महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
टंचाई निवारणार्थ प्रशासनाने सज्ज रहावे - पालकमंत्री अर्जुन खोतकर सोमवार, ३० जुलै, २०१८
उस्मानाबाद: पावसाळा सुरुवात होऊन देखील उस्मानाबाद जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे, त्यामुळे पाऊस पडेल अथवा न पडेल मात्र टंचाई निवारणार्थ राबविण्यासाठीच्या उपाययोजनांचा जिल्हा प्रशासनाने प्रस्ताव तयार करुन सादर करावा, असे निर्देश पालकमंत्री अर्जुन खोतकर यांनी आज येथे दिले.

मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या जिल्हा नियोजन समिती सभागृहात पालकमंत्री अर्जुन खोतकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची आढावा बैठक झाली. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष नेताजी पाटील, नगराध्यक्ष मकरंदराजे निंबाळकर, आमदार ज्ञानराज चौगुले, जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.संजय कोलते, अपर जिल्हाधिकारी पराग सोमण, जिल्हा परिषद उपाध्यक्षा सौ.अर्चनाताई पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर आडे, सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी सोमनाथ रेडडी आदींची प्रमुख उपस्थिती होती.

पालकमंत्री म्हणाले की, सध्या पाऊस कमी प्रमाणात पडल्याने टंचाई निर्माण होण्याची शक्यता असल्याने आतापासूनच प्रशासनाने पाऊले उचलणे गरजेचे आहे. पीकविमा भरण्यापासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही, यासाठी प्रशासनाने काळजी घ्यावी, भूकंपग्रस्त भागात रस्ते तयार बांधण्यासाठी विशेष प्रस्ताव तयार करुन पाठवावा, अहिल्यादेवी सिंचन विहीर प्रस्तावास तातडीने मंजूरी द्यावी, जिल्ह्यातील आठवडी बाजाराच्या ठिकाणी स्वच्छतागृहाची मोबाईल व्हॅन किंवा ग्रामपंचायतच्या वतीने सार्वजनिक स्वच्छतागृह बांधावे. उस्मानाबाद जिल्हा आकांक्षित जिल्ह्याच्या यादीत असल्याने जिल्ह्यात मोठया प्रमाणात मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून रस्त्याची कामे होण्यासाठी निकष बदलण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील.

जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या अपूर्ण कामासाठी सिध्दीविनायक मंदिर ट्रस्टच्या वतीने आठ कोटी रुपये निधी मंजूर झाला असल्याचे यावेळी पालकमंत्री श्री.खोतकर यांनी सांगितले. रेशीम विद्यापीठ मराठवाडा येथे सुरु करण्यासाठी हालचाली सुरु असून मुख्यमंत्र्यांनी यासाठी तत्वत: मान्यता दिली आहे. रेशीम शेती शेतकऱ्यांसाठी फायदयाची असल्याने जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी रेशीम शेती केली पाहिजे. यासाठी अधिकाऱ्यांनी शेतकरी मेळावे आयोजित करावेत, जिल्हा परिषदेच्या शाळा निर्लेखनाचे प्रस्तावाची कार्यकारी अभियंता यांनी दखल घ्यावी, अग्रणी बँकेच्या जिल्हा व्यवस्थापकांनी पिककर्ज वाटप, विमा प्रस्तावासाठी जागरूक राहून शेतकऱ्यांची गैरसोय होणार नाही यासाठी काळजी घ्यावी, अशा सूचना पालकमंत्री श्री. खोतकर यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या.

उस्मानाबाद जिल्हयाचे सातबारा संगणकीकरणाचे, जलयुक्त शिवार अभियानाचे काम राज्यात एक नंबरचे झाले आहे, वृक्ष लागवड देखील उदिदष्टयापेक्षा दुप्पट केल्याने पालकमंत्री श्री. खोतकर यांनी जिल्हाधिकारी श्री. गमे आणि सर्व प्रशासकीय यंत्रणाचे अभिनंदन केले. यावेळी पालकमंत्री श्री. खोतकर व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शासनाचे मुखपत्र असलेल्या “लोकराज्य” मासिकाच्या “वारी” या विशेषांकाचे प्रकाशनही करण्यात आले.

जिल्हा नियोजन अधिकारी श्री. आडे यांनी जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण), सन 2017- 18 मध्ये 148 कोटी रुपये, अनुसूचित जाती घटक कार्यक्रम 70 कोटी 79 लाख रुपये, आदिवासी उपयोजना 22 कोटी रुपये आदी बाबींच्या खर्चाचा अहवाल संगणकीय सादरीकरणाद्वारे जिल्हा नियोजन समिती समोर सादर केला. यावेळी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य, प्रशासनाच्या सर्व विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा