महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
राज्यस्तरीय महालक्ष्मी सरस 17 ते 29 जानेवारी दरम्यान आयोजन शुक्रवार, १२ जानेवारी, २०१८
नवी मुंबई : ग्रामविकास व पंचायत राज विभाग, महाराष्ट्र शासन यांच्यातर्फे दरवर्षीप्रमाणे राज्यस्तरीय महालक्ष्मी सरस 2018 दि.17 ते 29 जानेवारी 2018 या कालावधीत एमएमआरडीए ग्राऊंड क्र.8 व 9, बी.के.सी. बांद्रा मुंबई येथे आयोजित करण्यात आले आहे. सदर प्रदर्शनाचे उद्घाटन राज्यपाल चे.विद्यासागर राव यांच्या हस्ते दि. 17 जानेवारी 2018 रोजी सकाळी 11.00 वा. होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षास्थानी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे या असणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, श्रीमती आर.विमला, यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सदर प्रदर्शनात महाराष्ट्रातील उमेद अंतर्गत तयार झालेले 270 स्वयंसहाय्यता समूह सहभाग नोंदवणार आहेत. हे 270 स्टॉल राज्यातील सहा विभागातून निवडलेले आहेत. यामध्ये 210 स्टॉल मधून 210 समूह आपली ग्रामीण हस्तकला, खाद्यपदार्थ, विविध धान्य व अनेक विविध ग्रामीण उत्पादने विक्रीसाठी असतील. त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रातील विविध व्यंजने 70 स्टॉलमधून 70 समूह तयार करून देणार आहेत. 150 स्टॉल भारतातील 28 राज्यातून आपली उत्पादने प्रदर्शित करतील. तसेच नाबार्ड संस्थेचे 50 स्टॉल असणार आहेत. प्रदर्शनात सांस्कृतिक कार्यक्रमाची मोठी परंपरा यावर्षी सुध्दा असणार आहे. पूर्ण 13 दिवस विविध मान्यवर व्यक्तींचे कार्यक्रम, आदिवासी समूहाचे तारपा नृत्य सुध्दा असणार आहे.

यावर्षीच्या प्रदर्शनाचे वैशिष्ट्ये म्हणजे प्रत्येक बचतगटाचा क्यूआर कोड तयार करण्यात आला असून त्या कोडद्वारे आपणास बचतगटाची माहिती व्हिडीओ क्लिपींगद्वारे पाहता येणार आहे. यावर्षी प्रथमच महालक्ष्मी सरसचे ॲप तयार करण्यात आले आहे. बचतगटांना वेलिंगटन इन्स्टीट्युटद्वारे पॅकेजींगचे ट्रेनिंग देण्यात आले आहे. तसेच या अभियानामार्फत सद्यस्थिती महाराष्ट्रामध्ये 2.19 लाख स्वयं सहाय्यत समूह आहेत. 5177 ग्रामसंघ तयार झाले आहेत. 220 प्रभागसंघ तयार करण्यात आले आहेत. या समुहा मधून 1.22 लाख समूहांना एकूण रक्कम रुपये 178.18 कोटी फिरता निधी देण्यात आला आहे. तसेच 2.82 लाख समूह यांना बँकेशी जोडण्यात आले आहे. त्यातून 3720 कोटी रुपयाचे बँक कर्ज वितरीत करण्यात आले आहे, अशी माहिती ही श्रीमती आर.विमला यांनी दिली.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा