महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
तलाठी सज्जा, मंडल कार्यालये अद्ययावत करणार- चंद्रकांत पाटील सोमवार, ०७ ऑगस्ट, २०१७
कोल्हापूर : ग्रामीण भागातील जनतेचा त्रास कमी व्हावा, वेळ व खर्चात बचत व्हावी, सातबारासाठी चावडीत हेलपाटे मारावे लागू नयेत यासाठी ऑनलाईन सातबारा संगणकीकरण करण्यात आला आहे. सध्या राज्यात 12 हजार तलाठी असून आणखी 4 हजार तलाठी सजे व पाचशे मंडल कार्यालये नव्याने वाढविण्यात येणार आहेत. त्यामुळे तलाठी कार्यालयांमधून अधिक चांगली सेवा ग्रामीण भागातील जनतेला मिळेल, असा विश्वास महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.

जिल्हा नियोजन समितीकडील सन 2015-16 च्या निधीमधून बांधण्यात आलेल्या भुदरगड तालुक्यातील गंगापूर येथील चावडी इमारतीचे उद्घाटन व ऑनलाईन सातबारा अज्ञावलीचा उद्घाटन समारंभप्रसंगी श्री.पाटील बोलत होते. यावेळी आमदार प्रकाश आबिटकर, पंचायत समितीच्या सभापती सरिता वरंडेकर, जिल्हा परिषद सदस्या रेश्मा देसाई, पंचायत समिती सदस्य संग्रामसिंह देसाई, कार्यकारी अभियंता एन.एम. वेदपाठक, उपविभागीय अधिकारी संपत खिलारी, गोकुळचे संचालक बाबा देसाई, सरपंच संगीता केणे, प्रवीण सावंत, नाथाजी पाटील, अलकेश कांदळकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

श्री. पाटील म्हणाले, ग्रामीण भागातील जनतेचे जिव्हाळ्याचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन कटिबद्ध असून नव्याने तलाठी सजे व सर्कल वाढविण्याच्या निर्णयाने शेतकरी व ग्रामीण जनता यांना चांगली सुविधा निर्माण होणार आहे. अनेक ठिकाणी तलाठी कार्यालये नाहीत, त्यामुळे 16 हजार अद्ययावत तलाठी कार्यालये बांधण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. गंगापूर येथे नव्याने उभारण्यात आलेली चावडीची इमारत अत्यंत प्रशस्त असून यातून लोकांना गुणवत्तापूर्ण सुविधा मिळावी. सरकार जनतेच्या प्रती असणारे आपले कर्तव्य बजावत असतेच पण गावातील लोकांनीही शासनाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी एकत्रितपणे प्रयत्न करावेत. ठिबक सिंचन पद्धती, कोल्ड स्टोरेजमधील मालावर तारण कर्ज योजना यासारख्या अनेक योजनांचा लाभ घेऊन आपले उत्पादन दुप्पट करावे. शेतीत वेगवेगळे प्रयोग करुन आपली श्रीमंती आपणच वाढविली पाहिजे. त्यासाठी राजकारण बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र यावे, असेही आवाहन यावेळी त्यांनी केले.

आमदार श्री.आबिटकर यांनी राधानगरी, भुदरगड, आजरा या आपल्या मतदारसंघातील अनेक तलाठी कार्यालयांना इमारती नाहीत. ती मिळावीत. सातबारा संगणकीकरणात देवस्थान जमिनीबाबतच्या नोंदी व्हाव्यात, तसेच चाळण उडालेल्या रस्त्यांची दुरुस्ती व्हावी अशी मागणी यावेळी पालकमंत्र्यांकडे केली.

प्रास्ताविक उपविभागीय अधिकारी संपत खिलारे यांनी केले. आभार तहसीलदार अमर वाकडे यांनी मानले. यावेळी आमदार प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते संगणकीय सातबाराचे वितरण करण्यात आले. तसेच पीओएस मशीनव्दारे धान्य वितरण, शिधापत्रिका वितरण, स्मार्ट मतदान ओळखपत्र याचे वितरण करण्यात आले.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा