महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
युवा माहिती दूत उपक्रमामुळे विद्यार्थ्‍यांच्‍या व्‍यक्तिमत्‍व विकासास मदत - उपसंचालक मोहन राठोड शुक्रवार, ०२ नोव्हेंबर, २०१८


पुणे :
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्‍या युवा माहिती दूत उपक्रमामुळे विद्यार्थ्‍यांच्‍या व्‍यक्तिमत्‍व विकासास मदत होईल, असे प्रतिपादन पुणे विभागाचे माहिती उपसंचालक मोहन राठोड यांनी केले. भारती विद्यापीठात युवा माहिती दूत उपक्रमाविषयी एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्‍यात आले होते.

त्यावेळी उद्घाटक म्‍हणून ते बोलत होते. अध्‍यक्षस्‍थानी राजीव गांधी माहिती व तंत्रज्ञान संस्‍थेच्‍या प्राचार्य डॉ. शमीम शेख तर प्रमुख पाहुणे म्‍हणून जिल्‍हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग, राष्‍ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम समन्‍वयक डॉ.अविनाश म्‍हेत्रे, युवा माहिती दूतचे राज्‍य समन्‍वयक कुणाल छाजेड आदी उपस्थित होते.

उपसंचालक श्री. राठोड म्‍हणाले, राज्‍याच्‍या उच्‍च व तंत्रशिक्षण विभाग, युनिसेफ यांच्‍या सहकार्याने युवा माहिती दूत उपक्रम राबविण्‍यात येत आहे. यातून विविध शाखांमध्‍ये पदवी व पदव्‍युत्‍तर शिक्षण घेणाऱ्या महाविद्यालयातील विद्यार्थ्‍यांमार्फत शासकीय योजनांची माहिती लाभार्थ्‍यांपर्यंत थेटपणे पोहोचण्‍यास मदत होणार आहे. समाजामध्‍ये शिक्षक आणि प्राध्‍यापकांविषयी आजही विश्‍वासाचे वातावरण असून त्‍यांच्‍या माध्‍यमातून मुले घडतात, देश घडतो, म्‍हणून या उपक्रमासाठी एनएसएसचे सहकार्य घेण्‍यात आले आहे. विद्यार्थ्‍यांच्‍या व्‍यक्तिमत्‍व विकासामध्‍ये एनएसएस, एनसीसी, स्‍काऊट-गाईड आदींचे महत्‍त्‍वपूर्ण योगदान असते. एनएसएसच्‍या सहकार्याने युवा माहिती दूत उपक्रम यशस्‍वी होईल, असा विश्‍वास राठोड यांनी व्‍यक्‍त केला.

जिल्‍हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांनी ज्‍या विद्यार्थ्‍यांमध्‍ये समाजकार्याची आवड आहे, त्‍यांना हा उपक्रम निश्चितच आवडेल, असे सांगितले. शासन अनुदानित वैयक्तिक लाभाच्‍या योजना तळागाळापर्यंत विद्यार्थी पोहोचवू शकतात, या निमित्‍ताने त्‍यांच्‍यामध्‍ये आत्‍मविश्‍वास वाढण्‍यास मदत होईल.

राजीव गांधी माहिती व तंत्रज्ञान संस्‍थेच्‍या प्राचार्य डॉ. शमीम शेख यांनी या कार्यशाळेतून गतीमान शिक्षणातून सामाजिक परिवर्तनाचे उद्दिष्‍ट साध्‍य होईल, असा विश्‍वास व्‍यक्‍त केला.

युवा माहिती दूतचे राज्‍य समन्‍वयक कुणाल छाजेड यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे युवा माहिती दूताच्‍या कार्यप्रणालीविषयी विस्‍तृत माहिती दिली तसेच शंकानिरसन केले. राष्‍ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम समन्‍वयक डॉ. अविनाश म्‍हेत्रे यांनी प्रास्‍ताविक केले. आभारप्रदर्शन उपप्राचार्य डॉ. ए.इ. सिंग यांनी केले. कार्यक्रमास डॉ. रमा भादेकर यांच्‍यासह पुणे, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्‍हापूर, ठाणे येथील एनएसएसचे कार्यक्रम अधिकारी उपस्थित होते.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा