महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
सदरबाजार परिसरात वयोवृद्धांसाठी लवकरच विरंगुळा केंद्र- चंद्रकांत पाटील रविवार, ०४ नोव्हेंबर, २०१८
कोल्हापूर : शहरवासियांना अधिकाधिक सोई-सुविधा उपलब्ध करुन देण्यावर अधिक भर देण्यात येत असून सदरबाजार परिसरात वयोवृद्ध नागरिकांसाठी लोकसहभागातून विरंगुळा केंद्र प्राधान्याने उभारले जाईल, अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

येथील सदरबाजारमध्ये सदर बाजार सोसायटी हॉल नुतनीकरण करण्यात आले असून या सुसज्ज सभागृहाच्या उद्घाटनप्रसंगी श्री. पाटील बोलत होते. यावेळी खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, स्थायी समिती सभापती आशिष ढवळे, नगरसेवक विजय सुर्यवंशी, नाना कदम, नगरसेविका स्मिता माने, संदीप देसाई, मंथन फाऊंडेशनचे अध्यक्ष मारुती माने, माजी महापौर सुनील कदम, पणनचे विशेष लेखा परीक्षक बाळासाहेब यादव, विद्या प्रबोधिनीचे अध्यक्ष राहुल चिकोडे, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे कोल्हापूर जिल्हा समन्वयक विजय जाधव आदी उपस्थित होते.

यापुढील काळात मुलींच्या शिक्षणाला अधिक महत्व देऊन त्यांना शिक्षित आणि संस्कारित बनविणे काळाची गरज असल्याचे सांगून श्री. पाटील म्हणाले की, कोणीही मुलगी पैसे नाहीत म्हणून शिक्षणापासून वंचित राहता कामा नये, मुलींची शिक्षण घेण्याची ईच्छा असेत तर त्यांना शिक्षणासाठी आवश्यकती मदत केली जाईल. मात्र मुलींचे शिक्षण न थांबवता पूर्ण करावे, या भागातील मुलींनी शिकले पाहिजे. मुलींनी शिकून कर्तृत्ववान झाल्या पाहिजेत. नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी लोकप्रतिनिधींनी जाणीवपूर्वक प्रयत्न केले पाहिजेत. नागरिकांना सर्व नागरी सेवा व सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी सर्वांनीच पुढाकार घेणे गरजेचे आहे.

शासकीय योजनाबरोबरच लोकसहभागातूनही नागरी सुविधा उपलब्ध करुन देण्यास प्राधान्य राहील. सदर बाजार परिसरातील सभागृहाचे काम अधिक चांगले झाले असून हा हॉल भागातील नागरीकांना विविध घरगुती तसेच सार्वजनिक कार्यक्रमांना उपलब्ध करुन द्यावा, असेही श्री. पाटील यांनी सांगितले.

खासदार महाडिक म्हणाले, या भागातील नगरसेविका स्मिता माने यांनी या परिसरात विविध विकास कामे करुन नागरिकांना आधार देण्याचे कार्य केले आहे. त्यांनी बरीच कामे प्रभागातून केली असून सातत्याने विविध उपक्रम सुरु असतात. या हॉलचा विविध कार्यक्रमासाठी उपयोग होणार आहे. या भागातील झोपडपट्टीवासियांना पॉपर्टी कार्ड द्यावे. तसेच त्यांना हक्काचा निवारा द्यावा.

नगरसेविका स्मिता माने सर्वांचे स्वागत करुन म्हणाल्या, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या सहकार्याने कमी कालावधीत या हॉलचे बांधकाम पूर्ण करण्यात आले. नागरिकांनी प्रभागातील प्रश्न सोडविण्यासाठी सहकार्य करावे.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा