महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
`ऑरीक­`च्या माध्यमातून रोजगाराच्या संधी विस्तारणार - पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे गुरुवार, १३ फेब्रुवारी, २०२०


औरंगाबाद
:
ऑरीक सिटीच्या माध्यमातून जिल्ह्याचा औद्योगिक विकास विस्तारत आहे. ज्यामुळे तरूणांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार आहे. हे लक्षात घेऊन अशा उद्योग व्यवसायाच्या प्रकल्पांना शासन प्रोत्साहन देणार असल्याचे पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज येथे सांगितले.

शेंद्रा पंचतारांकीत औद्योगिक क्षेत्रातील `ऑरिक` ची पाहणी आज पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी केली. त्यांच्यासोबत राज्याचे उद्योगमंत्री तथा पालकमंत्री सुभाष देसाई, यांच्यासह इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.

श्री. ठाकरे यांनी ऑरिक सिटीमध्ये 53 कंपन्यांनी करार केला असून काही कंपन्यांनी उत्पादन देखील सुरू केले आहे. या पार्श्वभूमीवर प्रशिक्षित मनुष्यबळ निर्माण करण्यावर भर द्यावा. जेणेकरून या उद्योगांच्या माध्यमातुन अनेकांना रोजगार मिळेल असे सांगितले. प्राधान्याने रस्त्याच्या दोन्ही बाजुला सार्वजनिक शौचालय तातडीने करण्यात यावे. प्रदुषण नियंत्रणासाठी `मियावाकी` च्या धर्तीवर वृक्षारोपण करावे जेणेकरून येथील तापमानात बराच फरक पडेल. तसेच पोलिसांना राहण्यासाठी गृहनिर्माण प्रकल्प आणि मैदान उभारण्याच्या सूचनाही यावेळी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिल्या.

यावेळी ऑरीक सिटीतील कंट्रोल रूमची पाहणी करून ऑरीक येथील सुविधांच्या बाबतीत पर्यटनमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले. वॉक टु वर्क या संकल्पने प्रमाणे येथे काम सुरू असुन सायकल ट्रॅकचेही कौतुक केले.

'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा