महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
उर्दू भाषिकांसाठी उर्दू लोकराज्य उपयुक्त - प्राचार्या हमीदा खान सोमवार, ०७ ऑगस्ट, २०१७
बाबासाहेब धाबेकर उर्दू अध्यापिका विदयालयात पार पडला उर्दू लोकराज्य वाचक मेळावा

अकोला :
शासनाच्या कल्याणकारी योजना, निर्णय, उपक्रम यांची माहिती देणारे उर्दू लोकराज्य एकमेव मासिक आहे, हे मासिक शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने दरमहा प्रकाशित करण्यात येते, याचा लाभ उर्दू भाषिकांनी विशेषत: उर्दूतून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी जरूर घ्यावा, असे आवाहन बाबासाहेब धाबेकर उर्दू अध्यापिका विद्यालयाच्या प्राचार्या हमीदा खान यांनी केले.

जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने उर्दू लोकराज्य वाचक मेळाव्याचे आयोजन आज सदर विद्यालयात करण्यात आले होते, त्यावेळी श्रीमती खान बोलत होत्या. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी प्रमोद धोंगडे, नितीन डोंगरे, डॉ. जकी जावेद आदींसह शिक्षक व मोठ्या संख्येने विदयार्थींनी उपस्थित होत्या.

उर्दू लोकराज्य मासिकाची माहिती जास्तीत जास्त उर्दू वाचकांपर्यंत पोहचवावी यासाठी सदर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मासिकाबद्दल माहिती देताना श्री. धोंगडे म्हणाले की, राज्य शासनाचे मुखपत्र लोकराज्य हे मासिक दरमहा मराठी, इंग्रजी, हिंदी, उर्दू व गुजराथी या भाषेत प्रसिद्ध करण्यात येते. या मासिकामध्ये राज्य शासनाने घेतलेले निर्णय, शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या कल्याणकारी योजना, अल्पसंख्याकांच्या योजना, मंत्रिमंडळाचे निर्णय, महाराष्ट्राची ऐतिहासिक, भौगोलिक आणि सांस्कृतिक माहितीचा समावेश असतो. स्पर्धा परिक्षाची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे मासिक अत्यंत उपयुक्त आहे. उर्दू लोकराज्य मासिकाची वार्षिक वर्गणी रु. 50 असून वर्गणीदाराला वर्षभर अंक पोस्टाने घरपोच पाठविला जातो. तसेच हे अंक बुक स्टॉलवरही विक्रीसाठी उपलब्ध आहेत. वर्गणीदार होण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालयाशी संपर्क साधावा. जास्तीत जास्त उर्दू भाषिक नागरिकांनी उर्दू लोकराज्य मासिकाचे वर्गणीदार व्हावे, असे आवाहनही यावेळी श्री. धोंगडे यांनी केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. डोंगरे यांनी केले. उर्दू लोकराज्य मासिकाच्या उपयुक्ततेबद्दल त्यांनी यावेळी माहिती दिली. सूत्रसंचालन डॉ.जकी जावेद यांनी केले. यावेळी विद्यार्थ्यांना उर्दू लोकराज्यचे अंक भेट देण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी जिल्हा माहिती कार्यालयाचे कर्मचारी हबीब शेख, किसन कडू, सुनील टोमे यांनी परिश्रम घेतले.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा