महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
पूर प्रवण परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सुसज्ज - विभागीय आयुक्त अनूप कुमार मंगळवार, १२ जून, २०१८
नागपूर : यंदा मान्सून सामान्य ते दमदार असल्याचे संकेत वेधशाळेकडून वर्तविण्यात आला असून पूरप्रवण परिस्थिती सारख्या नैसर्गिक आपत्तींना तोंड देण्यासाठी नागपूर विभागातील नागरी तसेच लष्करी यंत्रणा सुसज्ज असल्याचे विभागीय आयुक्त अनूप कुमार यांनी सांगितले.

विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभाकक्षात आज विभागीय आयुक्त अनूप कुमार यांच्या अध्यक्षतेखाली नागरी आणि लष्करी अधिकाऱ्यांची मान्सूनपूर्व तयारीबाबत समन्वय आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी अनूप कुमार बोलत होते. यावेळी वायुसेनेचे एम. के. सिन्हा, सुजीत भोसले, कामठीचे कर्नल सी. के. राजेश, प्रादेशिक हवामान केंद्राचे संचालक ए. डी. ताथे, जे. आर. प्रसाद, सिताबर्डी फोर्ट 118 चे सुभेदार विरेंद्रसिंह शेखावत, राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे एस. डी. धुमाळ तसेच गार्ड रेजिमेंटल सेंटर, कामठी, वायुसेना, लष्कर दलातील मुख्य अधिकारी, पोलिस दलाचे अधिकारी, होमगार्ड, सिंचन विभागाचे अधिकारी उपस्थित होते. त्याचप्रमाणे नागपूरचे जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, वर्धाचे शैलेश नवाल, भंडाराचे शंतनू गोयल, गोंदियाच्या श्रीमती डॉ. कादंबरी बलकवडे, चंद्रपूरचे अतिरिक्त जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे, गडचिरोलीचे अतिरिक्त जिल्हाधिकारी अशोक चौधरी, मनपा आयुक्त, नागपूर विरेंद्र सिंह, मनपा आयुक्त, चंद्रपूर संजय काकडे, विशेष पोलीस शाखेच्या उपायुक्त श्रीमती स्मार्तना पाटील, मुख्य वनसंरक्षक संजीव गौर, मुख्य कार्यपालन अधिकारी, मनपा अधिकारी, आरोग्य विभागाचे अधिकारी, विभागीय आयुक्त कार्यालयातील उपायुक्त (महसूल) सुधाकर तेलंग, तहसिलदार रविंद्र माने, विभागीय नियंत्रण कक्षाचे नितेश बंभोरे, जयंत डोंगरे तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

आढावा बैठकीमध्ये प्रत्येक जिल्ह्याच्या वतीने नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांबाबत सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी तसेच मनपा आयुक्त विरेंद्र सिंह, प्रादेशिक हवामान केंद्राचे संचालक ए. डी. ताथे यांनी पावर पॉईन्ट प्रेझेंन्टेशन द्वारा सादरीकरण केले. पूर प्रवण परिस्थितीचा सामना करण्यासाठी आवश्यक असणारे लाईफ जॅकेट, रबर बोट, सर्च लाईट, मेगा फोन, तंबू, दोर, विजेरी, होंडा पंप, इलेक्ट्रिक जनरेटर, फायर सूट, फोल्डिंग स्ट्रेचर, प्रथम उपचार पेटी इत्यादी अत्यावश्यक साधने उपलब्ध असल्याची जिल्हानिहाय माहिती देण्यात आली.

यावेळी विभागीय आयुक्त अनूप कुमार म्हणाले की, नैसर्गिक आपत्तीमुळे जीवित, वित्त आणि पर्यावरणाचे नुकसान होवू नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि प्रशासकीय सुसज्जता आवश्यक आहे. सर्व जिल्ह्यांचे नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष अद्यायावत असावे. धोका प्रवण क्षेत्रात काळजीपूर्वक देखरेख ठेवून आपत्तीचा इशारा सर्वांपर्यंत पोहचविण्यासाठी ‘बल्क एसएमएस’ प्रणाली अधिक प्रभावीपणे राबवावी. नवीन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने पीडितांना ताबडतोब मदत मिळेल यासाठी प्रशासकीय यंत्रणेने तत्पर राहणे आवश्यक आहे. अतिवृष्टीच्या काळात कित्येकदा वीज प्रवाह खंडित होवून जनजीवन विस्कळीत होते. यासाठी पर्यायी विजेची व्यवस्था तयार ठेवावी. जेणेकरून मदत आणि बचाव कार्यात अडसर निर्माण होणार नाही. पूर प्रवण परिस्थिती निर्माण होण्यापूर्वी त्याची आगाऊ सूचना देणारी यंत्रणा अद्यायावत असावी. गरजूंना वैद्यकीय मदत, खाद्य पदार्थांचा पुरवठा, पिण्याचे पाणी, कपडे, दळणवळण पूर्व स्थितीत आणणे तसेच आर्थिक किंवा वस्तू रुपातील मदतीच्या वाटपाबाबत विभागीय आयुक्तांनी संबधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

यावेळी वायुसेनाचे एम. के. सिन्हा यांनी नैसर्गिक आपत्तीच्या काळात दुर्गम भागात तातडीने मदत पोहचविण्यासाठी हेलिपॅडची जागा निश्चित असावी. तशी जागा उपलब्ध नसल्यास शाळेचे पटांगण यासारख्या तत्सम जागेची निवड करून ठेवण्यात यावी, अशा सूचना संबंधितांना दिल्या. उपायुक्त सुधाकर तेलंग यांनी आभार मानले.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा