महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
गतीमान प्रशासनासाठी ग्रामपंचायतीपासून ते जिल्हा परिषदेपर्यंत झिरो पेंडन्सी करा- चंद्रकांत दळवी शनिवार, १५ जुलै, २०१७
पुणे : प्रशासन चांगले असेल तर जनतेचे सर्व प्रश्न मिटतात, विकासकामे मार्गी लागतात. गतीमान प्रशासनासाठी झिरो पेंडन्सी महत्वाची असून तो आपल्या कर्तव्याचा भाग आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीपासून ते जिल्हा परिषदेपर्यंत झिरो पेंडन्सीची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी केल्या.

येथील आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात पुणे विभागातील सर्व जिल्हा परिषद, पंचायत समितींच्या अधिकाऱ्यांसाठी आयोजित कार्यशाळेत श्री.दळवी बोलत होते. यावेळी साताऱ्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश देखमुख, कोल्हापूरचे डॉ. कुणाल खेमनार, सांगलीचे अभिजीत राऊत, सोलापूरचे डॉ. राजेंद्र भारुड यांच्यासह विभागातील सर्व जिल्ह्यांचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी, गट विकास अधिकारी उपस्थित होते.

श्री. दळवी म्हणाले, जनतेला चांगले प्रशासन देण्याचे आपले काम आहे. चांगले प्रशासन असेल तर सर्व प्रश्न मिटतात. विकासकामांना गती मिळते. जनतेच्या कल्याणासाठी शासनाच्या अनेक महत्वाकांक्षी योजना आहेत, या योजनांची योग्य प्रकारे अंमलबजावणी होण्यासाठी वेळेत कामांचा निपटारा झाला पाहिजे. वर्षानुवर्षे जनतेची अनेक प्रकरणे प्रलंबित असतात. ती तातडीने मार्गी लावली पाहिजेत.

झिरो पेंडन्सी राबविण्यासाठी कामाचे टप्पे करणे महत्वाचे आहे. पहिल्या टप्प्यात दि. 31 जुलै 2017 पर्यंत सर्व अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडील सर्व प्रलंबित प्रकरणांची संख्या निश्चित करुन त्या सर्व प्रकरणांचा निपटारा करावा. त्यासाठी सिक्स बंडल पद्धत, लिपीक दप्तरातील नोंदवही अद्ययावत करणे, ए.बी.सी.आणि डी. पद्धतीची यादी तयार करणे, अभिलेख कक्ष आदर्श करणे या गोष्टींकडे कटाक्षाने लक्ष देण्याच्या सूचना श्री. दळवी यांनी केल्या.

झिरो पेंडन्सीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हा परिषदेच्या स्तरावर सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. विभागातील सर्व ग्रामपंचायतीमध्येही झिरो पेंडन्सीची अंमलबजावणी करा. त्यासाठी ग्रामसेवकांना या पद्धतीची माहिती करुन द्या. कोणत्याही विभागाचा अभिलेख कक्ष हा अत्यंत महत्वाचा भाग आहे. तो स्वच्छ आणि अद्ययावत ठेवणे आवश्यक आहे. यामुळे प्रशासनाच्या बाबतीत जनतेच्या मनात सकारात्मकता वाढेल आणि कार्यालयातील कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढण्यास मदत होणार आहे. झिरो पेंडन्सीचे काम मोहीम म्हणून राबविण्याच्या सूचना श्री. दळवी यांनी यावेळी केल्या.

या कार्यशाळेत जिल्हा परिषदेतील विविध विभागांचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, शिक्षणाधिकारी, जिल्हा कृषी अधिकारी, अभियांत्रिकी विभागाचे अधिकारी, सिंचन विभागाचे अधिकारी यांच्यासह तालुका स्तरावरील गटविकास अधिकारी व अन्य अधिकाऱ्यांचा समावेश होता. यापूर्वी महसूल विभागातील महसूल अधिकाऱ्यांची अशाच प्रकारची कार्यशाळा घेण्यात आली होती. त्यात जिल्हाधिकारी, विभागीय महसूल कार्यालयातील सर्व उपायुक्त, विविध जिल्ह्यातील अप्पर जिल्हाधिकारी, विविध विभागांचे उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार यांचा समावेश होता.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा