महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
मुंबईतील रेल्वे स्थानकांची नावे बदलण्याची मागणी सोमवार, २० मार्च, २०१७
‘सीएसटी’चे नामांतर ‘छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस’करावे

नवी दिल्ली :
मुंबई येथील ‘छत्रपती शिवाजी टर्मिनस’ (सीएसटी) या रेल्वे स्थानकाचे नाव ‘छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस’ तसेच ‘एल्फिन्स्टन रोड’ रेल्वे स्थानकाचे नाव ‘प्रभादेवी’ करण्याची मागणी, परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने आज केंद्रीय गृह मंत्री राजनाथ सिंग यांच्याकडे केली.

गृहमंत्री राजनाथ सिंग यांची आज संसद भवनात परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी भेट घेऊन केंद्रीय गृह मंत्री यांना रेल्वे स्थानकांच्या नाव बदलण्याविषयी लेखी निवेदन दिले. यावेळी खासदार अरविंद सावंत, श्रीरंग बारणे उपस्थित होते.

यासह ‘एल्फिन्स्टन रोड’ या रेल्वे स्थानकाच्या परिसरात प्रसिद्ध ऐतिहासिक प्रभादेवी मंदिर आहे. या मंदिराला नुकतेच 150 वर्ष पूर्ण झालेले आहे. यासह हा संपूर्ण परिसर प्रभादेवीच्या नावाने ओळखला जातो. येथील स्थानिक लोकांची बऱ्याच वर्षापासूनची ‘एल्फिन्स्टन रोड’ नाव ‘प्रभादेवी’ असावे, अशी मागणी आहे. गृह मंत्रालयाने याबाबत लवकर कार्यवाही करावी, अशी विनंती श्री. रावते यांनी बैठकीत केली. यावर सकारात्मक विचार करण्यात येणार असल्याचे, केंद्रीय गृहमंत्री यांनी यावेळी आश्वासन दिले.

केंद्रीय गृह मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे महाराष्ट्र कॅबिनेटने या प्रस्तावास मंजुरी दिलेली आहे. राज्यातील दोन्ही सभागृहात विधान सभा आणि विधान परिषदेत रेल्वे स्थानकाच्या नाव बदलाच्या ठरावावर बहुमताने मंजूर मिळालेली आहे. तसेच यासंदर्भातील प्रस्तावही केंद्रीय गृह विभागाला पाठविण्यात आलेला आहे, असे निवेदनात नमूद आहे.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा