महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
राज्यातील पहिल्या 'लोकराज्य' उर्दू शाळेचा बहुमान मौलाना अबुल कलाम आझाद उर्दू शाळेला मंगळवार, १७ सप्टेंबर, २०१९


पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजी सावंत यांच्या हस्ते प्रशस्तिपत्र देवून गौरव

उस्मानाबाद :
मराठवाडा मुक्तिसंग्राम वर्धापनदिनानिमित्त आयोजित मुख्य सोहळ्यात मौलाना अबुल कलाम आझाद ही शाळा जिल्ह्यातील तसेच राज्यातील पहिली उर्दू लोकराज्य शाळा झाल्याबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक शिक्षण संस्थाचालक संघाचे जिल्हाध्यक्ष हाफीझ अलिमोद्दीन आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे पालकमंत्री प्रा.डॉ. तानाजी सावंत यांच्या हस्ते प्रशस्तिपत्र देवून सन्मान करण्यात आला.

शासनाचे मुखपत्र 'लोकराज्य' हे लोकप्रिय मासिक देशातील सर्वाधिक खपाचे मासिक म्हणून मान्यता पावले आहे. राज्य शासनाच्या विविध योजना आणि निर्णय, त्यांची अंमलबजावणी यांची अधिकृत आणि अचूक माहिती पुरविणारे व तब्बल ५ लाख १७ हजार ६८ इतका अधिकृत खप असणारे हे एकमेव शासकीय मासिक आहे. समाजातील सर्वच घटकांना उपयुक्त असणारे हे मासिक आहे. विशेष म्हणजे हे मासिक मराठी भाषेसह इंग्रजी,उर्दू ,हिंदी आणि गुजराती भाषेतही प्रकाशित होते.

जिल्हयात या मासिकाबाबत जिल्हा माहिती कार्यालयामार्फत विविध प्रकारे जनजागृती सातत्याने केली जाते.यास प्रतिसाद देताना जिल्हयातीलच नव्हे तर राज्यातील पहिली लोकराज्य अल्पसंख्याक संस्था होण्याचा बहुमान मौलाना अबुल कलाम आझाद शिक्षण संस्थेने मिळविला आहे. या संस्थेतील इ.७ वी ते १० वी च्या सर्व विद्यार्थ्यांनी उर्दू लोकराज्यचे सभासदत्व स्वीकारले आहे. त्यामुळे ही शाळा आता जिल्ह्यातील तसेच राज्यातील पहिली उर्दू लोकराज्य शाळा म्हणून ओळखली जाणार आहे. मौलाना अबुल कलाम आझाद शिक्षण संस्था स्वच्छता अभियान, बेटी बचाव बेटी पढाओ मोहीम, मतदार जनजागृती, अल्पसंख्याक समाजात शिक्षणासाठी जनजागृती, पूरग्रस्तांसाठी मदत फेरी असे विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यातही आघाडीवर आहे.

या सन्मानाबददल या शाळेचे समाजातील सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा