महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
‘पोषण माह’ अभियानांतर्गत महाराष्ट्राला १४ पुरस्कार प्रदान बुधवार, १० ऑक्टोंबर, २०१८
नवी दिल्ली : गरोदर माता, स्तनदा माता यांना सकस आहार घेण्याबाबत तसेच राज्यातील बालकांमधील कुपोषणाबाबत जागरूकता, मुलींचे पोषण व त्यांच्या आरोग्याविषयी जागरूकता करण्याबाबत ‘पोषण माह’ कार्यक्रमामध्ये केलेल्या उत्कृष्ट कार्यासाठी आज महाराष्ट्राला एकूण १४ राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आले.

केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालयाच्या वतीने येथील हॉटेल अशोक मध्ये आयोजित कार्यक्रमात या मंत्रालयाचे सचिव राकेश श्रीवास्तव आणि नीती आयोगाचे सदस्य डॉ.विनोद कुमार पॉल यांच्या हस्ते पोषण माह पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यावेळी महाराष्ट्रातील क्षेत्रीय स्तरावरील कार्यासाठी १२ वैयक्तिक व सांघिक कामासाठी २ जिल्हास्तरीय असे एकूण १४ पुरस्कार प्रदान करण्यात आले. पदक आणि प्रशस्तिपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

‘पोषण माह’ अंतर्गत महाराष्ट्रात असे कार्यक्रम राबविण्यात आले

‘गोदभरायी’ या उपक्रमातून गरोदर मातेची सातव्या महिन्यात ओटी भरणे व या महिलांना आहार विषयक मार्गदर्शन करण्यात आले. ‘अन्नप्राशन’ उपक्रमाद्वारे सहा महिन्याच्या बालकांपासून बालकांचा आहार कसा असावा याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. महिलांची थायरॉईड व हिमोग्लोबिनची चाचणी घेण्यात आली. मुलींना स्वच्छता व आरोग्याची काळजी घेण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. प्रत्येक अंगणवाडी केंद्रात ‘अक्षयपात्र’ हा उपक्रम राबविण्यात आला, या अंतर्गत महिलांचे प्रबोधन करून अंगणवाडी केंद्रातील मुलांच्या आहारात विविधता येण्यासाठी कांदे, बटाटे, कडीपत्ता, शेवग्याचा पाला आदी त्यांना अंगणवाडी केंद्रात आणण्यास सांगण्यात आले व या केंद्रातील आहारात त्याचा अंतर्भाव करण्यात आला. पोषण आहाराबाबत जागरूकता करण्यासाठी मुलांची प्रभात फेरी काढण्यात आली, फॅन्सी ड्रेस स्पर्धा रांगोळी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.

राज्यात कोल्हापूर जिल्ह्याने पटकावले सर्वाधिक पुरस्कार

राष्ट्रीय पोषण माह अभियानात उत्कृष्ट कार्यासाठी सर्वाधिक पाच वैयक्तिक पुरस्कार एकट्या कोल्हापूर जिल्ह्याला प्रदान करण्यात आले. पन्हाळा तालुक्यातील माले येथील अंगणवाडी सेविका अनिता साळसकर, कागल तालुक्यातील चिखली येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य सहाय्यिका संध्या चांदणे, पन्हाळा तालुक्यातील केखले येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पर्यवेक्षिका स्मिता चोपडे, तसेच पन्हाळा तालुक्यातील माले उपकेंद्रात कार्यरत आरोग्य सेविका वैशाली शितोळे याच उपकेंद्रात कार्यरत आशा वर्कर शोभा लोहार यांना आज पुरस्कार प्रदान करण्यात आला.

भंडारा जिल्ह्यातील शिंदी उपकेंद्रातील खुमारी प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत एएनएम कार्यकर्त्या चंदा झालके, अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील घारगाव प्रकल्पाच्या पर्यवेक्षिका कल्पना अंदुरे व संगमनेर प्रकल्पाच्या पर्यवेक्षिका संगीता पवार, चंद्रपूर जिल्ह्यातील स्वस्थ भारत प्रेरक पूजा वेरुळकर, नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील मु. टोटमाळ पोस्ट. गांडोळे येथील अंगणवाडी सेविका मंदा शिंदे, आशा कार्यकर्त्या पुष्पा शिंदे आणि एएनएम कार्यकर्त्या लक्ष्मी गायकवाड यांना यावेळी पुरस्कार प्रदान करण्यात आला.

चंद्रपूर व नाशिक जिल्ह्यांचा सन्मान

राज्यात जिल्हा स्तरावर उत्तम सांघिक कार्यासाठी चंद्रपूर व नाशिक जिल्ह्यांना यावेळी सन्मानित करण्यात आले. चंद्रपूरचे बाल विकास प्रकल्प अधिकारी किरण सूर्यवंशी आणि नाशिकचे बाल विकास प्रकल्प अधिकारी सुनिल दुसाणे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालयाच्या पोषण अभियान विभागाच्या वतीने देशभरातील ३६ जिल्हे व केंद्रशासित प्रदेशांमध्ये ‘सप्टेंबर २०१८’ हा पोषण महिना म्हणून साजरा करण्यात आला. यात अगदी गाव पातळीपासून गरोदर माता, स्तनदा माता यांना सकस आहार, लहान मुलांमधील कुपोषणाबाबत जागरूकता, मुलींचे पोषण व त्यांच्या आरोग्याविषयी जागरूकता आदी विषयांवर पोषण अभियानाबाबत जागरूकता कार्यक्रम राबविण्यात आले. या कार्यक्रमांची नोंद पोषण अभियानाच्या संकेतस्थळावर करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीत उत्कृष्ट कार्यासाठी देशभरातील विविध राज्यांना क्षेत्रीय स्तरावर वैयक्तिक आणि जिल्हा स्तरावर सांघिक असे पुरस्कार प्रदान करण्यात आले. महाराष्ट्राचाही यावेळी सन्मान करण्यात आला.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा