महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
सर्वधर्मीय सामुहिक विवाह सोहळा उपक्रम कौतुकास्पद - पालकमंत्री जयकुमार रावल रविवार, ०६ मे, २०१८
नंदुरबार : सर्वधर्मीय सामुहिक विवाह सोहळा हा सामाजिक बांधीलकी निर्माण करण्यासाठीचा उत्तम प्रयत्न असून अशा या आगळ्या वेगळ्या सोहळ्यातुन जात, धर्म पंथ विसरुन माणुसकीचा धर्म मोठा असल्याची प्रचिती सर्वांनी घडवल्याने हा कार्यक्रम निश्चितच अभिनंदनीय व कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री जयकुमार रावल यांनी आज येथे केले.

नंदुरबार येथील माळीवाडा परिसरात आज सहाय्यक धर्मदाय आयुक्त कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्ह्यातील धर्मदाय संस्था व जिल्हास्तरीय सामुहिक विवाह समिती यांच्या संयुक्त विद्यमाने सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी पालकमंत्री जयकुमार रावल बोलत होते. यावेळी आमदार चंद्रकांत रघुवंशी, आमदार डॉ.विजयकुमार गावित, जिल्हा परिषद सदस्य अभिजित पाटील, नगरसेविक कुणाल वसावे, आनंद माळी, लक्ष्मण माळी मंगला माळी, जिल्हाधिकारी डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी, जिल्हा व सत्र न्यायाधिश अभय वाघवसे, जिल्हा पोलीस अधीक्षक संजय पाटील, सहाय्यक धर्मदाय आयुक्त सुधीर वानखेडे, सामाजिक कार्यकर्ते हैदरअली नुराणी, आयोजन समितीचीचे गजेंद्र शिंपी, पंडीत माळी, सुलभा महिरे, राजेश चौधरी, निंबा माळी, वासुदेव माळी, राजेंद्र माळी, डॉ.भरत वळवी, डॉ.राजेश वळवी, सुभाष पानपाटील, रऊफ शेख, लायन्स क्लबच्या डॉ.तेजल चौधरी, सुप्रिया कोतवाल, हिना रघुवंशी, सोनिया राजपूत, दिनेश माळी आदि उपस्थित होते.

पालकमंत्री श्री.रावल म्हणाले, सरकारी यंत्रणेतल्या एखाद्या अधिकाऱ्याच्या कल्पकतेतुन एकदा सामाजिक सलोखा जपण्यासाठीचा कशा पद्धतीने प्रयत्न होऊ शकतो याचे हे सर्वधर्मीय सामुहिक विवाह सोहळा उत्तम उदाहरण असुन अशा सोहळ्यातून माणुसकी धर्मच मोठा असल्याची प्रचिती घडत आहे. या विवाह सोहळ्यात हिंदू, मुस्लीम, आदिवासी, बौद्ध, ख्रिश्चन अशा विविध धर्मांची लोक एका छताखाली विवाहबद्ध होत असल्याने विविधेतून एकतेचा संदेश समाजापुढे गेल्याचेही यावेळी बोलतांना मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले. शासनाच्या वतीने या सर्व दांपत्याना यावेळी पालकमंत्र्यानी भावी आयुष्यासाठी सुचना देत त्यांना विवाहाचे प्रमाणपत्र देखील प्रदान केले.

या सामुदायिक विवाह सोहळ्यात हिंदू, आदिवासी, मुस्लीम, बौद्ध, ख्रिश्चन अशा विविध धर्मांची जवळपास 83 जोडपे विवाह बंधानात अडकली. गेल्या महिन्याभरापासुन या विवाह सोहळ्याच्या समितीच्या वतीने विशेष परिश्रम घेण्यात येत होती. वाजत गाजत डिजेच्या तालावर नवरदेवांची मिरवणुका काढण्यात आली होती. या सामुदायिक विवाह सोहळ्यात विवाहबद्ध झालेल्या सर्व दाम्पत्यांनी सकाळी दहिदुले गावात श्रमदान तर केलेच शिवाय विवाहबद्ध होण्याआधी सामुहिक रित्या व्यसनमुक्तीची शपथ देखील घेऊन एक नवा आदर्श समाजापुढे प्रस्थापित केला आहे. विवाह मंडपात सर्व वधु-वर पोहचल्यानंतर त्यांना तंबाखुमक्त राहण्याची शपथ देण्यात आली. या आधी यातील अनेक जोडप्यांनी दहिंदुले गावात जाऊन पाणी फाऊंडेशनच्या वॉटरकप स्पर्धेसाठी श्रमदान करत एक नवा आदर्श प्रस्थापित केला.

यावेळी आमदार चंद्रकात रघुवंशी आणि जिल्हाधिकारी डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी देखील उपस्थित नवदांपत्यास शुभेच्छा दिल्यात. या विवाह सोहळ्यासाठी पोलीस दलातर्फे खास पोलीस बँन्ड देखील उपलब्ध करुन देण्यात आला होता. तर अनेक दात्यांनी स्वच्छेने पुढे येऊन या विवाह सोहळ्यासाठी मदतीचा हातभार लावल्यानेच हा सोहळा यशस्वी झाल्याने आयोजकांनी त्यांचेही आभार मानले आहेत. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन पत्रकार रणजित राजपूत यांनी केले.

'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा