महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
जिजामातेचे विचार अंगिकारावे - पालकमंत्री यशोमती ठाकूर रविवार, १२ जानेवारी, २०२०
अमरावती : राजमाता जिजाऊ, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी समाजाच्या हितासाठी आयुष्य वेचले. राजमाता जिजाऊ यांचे राष्ट्राच्या जडणघडणीत मोठे योगदान आहे. समाजाच्या उन्नतीसाठी त्यांचे विचार सर्वांनी अंगिकारावे, असे आवाहन महिला व बालविकासमंत्री तथा पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी आज येथे केले.
कॅम्प स्थित राजमाता जिजाऊ स्मारक येथे जिजाऊ जन्मोत्सव आयोजन समितीद्वारे जिजाऊ जन्मोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या. खासदार अमोल कोल्हे, खासदार नवनीत राणा, आमदार सुलभा खोडके, आमदार रवि राणा, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष अश्विन चौधरी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

राजमाता जिजाऊ या राष्ट्रीय प्रेरणेच्या स्रोत आहेत. त्यांचे विचार व कार्य यापासून प्रेरणा घेऊन महिलांनी विविध क्षेत्रात कामगिरी करावी, असे आवाहन श्रीमती ठाकूर यांनी केले.
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेसाठी स्वत:चे आयुष्य वेचले. स्वतंत्रता व पराक्रमाची शिकवण ज्या मातेने आपल्या संस्कारातून दिली, त्या मातेचे नाव राजमाता ‘जिजाऊ’ होय. जिजाऊ माँसाहेबांचे कार्य, विचारातून प्रेरणा घेऊन त्यांनी दाखविलेल्या मार्गावर सर्वांनी मार्गक्रमण करावे, असे आवाहन खासदार डॉ. कोल्हे यांनी केले.
दीप प्रज्वलन आणि प्रतिमेचे पूजन करुन कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. प्रा. भोजराज चौधरी व प्रा. राजेश उमाळे यांनी जिजाऊ वंदना प्रस्तुत केली. यावेळी मान्यवरांचा शाल, श्रीफळ व स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
जन्मोत्सव कार्यक्रमात जगदंबा ढोल-ताशा पथमाने माँ जिजाऊ यांना मानवंदना दिली. जिजाऊ ब्रिगेड व महिला उद्योजक कक्षाव्दारे जिजा नाटक, नूतन मूकबधीर विद्यालयाच्या सायली जुमरने हिने पोवाडा, शीतल मेटकरद्वारा शिवशौर्य गाथा आदींची प्रस्तुती करण्यात आली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या राष्ट्रवंदनेने कार्यक्रमाची सांगता झाली.

'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा