेने मागील काळात राबविलेल्या उपक्रमांची माहिती सांगितली. तसेच अध्यक्षा आशालता चव्हाण, गट नेते राजु चौधरी यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी नगरपरिषदेचे स्वच्छतादूत पुरुष व महिला सफाई कामगार, घंटागाडीचे वाहन चालक यांचा प्रशस्तीपत्र देवून गौरविण्यात आले तर नगरपरिषदेचे सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी यांना मान्यवरांच्या हस्ते स्मृती चिन्ह देवून त्यांचा गौरव करण्यात आला. तसेच पंतप्रधान आवास योजनेंतर्गत 5 लाभार्थ्यांना प्रातीनिधीक स्वरुपात घर बांधणी मंजूरी आदेश मान्यवरांच्या हस्ते यावेळी देण्यात आले.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा