महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
हरित लातूरसाठी प्रत्येकाने वृक्षलागवड मोहिमेत सक्रीय सहभाग घ्यावा - संभाजी पाटील-निलंगेकर रविवार, ०१ जुलै, २०१८
लातूर : ज्या भागात वृक्षाचे प्रमाण जास्त असते त्या भागात पावसाचे प्रमाण देखील जास्त असते. त्यामुळे हरित लातूर करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने 13 कोटी वृक्ष लागवड मोहिमेत सक्रीय सहभाग घेऊन लावलेले प्रत्येक झाडाचे चांगले संवर्धन करण्याचे आवाहन पालकमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात पालकमंत्री श्री.निलंगेकर यांच्या हस्ते वृक्षारोपण करुन जिल्ह्यातील वृक्ष लागवड मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष मिलींद लातूरे, महापौर सुरेश पवार, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, महापालिका आयुक्त कौस्तूभ दिवेगावकर, निवासी उपजिल्हाधिकारी प्रताप काळे, उपजिल्हाधिकारी सुनिल यादव, उपवनसंरक्षक आर.जी. मुदमवार, सामाजिक वनीकरणच्या उपसंचालक श्रीमती गंगावणे, वन परिक्षेत्र अधिकारी सी. जी. पोटुलवार, जिल्हा नियोजन अधिकारी संजय कोलगणे आदीसह इतर मान्यवर व शालेय विद्यार्थी उपस्थित होते.

पालकमंत्री निलंगेकर म्हणाले, जेथे वृक्षाचे प्रमाण जास्त तिथे पावसाचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे जिल्हावासियांनी वृक्ष लागवड मोहिमेत सहभाग घेऊन वृक्ष संगोपनाची जबाबदारी चोखपणे पार पाडल्यास जिल्ह्याला देण्यात आलेले 33 लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण तर होईलच पण लातूर जिल्ह्याची वाटचाल हिरवगार लातूरकडे होईल, असेही त्यांनी सांगितले.

इंद्रपस्थ जलभूमी अभियानांतर्गत घर तिथं झाड अंतर्गत जिल्हा परिषदेच्या शालेय विद्यार्थ्यांना वृक्ष देऊन त्याच्या संगोपनाच्या अहवालाकरिता संगोपन पुस्तिका देण्यात आली असून त्या माध्यमातून शालेय दशेपासूनच विद्यार्थ्यांना वृक्ष संवर्धनाचे महत्व सांगण्यात येत आहे. हा उपक्रम राज्यात पथदर्शक प्रकल्प म्हणून राबविण्याच्या सूचना अलीकडेच मुख्यमंत्री यांनी दिलेल्या आहेत, असे श्री.निलंगेकर यांनी सांगितले.

तीन वर्षात 50 कोटी वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमाची संकल्पना अत्यंत चांगली असून देशपातळीवरही याची दखल घेतली जात असून वृक्ष लावगड व संवर्धनामध्ये महाराष्ट्र राज्याचे उत्कृष्ट काम असल्याची माहिती त्यांनी दिली.

जिल्हास्तरावरील ज्या शासकीय यंत्रणांना वृक्षारोपणाचे उद्दिष्ट दिलेले आहे त्या सर्व यंत्रणांनी वृक्षसंवर्धनाचे काम साठ टक्केपेक्षा अधिकच करणे गरजेचे आहे. यापेक्षा कमी वृक्ष संवर्धन झालेल्या यंत्रणांच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल. त्याकरिता जिल्हाधिकारी यांनी संबंधित यंत्रणांवर योग्य नियंत्रण ठेवावे, अशी सूचना श्री.निलंगेकर यांनी दिल्या. तसेच लागवडीच्या उद्दिष्टापेक्षा अधिक वृक्ष लागवड करण्याबरोबरच संत तुकाराम वनग्राम योजनेतही जिल्ह्याने चांगली कामगिरी करण्याची सूचना त्यांनी केली.

राज्यात लातूर जिल्ह्याचे वनक्षेत्र अत्यल्प असल्याची माहिती जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी देऊन हे वनक्षेत्र वाढविण्यासाठी प्रत्येक नागरिकांने वृक्ष लागवड मोहिमेत सहभाग घ्यावा. तसेच ही मोहिम 1 जुलै ते 31 जुलै, 2018 या कालावधीत होणार असल्याने उद्दिष्टापेक्षा अधिक वृक्ष लागवड केली जाईल, असे त्यांनी सांगितले. त्याप्रमाणेच जिल्ह्यातील ओसाड व गावठाण जमिनी वन विभागाला वृक्ष लागवडीसाठी लीजवर देण्याचे नियोजन असून हे काम पालकमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करुन लातूर जिल्हा हिरवागार करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच राष्ट्रीय हरितसेनेत लातूर जिल्हा राज्यात प्रथम असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रारंभी पालकमंत्री निलंगेकर यांच्या हस्ते वृक्षारोपण करुन जिल्हास्तरीय वृक्ष लागवडीचा शुभारंभ करण्यात आला. त्यानंतर निलंगेकर यांच्या हस्ते शालेय विद्यार्थ्यांना प्रातिनिधीक स्वरुपात वृक्ष देऊन त्या वृक्षांचे संगोपन करण्याचे आवाहन करण्यात आले . वन विभागामार्फत मान्यवरांचा वृक्ष रोप देऊन सत्कार करण्यात आला.

सहायक वनसंरक्षक मुदमवार यांनी प्रास्ताविकात लातूर जिल्ह्याला 13 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत 33 लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट असून यामध्ये वन विभाग 8 लाख, सामाजिक वनीकरण 7 लाख, ग्रामपंचायत विभाग 8 लाख 60 हजार व इतर शासकीय विभाग 10 लाख वृक्ष लागवडीचा समावेश आहे, असे त्यांनी सांगितले. तर लातूर जिल्ह्यातील वृक्ष रोपणासाठी शंभर टक्के खड्डे खोदण्याचे काम पूर्ण झालेले असून त्याचे जिओ टॅगींग केल्याची माहिती त्यांनी दिली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. राजूरकर यांनी केले तर आभार वन परिक्षेत्र अधिकारी सी. जी. पोटुलवार यांनी मानले.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा