महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य द्या - अश्विनी कुमार बुधवार, १६ मे, २०१८
राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथकाने साधला शेतकऱ्यांशी थेट संवाद

औरंगाबाद :
शेतकऱ्यांना आवश्यक असणारी लागवडी योग्य पिके, आवश्यक तंत्रज्ञान, औषधी फवारणी, पिकांसाठी घ्यावयाची काळजी याबाबत वेळेत मोठ्याप्रमाणात जनजागृती करावी व शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य द्यावे, अशा राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथकाचे प्रमुख तथा केंद्रीय सहसचिव अश्विनी कुमार यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना आज सूचना केल्या.

औरंगाबाद तालुक्यातील गाढे जळगाव, शेकटा, फुलंब्री तालुक्यातील डोंगरगाव कवाड आणि पाथरी येथील शेतकऱ्यांशी थेट संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी राज्य कृषी आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी उदय चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर, उपविभागीय अधिकारी मंजुषा मुथा, सोमनाथ जाधव आदी उपस्थित होते.

गाढेजळगाव येथे शेतकरी जाबेर सय्यद, उपसरपंच अब्दुल रहीम पठाण यांच्याशी संवाद साधून बोंडअळीने झालेल्या नुकसानीबाबत केंद्रीय पथकाने त्यांच्याशी ग्रामपंचायत कार्यालयात चर्चा केली. तसेच तुकाराम मारोती ठोंबरे यांच्या शेतात जाऊन पाहणी केली. त्यानंतर शेकटा येथे दत्तात्रय जाधव, मनोज वाघ, युनूस भाई यांच्याशीही पथकाने कापूस लागवड, पेरा, बोंडअळी, वेचणी, उत्पादन, फवारणी याबाबत आलेल्या अडचणी याविषयी संवाद साधला.

तसेच फुलंब्री तालुक्यातील डोंगरगाव कवाड येथील हनुमान मंदिरात भीमराव एकनाथ भोपळे, उत्तम भोपळे, भास्कर डकले यांच्याशीही कापूस पीक लागवड, पीक विमा याबाबत विचारपूस केली. डॉ.भापकर यांनी मागेल त्याला शेततळे, तुतीची लागवड याबाबत येथील शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

पाथरी येथे दत्ताभाऊ पाथरीकर, दगडू बंडू बन्सोड, शिवाजी पाथरीकर, राजू तुपे, साहेबराव खाकरे, ग्रामस्थ यांच्याशीही मुक्तसंवाद साधताना अश्विनी कुमार यांनी पराटीचा वेळीच बंदोबस्त करावा. त्यामुळे येणाऱ्या पिकांवर देखील परिणाम होतो म्हणून तात्काळ त्यांची विल्हेवाट लावावी, असे आवाहन केले.

विभागीय आयुक्त डॉ. भापकर, श्री.सिंह, श्री. चौधरी यांनी येथील शेतकऱ्यांना मागेल त्याला शेततळे, तुती लागवड, ठिबक सिंचन करण्यासाठी आवाहन केले. शासन तुमच्या पाठिशी खंबीरपणे उभे असल्याचा विश्वासही ग्रामस्थांना त्यांनी दिला.

पथकाच्या सदस्यांना कृषीविषयक लागवडीखालील क्षेत्र, कापूस लागवड, कृषी विभागाने पार पाडलेली कार्यवाही याबाबत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजीव पडवळ, जिल्हा कृषी विकास अधिकारी श्री.गंजेवार, कृषी सेवक, तालुका कृषी अधिकारी यांनी माहिती दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयात सादरीकरण
शेतकऱ्यांना पीक, पिकांबाबत घ्यावयाच्या काळजीविषयी मोठ्याप्रमाणात जनजागृती करावी, प्रगतीशील शेतकऱ्यांना नवं माध्यमांचा वापर करून एकत्रित आणावे व जागृती करावी. एसएमएस सेवेचा लाभ शेतकऱ्यांना तात्काळ उपलब्ध करून द्यावा, शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये यावर प्रभावी कार्यवाही करावी, असे कृषी अधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत केंद्रीय पथक प्रमुख अश्विनी कुमार यांनी सूचना केल्या.

यावेळी पथक प्रमुख आणि सर्व सदस्य यांचे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. भापकर यांनी मराठवाड्यातील पाऊस, खरीप, रब्बी पिके, गुलाबी अळी आणि व्यवस्थापन याबाबत सादरीकरण केले. तसेच परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या डॉ. पी.आर. झंवर यांनी गुलाबी बोंड अळी आणि त्याबाबत घ्यावयाच्या काळजी बाबत सादरीकरण सादर केले.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा