महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
मिशन डिस्टींक्शन अंतर्गत स्काय बलूनद्वारे मतदान जागृती मोहीम रविवार, १४ एप्रिल, २०१९लातूर :
भारत निवडणूक आयोगाने भारतीय लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मतदानाच्या प्रक्रियेत जास्तीत जास्त मतदारांचा सहभाग वाढावा यासाठी स्वीप (SVEEP) हा मतदार जागृतीचा कार्यक्रम सुरु केलेला आहे. त्याच अनुषंगाने लातूर जिल्हयात जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्या मार्गदशनाखाली मिशन डिस्टींक्शन हा उपक्रम राबवून संपूर्ण जिल्ह्यात मतदानाचे प्रमाण वाढण्यासाठी विविध जनजागृतीपर उपक्रम राबविले जात आहेत. त्यापैकीच एक उपक्रम असलेला स्काय बलूनच्या माध्यमातून नागरिकांचे लक्ष वेधून घेतले जात असून यातून मतदारांनी दिनांक 18 एप्रिल 2019 रोजी मतदान करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

लातूर शहरात नवीन जिल्हाधिकारी कार्यालय, शिवाजी चौक, क्रीडा संकूल, एलआयसी ऑफीस, शासकीय विश्रामगृह व नांदेड नाका या सहा ठिकाणी तर निलंगा, चाकूर, अहमदपूर व उदगीर तहसील कार्यालयाच्या परिसरात स्काय बलूनव्दारे दिनांक 18 एप्रिल 2019 रोजी मतदारांनी मतदान करण्याचे आवाहन “मी मतदार करणारच ” असा निर्धार व्यक्त करुन करण्यात येत आहे. या सर्व ठिकाणाच्या परिसरातील नागरिकांमध्ये जिल्हा प्रशासनाने स्काय बलूनव्दारे जनजागृतीचा हा अनोखा उपक्रम राबविल्याबद्दल चर्चा होत असून गुरुवार दिनांक 18 एप्रिल रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 या कालावधीत मतदान केंद्रावर जाऊन मतदान करण्यासाठी प्रोत्साहन मिळत आहे.

भारतीय लोकशाहीच्या या महा उत्सावात प्रत्येक नागरिक सहभागी व्हावा म्हणून प्रशासन वेगवेगळं प्रयोग करुन मतदारांमध्ये मतदान प्रक्रियेविषयी जागृती घडवून आणत आहे. लातूर जिल्हयात ही जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्या संकल्पनेतून विविध मतदार जागृतीचे उपक्रम जिल्हा , तालुका व ग्रामीण पातळीवर सुरु असून स्वीप अंतर्गत मिशन डिस्टींक्शन हा उपक्रम जिल्हयाच्या शहरी व ग्रामीण भागातील प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचविला जात आहे.

“मी मतदान करणारच ” हे स्काय बलून वरील वाक्य हे प्रत्येक लातूर जिल्हावासियांचा निर्धार झाला पाहीजे. यासाठी प्रत्येक मतदारांने आपला मतदानाचा हक्क बजावून भारतीय लोकशाहीला अधिक बळकट करुन देशाला सामर्थ्यशाली बनविण्यासाठी प्रत्येकाने आपलं कर्तव्य आनंदाने व उत्साहाने पार पाडावे, असे आवाहन या लक्षवेधी बलूनच्या माध्यमातून जिल्हा प्रशासन करत आहे. व तुम्हाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

तसेच स्वीप अंतर्गत माध्यम संवाद कक्ष लातूरच्या माध्यमातून जवळपास लातूर शहरासह जिल्ह्यातील 13 होर्डिंग व्दारे दोन टप्प्यात मतदान जागृती कार्यक्रम राबविला जात आहे. पहिल्या टप्प्यात दिनांक 18 एप्रिल ही मतदानाची तारीख व मतदानाची शाई लावलेले बोट हा मजकूर घेऊन जागृती करण्यात आली. तर दुसऱ्या टप्प्यात राष्ट्रीय महात्यौहार, मतदानाचा दिनांक व मी मतदान करणारच हा निर्धार करण्यात आला. त्याप्रमाणेच लातूर शहरात शेकडो लहान लहान लक्षवेधी बॅनर्सच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकांच्या मनावर लातूर लोकसभा मतदार संघाच्या मतदानाची तारिख दिनांक 18 एप्रिल 2019 बिंबविण्याचा प्रयत्न केला जात आहे. 

या उपक्रमास यश प्राप्त होत आहे. तसेच लातूरचा महाउत्सव ही शॉर्ट फिल्म व जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांचे दिव्यांग, महिला व इतर सर्व मतदारांना मतदान करण्याचे आवाहन करणाऱ्या बाईट सोशल मिडियाच्या माध्यमातून व्हायरल करुन जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत प्रशासन पोहोचण्यासाठी प्रयत्नशील आहे. जिल्हा प्रशासनाने राबविलेल्या या सर्व उपक्रमाला किती यश प्राप्त होते हे दिनांक 18 एप्रिल 2019 रोजी समजेल, परंतु सध्या प्रशासनाने केलेले प्रयत्न पाहता मिशन डिस्टिंक्शन हा उपक्रम नक्कीच यशस्वी होईल असे वाटते.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा