महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
पर्यावरणपूरक गणेशाची स्थापना करावी - पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे गुरुवार, ०९ ऑगस्ट, २०१८
99 टक्के गणेश विसर्जन कृत्रिम तलावातच करा

नागपूर :
आगामी गणेशोत्सवात सार्वजनिक गणेश मंडळांनी पर्यावरणपूरक गणेश स्थापना करावी. तसेच या गणपतींचे विसर्जन कृत्रिम तलावातच करण्यात यावे. यासाठ़ी लागणाऱ्या सर्व उपाययोजना आणि व्यवस्था मनपा, नासुप्र, जिल्हा परिषद, नगर परिषदांनी करावी, असे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दिली.

गणेशोत्सवाच्या तयारीसंदर्भात महालच्या नगरभवनात आयोजित बैठकीत ते बोलत होते. याप्रसंगी महापौर नंदा जिचकार, जि.प. अध्यक्ष निशा सावरकर,आमदार सर्वश्री सुधाकर देशमुख, अनिल सोले, सुधाकर कोहळे, डॉ. मिलिंद माने, कृष्णा खोपडे, डॉ. आशिष देशमुख, जोगेंद्र कवाडे, उपमहापौर पार्डीकर, नेते संदीप जोशी, विरोधीपक्ष नेते तानाजी वनवे, मनपा आयुक्त वीरेंद्र सिंग, सीईओ यादव उपस्थित होते.

सार्वजनिक गणेशोत्सवासाठ़ी मनपा व पोलिसांनी समन्वय ठेवत एक खिडकी योजनेतून गणेश मंडळांना लागणाऱ्या सर्व परवानगी उपलब्ध करून द्याव्या. गणेश विसर्जनासाठी कृत्रिम टाके आणि जलाशयांची व्यवस्था करण्यात यावी. ज्या प्रमुख तलावांवर गणेश विसर्जन केले जाते तेथे कृत्रिम टाक्यांची व्यवस्था करण्यात यावी. ग्रामीण भागात जलाशये असली तरी कृत्रिम जलाशयात विसर्जन झाल्यास पाण्याचे स्रोत चांगले राहतील.

येत्या 13 ते 23 सप्टेंबर या दरम्यान हा उत्सव साजरा होत आहे. विसर्जनाच्या तारखा ठरवल्या जाव्या अशी सूचना आ. सुधाकर देशमुख यांनी केली. विसर्जनाबाबत गणेश मंडळांना पोलिसांनी मार्गदर्शक सूचना द्याव्या. विसर्जनाच्या मार्गावर एकही खड्डा असू नये. सार्वजनिक गणेश मंडळे व लोकांना त्रास आणि हेलपाटे होणार नाहीत, अशी व्यवस्था प्रशासनाने केली पाहिजे. आमदार कृष्णा खोपडे यांनीही यावेळी काही सूचना केल्या. साफसफाई आणि ध्वनिप्रदूषणावर विचार करण्यात यावा अशी सूचना उपस्थितांमधून करण्यात आली. गणेश उत्सवादरम्यान महापालिकेने पाणी वाचवा अभियान राबवावे. पाण्याच्या बचतीबद्दल जनजागृती होईल असा संदेश या निमित्ताने लोकांपर्यंत पोहोचावा अशी सूचनाही पालकमंत्री बावनकुळे यांनी केली.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा