महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
मराठी भाषा संवर्धन पंधरवडानिमित्त कोकण भवन येथे ग्रंथप्रदर्शन गुरुवार, १० जानेवारी, २०१९

नवी मुंबई : विभागीय आयुक्त कार्यालय, कोकण विभाग व  भाषा संचालनालय विभागीय कार्यालय, मुंबई व कोकण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा पंधरवडा निमित्त आयोजित कोकण भवन येथील ग्रंथ प्रदर्शन व विक्री कार्यक्रमाचे उद्घाटन विभागीय महसूल आयुक्त डॉ.जगदीश पाटील यांच्या हस्ते आज करण्यात आले. या कार्यक्रमास उपसंचालक (माहिती) डॉ.गणेश मुळे, प्रभारी विभागीय सहायक भाषा संचालक श्रीमती विजया माळगांवकर, नायब तहसिलदार श्रीमती माधुरी डोंगरे उपस्थित होते.

हे ग्रंथ प्रदर्शन दि.19 जानेवारी 2019 पर्यंत सकाळी 10.30 ते सायंकाळी 6.00 वाजेपर्यंत यावेळेत कोकण भवन येथे सुरु राहणार आहे.

डॉ.पाटील म्हणाले की, मराठी भाषेच्या संवर्धनासाठी शासनाने मराठी भाषा पंधरवडा हा उपक्रम हाती घेतला आहे. मराठी भाषेचा प्रचार, प्रसार आणि जतन व्हाव हाच या उपक्रमाचा हेतू आहे. विचारांचे मौलिक मार्गदर्शन आपल्याला ग्रंथातूनच मिळते. सर्वांसाठी हे  प्रदर्शन उपयुक्त असून या ग्रंथ प्रदर्शनाचा लाभ सर्वांनी घ्यावा.

श्रीमती माळगांवकर म्हणाल्या की, भाषा संचालनालयाच्या विविध परिभाषा कोशांचा व प्रकाशनांचा तसेच महाराष्ट्र शासनाच्या प्रकाशनांचा परिचय व्हावा आणि ही प्रकाशने वाचकांना खरेदी करता यावीत या दृष्टीने  ग्रंथ प्रदर्शन व विक्री कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. वाचनसंस्कृती जपण्यासाठी महाराष्ट्र शासनाने मराठी भाषा पंधरवडा साजरा करण्याचे निर्देश दिले आहेत.

या कार्यक्रमास श्रीमती मिना गुरुसिद्धनवर, श्रीमती गायत्री प्र. नगराळे, नरेंद्र हवालदार, प्र.का.भोईर आदी भाषा संचालनालयातील कर्मचारी उपस्थित होते. तरी या ग्रंथ प्रदर्शनाचा लाभ वाचकप्रेमींनी घ्यावा, असे आवाहन आयोजकामार्फत करण्यात आले आहे. मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त कोकण भवन येथे
लोकराज्य स्टॉल

नवी मुंबई : मराठी भाषा संवर्धन पंधरवडानिमित्त कोकण भवन येथील ग्रंथ प्रदर्शनात माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या लोकराज्य मासिकाचा स्टॉल लावण्यात आला आहे. या स्टॉलला दिवसभरातून शेकडो लोकांनी भेट दिली.

लोकराज्य या मासिकामध्ये शासकीय योजना व निर्णय यांची माहिती देण्यात येते.  शासनाच्या विविध योजनांची माहिती नागरिकांना व्हावी आणि हा अंक जास्तीत जास्त जनतेपर्यंत पोहोचावा यासाठी लोकराज्य स्टॉल या ग्रंथ प्रदर्शनात लावण्यात आला आहे.

या स्टॉलवर क्रीडा विशेषांक, महिला विशेषांक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर विशेषांक, राजर्षी छत्रपती शाहू महाराज विशेषांक, पर्यावरण विशेषांक, वारी विशेषांक, परिवर्तन कथा विशेषांक आदि विविध विशेषांक ठेवण्यात आले आहेत. तसेच महामानव ही पुस्तिका या प्रदर्शनात विक्रीसाठी ठेवण्यात आली आहे.

'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा