महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
सुरक्षा दलातील महिलांचा अभिमान आहे- हंसराज अहीर शनिवार, १२ ऑगस्ट, २०१७
रक्षाबंधन कार्यक्रमात सुरक्षा यंत्रणेतील महिलांचे समर्पण केला सलाम

चंद्रपूर, दि.12 – सीमेवर लढणाऱ्‍या जवानांसाठी राखी पाठविण्याच्या बातमीने मन भरुन येते. आजही जवानांच्या आठवणीने मन भावूक होतेच. मात्र आता बदलत्या काळात संरक्षण व गृह विभागात विविध आघाड्यांवर सुरक्षा यंत्रणेत मोठ्या प्रमाणात महिलांचा सहभाग बघून अभिमान वाटतो. त्यामुळे या रक्षाबंधनाला अशा अभिमानाने जगणा-या महिलांना सलाम करुया, असे प्रतिपादन केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी आज येथे केले.

दरवर्षी रक्षाबंधनाचा विशेष कार्यक्रम आयोजित करणारे हंसराज अहीर यांनी यावेळेचा रक्षाबंधन कार्यक्रम पोलीस व राखीव दलातील महिला कर्मचा-यांच्या सोबत देशभरातील सुरक्षा दलातील महिलांच्या सहभागाच्या आठवणीने साजरा केला. चंद्रपूर जिल्हयातील तैणात असणा-या महिला पोलीस दलातील भगीनींच्या हस्ते रक्षाबंधन केल्यानंतर त्यांनी देशभरात विविध भागातील महिलांच्या गृहविभागातील विविध दलात लक्षणीय सहभागाचे महत्व विषद केले. यावेळी संवाद साधतांना त्यांनी पुरुषापेक्षा काकणभर साहस आणि धैर्यामध्ये महिला अग्रेसर असल्याचे सांगितले. अतिशय खडतर परिस्थितीमध्ये महिला कर्मचारी गृहविभागाच्या अनेक दलात सक्षमतेने काम करीत आहे. स्वत:च्या कुटूंबाला उभारी देण्यासाठी नौकरी करतानाच देशप्रेमाचे अनोखे उदाहरण जगापुढे या महिलांमार्फत मांडले जाते.

या कार्यक्रमाला चंद्रपूर महानगरपालिकेतील महिला नगरसेवक मोठया संख्येने उपस्थित होत्या. गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी यावेळी महापौर अंजली घोटेकर यांच्यासह सर्व महिला नगरसेवेकांना राखी बांधल्यानंतर मिठाईचे वाटप केले. मला आपले सण आणि उत्सव जपायला आणि जगायला आवडते. त्यामुळेच दरवर्षी मी रक्षाबंधनाचा कार्यक्रम घेतो. चंद्रपूर मतदार संघातील प्रत्येक महिला ही आपली भगीनी असून आजचे रक्षाबंधन त्यासाठी प्रातिनिधीक आहे. हा भाऊ या सर्व महिलांच्या सुखदुख:त कायम सहभागी असून त्याचमुळे त्यांच्या प्रेमाची प्रचिती मला माझ्या आयुष्यात कायम मिळत राहते, असेही त्यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमाला महापौर अंजली घोटेकर, अधिष्ठाता डॉ.एस.एस.मोरे, उपमहापौर अनिल फुलझेले, भाईजी मेहर, दामोदरजी मंत्री, राहुल सराफ, विजय राऊत, मनपाचे उपायुक्त विजय देवळीकर आदी उपस्थित होते.

स्व.कालीदास अहीर स्मृती निमित्त रक्तदान
या कार्यक्रमानंतर माता कन्यका परश्मेश्वरी सभागृह कस्तुरबा रोड चंद्रपूर येथे स्व.कालीदास गंगाधरराव अहीर यांच्या जयंती स्मृती दिनानिमित्त रक्तदान शिबीराचे आयेाजन करण्यात आले होते. रक्षाबंधनाच्या कार्यक्रमानंतर महानगरपालिकेच्या सर्व नगरसेकांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. गृह राज्यमंत्री यांनी यावेळी स्व.कालीदास अहीर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन अभिवादन केले. यावेळी महापौर अंजली घोटेकर, उपमहापौर अनिल फुलझेले व अन्य महानगरपालिका पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी रक्तदान करणा-या कार्यकर्त्यांना व्यक्तीगत भेटी देवून हंसराज अहीर यांनी त्यांचे आभार मानले. अत्यंत गरजू आणि आवश्यक वेळी रुग्णांना मदत करण्यासाठी मोठया संख्येने तरुण पुढे आल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. दरवर्षी कालीदास यांच्या स्मृती विविध लोकोपयोगी कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. त्यासाठी मोठया प्रमाणात कार्यकर्ते एकत्र येतात. काही काळ मला या आयोजनातून माझ्या हितचिंतकासोबत कुटूंबासोबत घालवता येतो. याचे समाधान असल्याचे सांगितले.

'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा