महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
क्षयरोगाची लक्षणे तपासण्यासाठी नवे तंत्रज्ञान विकसित व्हावे- आरोग्यमंत्री डॉ.दीपक सावंत मंगळवार, १३ मार्च, २०१८
नवी दिल्ली : क्षयरोगाची लक्षणे तपासण्यासाठी नवे तंत्रज्ञान विकसित व्हावे, अशी महत्त्वपूर्ण सूचना राज्याचे आरोग्यमंत्री डॉ.दीपक सावंत यांनी आज येथे केली.

येथील विज्ञान भवनात केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्यावतीने क्षयरोग निर्मूलनासंदर्भातील शिखर संमेलनाचे आयोजन करण्यात आले. या शिखर संमेलनाचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. यावेळी केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री जे.पी. नड्डा, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री अनुप्रिया पटेल, इंडोनेशिया, नायझेरियाचे आरोग्यमंत्री, जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक, वरिष्ठ अधिकारी यावेळी मंचावर उपस्थित होते. राज्याचे आरोग्यमंत्री डॉ.दीपक सावंत, सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ.प्रदीप व्यास उपस्थित होते.

मुख्य कार्यक्रम संपल्यानंतर केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री श्री.नड्डा यांच्या अध्यक्षतेत सर्व राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांची बैठक घेण्यात आली. त्यावेळी श्री.सावंत यांनी काही महत्त्वपूर्ण सूचना मांडल्या. यामध्ये क्षयरोगाच्या तपासणीसाठी वापरण्यात येणाऱ्या चाचण्यांमध्ये कुपोषित बालकांची, अन्य बालकांची तपासणी करण्यासाठी या बालकांच्या शौचाची, मूत्राची अथवा शरीरातील अन्य द्रव्यापासूनही तपासणी करण्यासंदर्भातील संशोधन विकसित होणे गरजेचे असल्याची सूचना डॉ.सावंत यांनी मांडली.

क्षयरोग हा अधिसूचित रोगांमध्ये मोडत असून खाजगी रूग्णालयात कार्यरत असणाऱ्या डॉक्टरांनी त्यांच्याकडे येणाऱ्या क्षयरोगाच्या रूग्णांची माहिती शासनाला द्यावी, तसे बंधनकारक करावे. यासह औषधीच्या दुकानदारांनीही त्यांच्याकडे औषधीसाठी येणाऱ्या क्षयरोग रूग्णांची माहिती शासनाला दिल्यास राज्यात क्षयरोगाची लागण झालेली किती रूग्ण आहेत याची योग्य माहिती गोळा होईल.

क्षयरोगाच्या निदानासाठी मोठ्या महानगरपालिकांचा सहभाग घ्यावा

मोठ्या महानगरपालिकांच्या हद्दीत वास्तव्यास असणाऱ्या क्षयरोग रूग्णांसाठी महापालिकांनी विशिष्ट कार्यक्रम राबवावा. यामध्ये नगरविकास विभागाने धोरण ठरवावे, यासाठी केंद्रीय आरोग्यमंत्री यांनी नगरविकास विभागाला सूचित करावे, अशी सूचनाही डॉ.सावंत यांनी आजच्या बैठकीत मांडली.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा