महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
प्रगत भारतासाठी एकजुटीने कार्य करावे - स्वातंत्र्य सैनिकांचे आवाहन गुरुवार, १० ऑगस्ट, २०१७
नवी दिल्ली : ब्रिटीश राजवटीच्या जोखडातून भारत देशाची सुटका करताना विविध आंदोलनातील सहभाग हा आमच्यासाठी अभिमानास्पद आहे. आता स्वतंत्र भारतातील विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी सर्व देशवासियांनी एकजुटीने कार्य करावे, असे आवाहन महाराष्ट्रातील स्वातंत्र्य सैनिकांनी आज महाराष्ट्र परिचय केंद्रात केले.

‘भारत छोडो आंदोलन’ आणि ‘गोवा मुक्ती’ आंदोलनात मोलाचे योगदान देणाऱ्‍या महाराष्ट्रातील स्वातंत्र्य सैनिकांचा सन्मान व अनौपचारीक गप्पांचा कार्यक्रम आज महाराष्ट्र परिचय केंद्रात आयोजित करण्यात आला, यावेळी त्यांनी हे आवाहन केले. परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे आणि जनसंपर्क अधिकारी यांनी यावेळी स्वांतत्र्य सैनिक सर्वश्री जेठालाल शाह (मुंबई उपनगर), शिवाजी मराठे (जळगाव) आणि रघुनाथ माने (सोलापूर) यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. महाराष्ट्र शासनाच्या स्वातंत्र्य सैनिक कल्याण विभागाचे उपसचिव सुरेश खाडे यांचेही पुष्पगुच्छ देऊन श्री.कांबळे यांनी यावेळी स्वागत केले.

अनौपचारीक चर्चेत बोलताना यांनी भारत छोडो आंदोलनातील सहभागावर स्वातंत्र्य सैनिक रघुनाथ माने यांनी प्रकाश टाकला. ते म्हणाले, महात्मा गांधीजींच्या ‘छोडो भारत’ आंदोलनाच्या घोषनेने प्रेरित होऊन आपण या आंदोलनात सहभागी झालो. सोलापूर जिल्ह्यातील अकलूज या जन्म गावाच्या परिसरातील ५ गावांमध्ये फेरी काढून व भित्तीपत्रक वाटून छोडो भारत चळवळीबाबत जनजागृती केली व या आंदोलनात सहभागासाठी जनतेला प्रेरित केले. त्यांच्या या कृत्यामुळे ब्रिटीश सरकारने श्री.माने यांना ९ महिन्याचा तुरुंगवास आणि १०० रूपये दंडाची शिक्षा सुनावली. सोलापूर, विजापूर आणि विसापूर येथे त्यांनी तुरुंगवास भोगला व १०० रूपये दंड वसूल करण्यासाठी ब्रिटीशांनी त्यांच्या घरातील धान्य, वस्तूची आणि सायकलची विक्री केली. यानंतर सातारा जिल्ह्यात थोर स्वातंत्र्य सेनानी क्रांतीसिंह नाना पाटील यांनी सुरु केलेले आंदोलन आणि गोवा मुक्ती आंदोलनातही श्री.माने यांनी सहभाग घेतला.

आठवणींना उजाळा देताना स्वांतत्र्य सैनिक शिवाजी मराठे म्हणाले, थोर स्वातंत्र्य सैनिक देवराम पाटील आणि विष्णू उपासनी यांच्या मार्गदर्शनाखाली वयाच्या १४ व्या वर्षी ‘गोवा मुक्ती संग्रामात’ सहभाग घेतला. बेळगावच्या सभेतील बॅरीस्टर नाथ पै यांच्या प्रेरक भाषणाने आपण आणखीच भारावून गेलो आणि आंदोलनात सक्रिय झालो. पोर्तुगिजांनी आंदोलकांना अडविण्यासाठी वाहनांवर बंदी लावल्याने श्री.मराठे यांच्यासह 30 सत्याग्रही बेळगाव, सावंतवाडी, अर्नाडा मार्गे गोव्यात दाखल झाले. पोर्तुगीज सैन्याने त्यांच्यावर लाठी चार्ज केला. ज्येष्ठ नेते तथा दिवंगत केंद्रीय मंत्री मधु दंडवते यांच्या नेतृत्वाखाली ‘गोवा मुक्ती संग्रामात’ श्री.मराठे यांना अटक व तुरुंगवास झाला.

माहिती विभागाचे माजी उपसंचालक जेठालाल शाह यांचा स्वातंत्र्य चळवळीतील आठवणींना उजाळा
स्वातंत्र्य सैनिक तथा राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे माजी उपसंचालक जेठालाल शाह यांनी भारत छोडो आंदोलनातील त्यांच्या सहभागाबाबत माहिती दिली. ते म्हणाले, महात्मा गांधीजींनी देशवासियांना ‘भारत छोडो’ चा नारा दिला तेव्हा अहमदनगर जिल्ह्यात या आंदोलनाने जोर धरला. जिल्ह्यात भूमिगत राहून स्वातंत्र्य चळवळ चालविणारे अच्युतराव पटवर्धन यांच्या मार्गदर्शनाखाली श्री.शाह यांनी भारत छोडो आंदोलनात सहभाग घेतला. याबाबतची जनजागृती करण्यासाठी त्यांनी अहमदनगर जिल्ह्यात बैठका बोलवणे, मिरवणूक, मोर्चे काढण्यात सक्रिय सहभाग घेतला. त्यांना या काळात अटकही आणि तुरुंगवासही झाला. त्यानंतर गोवा मुक्ती आंदोलनातही श्री.शाह यांनी सक्रिय सहभाग नोंदविला. श्री.शाह यांनी यावेळी माहिती विभागातील त्यांच्या अनुभवांबाबतही सांगितले.

या तीनही स्वातंत्र्य सैनिकांनी भारत देशाच्या मुक्तीसह गोवा मुक्ती आंदोलनातील आपले अनुभव मांडतानाच प्रगत भारत देशासाठी सर्वांनी एकजुटीने कार्य करण्याचे आवाहन यावेळी केले.

उपसचिव सुरेश खाडे यांनी यावेळी आपल्या मनोगतात स्वतंत्र भारताच्या निर्मितीत स्वातंत्र्य सैनिकांचे मोलाचे योगदान विशद करून त्यांच्या ज्ञानाचा उपयोग करून घेत देशाचा विकास साधला पाहिजे, असे मत व्यक्त केले. उपसंचालक दयानंद कांबळे यांनी प्रास्ताविकात सांगितले, स्वातंत्र्य सैनिकांचे योगदान अतुलनीय असून महाराष्ट्र परिचय केंद्रातील त्यांची भेट व त्यांचे मार्गदर्शन ऐतिहासिक व अविस्मरणीय आहे. उपसंपादक रितेश भुयार यांनी सूत्रसंचालन केले तर माहिती अधिकारी अंजु निमसरकर कांबळे यांनी आभार प्रदर्शन केले.

महाराष्ट्र परिचय केंद्राच्या व्टिटर हॅण्डलला फॅालो करा :
http://twitter.com/micnewdelhi
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा