महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
चिपी विमानतळ सिंधुदुर्ग विकासाचे महाद्वार - पालकमंत्री दीपक केसरकर बुधवार, १२ सप्टेंबर, २०१८
सिंधुदुर्ग : चिपी विमानतळावर आज श्री गणेशाचे विमानातून आगमन झाले आहे. सिंधुदुर्गच्या इतिहासातील हा ऐतिहासिक क्षण आहे. या विमान सेवेमुळे पर्यटकांच्या संख्येत लक्षणीय वाढ होणार आहे. याच बरोबर सिंधुदुर्गातील कृषि मालाबरोबरच माशांची निर्यात करणे सुलभ होणार आहे. नजिकच्या काळात चिपी विमानतळ सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाचे महाद्वार ही भूमिका बजावेल, असा विश्वास पालकमंत्री दीपक केसरकर यांनी चिपी, ता. वेंगुर्ला येथे बोलताना व्यक्त केली.

आज सकाळी ठिक 11.50 वाजता चिपी विमानतळावर पहिल्या विमानाचं लॅण्डीग यशस्वीरित्या झालं. यावेळी गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीने व ढोल पथकांच्या व तुतारीच्या निनादात या पहिल्या वहिल्या विमान लॅण्डीगचं ग्रामस्थ बंधू – भगिनींनी जल्लोशात स्वागत केलं. यावेळी आयोजित समारंभात पालकमंत्री दीपक केसरकर बोलत होते. यावेळी व्यासपिठावर खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे, पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम, अपर पोलीस अधीक्षक श्री.गोयल, माजी आमदार राजन तेली, अजित गोगटे, पुष्पसेन सावंत, कल्याण डोंबिवलीच्या महापौर विनिती राणे, जिल्हा परिषद सदस्य सुनिल म्हापणकर, चिपीचे सरपंच गणेश तारी, पुरळे सरपंच स्वेता चव्हाण, आय.आर.बी कंपनीचे सह व्यवस्थापकीय संचालक सुधीर होशिंग आदी मान्यवर उपस्थित होते.

चिपी विमानतळावर कार्गो हबसाठी वाटाघाटी सुरू आहेत. या विमानतळाच्या माध्यमातून आंबा व मासे तसेच इतर कृषी मालाच्या निर्यातीबाबत प्रयत्न सुरू असल्याचे स्पष्ट करुन पालकमंत्री म्हणाले की, एक स्टिम्युलेटर व एव्हिएशन स्कूल याच ठिकाणी सुरू होण्याबाबत आम्ही प्रयत्नशील आहोत. चिपी विमानतळासाठी ज्या शेतकऱ्यांनी जमिनी दिल्या त्यांच्या मुलांना नोकरीसाठी कौशल्य विकास अंतर्गत प्रशिक्षण देण्यात येईल. 15 ऑगस्ट रोजी मी भाषणात यंदाचे वर्ष हे स्वप्नपूर्ती वर्ष असेल असे जाहीर केले होते. याच अनुषंगाने येत्या सहा महिन्यात पर्यटन, कृषी यांत्रिकीकरण, फळबाग लागवड, आदी योजना पूर्ण करुन मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न केले जाणार आहेत. शेवटी गणेशोत्सवाच्या शुभेच्छा त्यांनी दिल्या.

खासदार विनायक राऊत यांनी गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर सर्व जिल्हावासियांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देऊन ते म्हणाले की, आज सिंधुदुर्गातील ग्रीन फिल्ड विमानतळाचे उद्घाटन श्री गणरायाच्या आगमनाने होत आहे. हा सुवर्ण क्षण आहे. केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री सुरेश प्रभू यांनी 26 जुलै रोजी दिल्लीत बैठक घेऊन 12 सप्टेंबर ही तारीख निश्चित केली होती. या अनुषंगाने आय.आर.बी. कंपनीच्या अधिकारी व कर्मचारी वर्गाने अविश्रांत मेहनत घेऊन विमानतळाची कामे केली. त्या सर्वांना मी धन्यवाद देतो. ते पुढे म्हणाले, एव्हीएशन समितीत मी चार वर्ष कार्यरत आहे. या समितीमध्ये रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा उड्डान योजनेत समावेश करण्याबाबत मी आग्रही राहिलो. यामुळे या दोन्ही जिल्ह्यातील विमान प्रवाशांना कमी खर्चात विमान प्रवासाचा लाभ घेता येणार आहे.

यावेळी आमदार वैभव नाईक, जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे, माजी आमदार राजन तेली यांनीही समायोचित भाषणे केली.

पालकमंत्री दीपक केसरकर यांनी यावेळी प्रकल्पग्रस्तांना नोकरीबाबतचे 260 अर्ज आय.आर.बी. कंपनीचे सह व्यवस्थापकीय संचालक सुधीर होशिंग यांच्याकडे सुपुर्द केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते चिपी विमानतळासाठी जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांचे सत्कार करण्यात आले. यावेळी गजानन देसाई, गजू घोगळे, प्रदीप सारंग, बबन चव्हाण, सुरेश सरमळकर, अनिल कदम, दीपक चव्हाण या शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विमानाचे पायलट कॅप्टन भरत, को पायलट श्री.अक्षय व कु.पुनम यांचाही शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. आय.आर.बी कंपनीतील अधिकारी व एल ॲण्ड टी कंपनीतील अधिकाऱ्यांनाही यावेळी गौरविण्यात आले.

यावेळी जिल्ह्यातील नागरिक, बंधू – भगिनी बरोबरच चिपी, परुळे ग्रामपंचायतीच्या पंचक्रोशीतील ग्रामस्थ बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा