महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
वाहतूक व्‍यवस्‍था जलद, सुरक्षित होण्‍यासाठी गतीने कार्यवाही करा -पालकमंत्री बापट सोमवार, ११ सप्टेंबर, २०१७
पुणे : जिल्‍ह्यातील हायब्रीड अॅन्‍युइटी अंतर्गत 9 रस्‍त्‍यांच्‍या 5 पॅकेजच्‍या सुमारे 2 हजार कि.मी. लांबीच्‍या व 6 हजार कोटी रकमेच्‍या रस्‍त्‍याच्‍या कामांचा आढावा अन्‍न व नागरी पुरवठा मंत्री तथा जिल्‍ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी घेतला. जिल्‍ह्यातील वाहतूक व्‍यवस्‍था जलद, सुरक्षित होण्‍यासाठी आवश्‍यक ती कार्यवाही गतीने करण्‍याच्‍या सूचना पालकमंत्री बापट यांनी संबंधिताना दिल्‍या. बैठकीस जिल्‍हाधिकारी सौरभ राव, अधीक्षक अभियंता राजेंद्र रहाणे, कार्यकारी अभियंता धनंजय देशपांडे, मिलिंद बारभाई, भरतकुमार बावीस्‍कर, सी.टी. नाईक यांच्‍यासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे इतर अधिकारी उपस्थित होते.

जिल्‍ह्यातील हायब्रीड अॅन्‍युइटी अंतर्गत 9 रस्‍त्‍यांच्‍या 5 पॅकेजमध्‍ये अष्‍टविनायक पॅकेज 270 कि.मी., बेल्‍हे-पाबळ-शिक्रापूर-उरळीकांचन-जेजुरी-मोरगाव-बारामती-निरा नरसिंगपूर मार्ग 170 कि.मी. चा समावेशआहे. पुणे-शिरुर रस्‍ता 55 कि.मी रस्‍ता सहा पदरी करण्‍यात येणार असून वाघोली, लोणीकंद, कोरेगाव भीमा आणि शिक्रापूर येथे 4 उड्डाणपूल बांधण्‍यात येणार आहेत.

हे रस्‍ते टोलमुक्‍त असणार आहेत. याशिवाय एमआयडीसी हिंजेवाडी-चाकण-शिक्रापूर-तळेगाव या भागातील रस्‍त्‍यांची सुधारणा करणे, पर्यटन स्‍थळे राजमाची,लोणावळा, पवना,पानशेत, खडकवासला, सिंहगड,तोरणा,पुरंदर आदी ठिकाणे जोडणा-या 150 कि.मी. लांबीच्‍या रस्‍त्‍यांचा अंतर्भाव पॅकेजमध्‍ये आहे. पाच पॅकेजपैकी दोन पॅकेजच्‍या कामांच्‍या निविदा प्रसिध्‍द झाल्‍या असून 3 निविदा सप्‍टेंबर अखेर प्रसिध्‍द होतील, अशी माहिती अधीक्षक अभियंता राजेंद्र रहाणे यांनी दिली. पालकमंत्री श्री. बापट यांनी जिल्‍हाधिकारी कार्यालय, ससून हॉस्‍पीटल, औंध शासकीय रुग्‍णालय, फॉरेन्सिक कार्यालय, शासकीय अधिका-यांची निवासस्‍थाने आदींच्‍या बांधकामाच्‍या प्रगतीची माहिती घेतली.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा