महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
पालघर जिल्ह्याच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बुधवार, ०८ नोव्हेंबर, २०१७
पालघर जिल्हा मुख्यालयाचे भूमिपूजन व कोनशिला संमारंभ संपन्न

पालघर :
राज्यात उत्तम नियोजन असलेली स्थानिक व आधुनिक स्थापत्यशैलीचा संगम व आकर्षक बांधकाम असलेली पालघर जिल्हा मुख्यालयाची इमारत राज्यात सर्वात सुंदर वास्तू ठरणार आहे. त्यासोबतच हे शासकीय कार्यालय जनतेसाठीच असेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.

पालघर जिल्हा मुख्यालय भुमिपूजन व कोनशिला अनावरण कार्यक्रमांप्रसंगी श्री.फडणवीस बोलत होते. यावेळी पालकमंत्री विष्णू सवरा, सार्वजिनिक आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री डॉ.दीपक सांवत, गृह(ग्रामीण), वित्त व नियोजन राज्यमंत्री दिपक केसरकर, जिल्हा परिषद अध्यक्ष विजय खरपडे, कोकण
विभागीय आयुक्त डॉ.जगदीश पाटील, सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी, आदिवासी विकास विभागाच्या सचिव मनिषा वर्मा, जिल्हाधिकारी डॉ.प्रशांत नारनवरे, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद बोरीकर, पोलीस अधीक्षक मंजुनाथ सिंगे आदी मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, सिडकोच्या माध्यमातून यासाठी 600 कोटीची गुंतवणूक होणार आहे. राज्यातले उत्तम नियोजन असलेली जिल्हा मुख्यालयाची वास्तू पालघरची ठरेल. यासाठी निधीची कमतरता नाही. सामान्य नागरिकाला हे कार्यालय आपले वाटले पाहिजे त्यांना न्याय मिळाला पाहिजे याबाबत प्रशासनाने काळजी घेण्याची आवश्यकता आहे. जिल्हा निर्मिती होऊन तीन वर्षे झालेली आहेत. या जिल्ह्याकरिता अनेक योजना हाती घेतल्या आहेत. त्या पुढील दोन वर्षात पूर्ण केल्या जातील.

जिल्ह्यातील कुपोषण दूर करण्यासाठी विशेष टास्कफोर्सची निर्मिती केली आहे. त्या माध्यमातून कुपोषणात ४० टक्के घट झाली आहे. सेवा व जागृती यातून आदिवासी विकास होत असतो. जव्हार-मोखाडा याठिकाणी जवळपास ३००० मि.मि. पाऊस पडतो परंतु उन्हाळ्यात येथे पाणी टंचाई जाणवते. यासाठी जलसंधारण विभाग व सेवाभावी संस्था यांच्या माध्यमातून या भागात विशेष कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहे. तसेच या भागात पर्यटनालाही मोठा वाव आहे. यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार असून येथील तरुणांना पर्यटनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार आहे. यातून स्थलांतर कमी होण्यास मदत होणार आहे.

आदिवासी विभागाचे चांगले काम असून नामांकित शाळेतून राज्यातल्या २५ हजार विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला आहे. आदिवासी आश्रमशाळांमध्ये इंग्रजी व विज्ञान विषयांची गुणवत्ता वाढविण्यासाठी कराडीपथ आणि एकलव्य उपक्रम राबवीले जात आहे. 1 लाख 32 हजार विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. इंग्रजीमुळे जगाचे शिक्षण आदिवासी मुलांना मिळत आहे. केंद्रिय किचनमुळे आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना पोषण आहार उपलब्ध झालेला आहे. त्यातून कुपोषण कमी होण्यास मदत झालेली आहे. प्रधानमंत्री आवास योजना व इतर घरकूल योजनांचा लाभ सर्व आदिवासींपर्यंत पोहोचवा त्यातून सर्व आदिवासी बांधवांना स्वत:च्या हक्काची पक्की घरे मिळणारा पालघर हा पहिला जिल्हा ठरेल. परतीच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना निश्चितपणे मदत देण्यात येइल, असे यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

यावेळी पालकमंत्री विष्णू सवरा म्हणाले की, नवनिर्मित पालघर जिल्ह्याच्या मुख्यालयाचे भूमिपूजन होताना मला विशेष आनंद होत आहे. जिल्ह्याच्या विकासासाठी अनेक योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रशासनाच्या मार्फत प्रयत्न सुरु आहेत. यासाठी मुख्यमंत्री महोदयांचे मार्गदर्शन मिळत आहे. जिल्ह्यात कुपोषणाचे प्रमाण कमी झालेले आहे. जिल्ह्यात दळण-वळणाच्या चांगल्या सोयी निर्माण करीत आहोत. पेसा अंतर्गत जिल्ह्यातील ४११ ग्रामपंचायतींना याचा थेट लाभ मिळत आहे. वनहक्काची योग्य अंमलबजावणी करीत आहोत. जिल्ह्यातील सर्व प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाने विशेष प्रयत्न करत असल्याचेही सवरा यांनी यावेळी सांगितले.

यावेळी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ.सावंत म्हणाले की, टास्कफोर्सच्या माध्यमातून मला पालघर जिल्ह्यात काम करण्याची संधी मिळाली. येथील कुपोषण व बालमृत्यू कमी करण्यासाठी विशेष प्रयत्न टास्कफोर्सच्या माध्यमातून करण्यात येत आहेत. त्याला चांगले यश प्राप्त झाले आहे. मनोर येथे ट्रॉमा केअर सेंटर लवकरच सुरु करीत आहोत. पालघर जिल्हा पर्यटनासाठी अतिशय सुंदर ठिकाण आहे. पर्यटन स्थळ म्हणून विकसीत करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील. येथील जंगलात मोठ्याप्रमाणात अनेक वनऔषधीची वनस्पती उपलब्ध असल्याने येथे मोठ्या प्रमाणात औषधी कंपन्या आल्यास येथील स्थानिकांना रोजगार उपलब्ध करता येईल. यामुळे आदिवासींचे रोजगारासाठी होणारे स्थलांतर थांबविण्यासाठी मदत होईल.

यावेळी आदिवासी विकास विभागाच्या नाविण्यपूर्ण उपक्रमांची चित्रफीत दखविण्यात आली. आदिवासी आश्रमशाळांमध्ये इंग्रजी व विज्ञान विषयाची गुणवत्ता वाढविण्यासाठी कराडी पथ व एकलव्य उपक्रमांचे उद्घाटन व करारनाम्यावर स्वाक्षऱ्याही झाल्या. जिल्हा आपत्तीव्यवस्थापन प्राधिकरण पालघर पुस्तिकेचे प्रकाशनही यावेळी करण्यात आले.

यावेळी खासदार चिंतामण वनगा, खासदार कपिल पाटील, आमदार पास्कल धनारे, आनंद ठाकूर, रविंद्र फाटक, अमित घोडा, विलास तरे, माजी आमदार राजेंद्र गावीत, पालघरचे नगरअध्यक्ष उत्तम पिंपळे, सर्व विभागाचे अधिकारी, कर्मचारी व नागरिक मोठ्यासंख्येने उपस्थित होते.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा