महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
मराठवाडा वॉटर ग्रीडच्या माध्यमातून अकरा धरणे एकमेकांना जोडणार- बबनराव लोणीकर सोमवार, १० जून, २०१९औरंगाबाद : मराठवाड्याला कायमचे दुष्काळमुक्त करण्यासाठी मराठवाडा वॉटर ग्रीड या महत्वाकांक्षी प्रकल्पाचे काम लवकरच सुरू करण्यात येणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यात मराठवाड्यातील अकरा लहान मोठी धरणे एकमेकांना जोडून पिण्याचे पाणी
, शेती तसेच उद्योगाला लागणारे पाणी पुरविण्यात येणार असल्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी सांगितले.
 

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित मराठवाड्यातील दुष्काळा आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीला विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर आदी उपस्थित होते. 

श्री.लोणीकर म्हणाले की, मराठवाड्याला 18 टी.एम.सी. एवढ्या पाण्याची गरज आहे. वॉटरग्रीडच्या माध्यमातून मराठवाड्यात पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. वॉटरग्रीडच्या अभ्यासासाठी श्रीलंका, तेलंगणा, गुजरात आणि इस्त्राईलचा दौरा करण्यात आला आहे. या वॉटरग्रीडसाठी इस्त्राईलने डीपीआर बनवून दिला असून पहिल्या टप्प्यातील 10 हजार कोटी रुपयांच्या निधीला मंत्रीमंडळाने मान्यता दिली आहे. या वॉटरग्रीडच्या माध्यमातून 1330 किलोमिटरची पाईपलाईन टाकण्यात येणार आहे. 

मराठवाड्यातील जनतेचा पाणीप्रश्न कायमचा मार्गी लावण्यासाठी उभारण्यात येणाऱ्या मराठवाडा वॉटर ग्रीडच्या कामाचे सादरीकरण ग्रीड यासंदर्भात मेकोरेट कंपनीने सादरीकरण केले. 

मराठवाडा वॉटर ग्रीडच्या कामाला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असून त्यासाठी जवळपास 10 हजार 595 कोटी रुपये खर्च येणार आहे. या बैठकीमध्ये जनावरांच्या चारा छावण्या, शेळ्या-मेंढ्यांच्या चारा छावण्या, पाण्याचे टँकर, पाणीपुरवठा योजना, दुष्काळी अनुदान वाटप इतर उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला. 

मेकरोट कंपनीने पिण्याचे पाणी व औद्योगिक वापरासाठी ग्रीड पद्धतीची योजना करण्याचा अहवाल सादर केला आहे. कंपनीने पिण्याचे पाणी व औद्योगिकसाठी लागणारे पाणी अशी ग्रीड निर्माण करण्याचा पर्याय सुचवला आहे. 30 वर्षासाठी म्हणजे 2050 वर्षासाठी पर्यन्त पाणीपुरवठा करण्यासाठी प्रस्तावित आहे. 2050 मध्ये 960 दशलक्ष घनमीटर एकूण पाण्याची आवश्यकता लागणार आहे. यामध्ये नागरी, ग्रामीण व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा समावेश करण्यात आला आहे. मराठवाड्यात ग्रीडद्वारे अशुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यासाठी 1330 किलोमीटर लांबीच्या मुख्य पाईपलाईनवर मराठवाड्यातील सर्व 11 धरण जोडन्यात येणार आहेत. त्यानंतर प्रत्येक तालुक्यात दोन ते तीन ठिकाणापर्यंत पाणी पोहोचविण्यासाठी एकूण 3220 किलोमीटर पाईपलाईन टाकणे प्रस्तावित आहे. या पाईपलाईनपासून कोणत्याही गावाचे अंतर वीस ते पंचवीस किलोमीटर राहील. त्यामधून सर्व गावांना गरजेच्यावेळी पाणीपुरवठा करता येणार आहे. तालुकास्तरावर पाणी पोहोचविण्यासाठी दुय्यम जलवाहिनीसाठी अंदाजे  4074 कोटी एवढा खर्च अपेक्षित आहे. सदर खर्च अंदाजीत असून यामध्ये 20 टक्के आकस्मिक खर्च व भाववाढ  1585 कोटी गृहीत धरल्यास एकूण खर्च 9015 कोटी एवढा अपेक्षित आहे यंत्रसामग्री यासाठी अंदाजे 1080 कोटी रुपयांचा अतिरिक्त खर्च अपेक्षित आहे, बैठकीनंतर माध्यम प्रतिनिधीशी बोलताना श्री. लोणीकर यांनी सांगितले.
 

लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मराठवाडा वॉटर ग्रीडच्या कामाच्या शुभारंभ औरंगाबादमधून करणार असल्याचे श्री. लोणीकर यानी सांगितले. या बैठकीला मराठवाड्यातील लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. 
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा