महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
शेगाव-पंढरपूर महामार्गाच्या कामास सहकार्य करा - पालकमंत्री बबनराव लोणीकर सोमवार, ०६ ऑगस्ट, २०१८
शेगाव-पंढरपूर महामार्ग राज्यात मॉडेल ठरणार
परतूर शहरासाठी अतिरिक्त न्यायालयाला मंजुरी

जालना :
शेगाव ते पंढरपूर हा 430 किलोमीटरचा 2 हजार कोटी रुपयांचा रस्ता तयार करण्यात येत असुन मंठा व परतूर मतदारसंघाचे भाग्य बदलणाऱ्या या रस्त्याच्या कामास सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन करत हा महामार्ग राज्यात मॉडेल ठरेल, असा विश्वास पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी व्यक्त केला.

परतूर येथे खामगाव-पंढरपूर या पालखी महामार्गाच्या काँक्रिटीकरणाच्या कामाचा शुभारंभ पालकमंत्री श्री.लोणीकर यांच्या हस्ते आज करण्यात आला. त्याप्रसंगी उपस्थिताना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राहूल लोणीकर, कार्यकारी अभियंता श्री.जाधव, उपअभियंता कोटेचा आदींची उपस्थिती होती.

पालकमंत्री श्री.लोणीकर म्हणाले की, राष्ट्रीय महामार्ग अंतर्गत दिंडी मार्ग म्हणून खामगाव-लोणार-मंठा-परतूर-माजलगाव-कळंब-बार्शी-पंढरपुर-सांगोला या 430 किलोमीटरच्या रस्त्याचे काम अत्यंत वेगाने करण्यात येत आहे. हा मार्ग पूर्ण झाल्यास परिसराचा विकास होण्याबरोबरच बेरोजगारांना मोठ्या प्रमाणात रोजगारांच्या संधी उपलब्ध होणार आहेत. शेगाव ते पंढरपूर मार्गे जालना या मार्गावर गतकाळात अपघातामध्ये दहा वारकऱ्यांना प्राण गमवावे लागले होते. विदर्भातील प्रत्येक भाविकांना पंढरपूर या श्रद्धास्थानापर्यंत कमी वेळात पोहोचता यावे यासाठी नवीन दिंडी मार्ग होणे आवश्यक होते. त्यामुळे शेगाव ते पंढरपूर मार्गे लोणार-परतूर-माजलगाव हा मार्ग व्हावा अशी मागणी वेळोवेळी नागपूर व दिल्ली येथे जाऊन केंद्रीय वाहतूक मंत्री नितीनजी गडकरी यांच्याकडे केल्याने हा रस्ता तातडीने मंजूर करण्यात आला असल्याचेही पालकमंत्री श्री.लोणीकर यांनी यावेळी सांगितले.

शेगाव खामगाव ते पंढरपूर मार्गे लोणार-मंठा-परतूर-आष्टी-लोणी-माजलगाव या महामार्गाचे काम सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे. काम सध्या या रस्त्याचे काम वेगात सुरू असून परतूर मतदारसंघात या रस्त्याची लांबी ९५ किलो मीटर आहे. ह्या रस्त्याचे काम मेघा इंजिनिअरिंग व इन्फ्रा कंपनी हैदराबाद यांना देण्यात आले असून संपूर्ण रस्ता हा सिमेंट काँक्रीटचा असून त्यामुळे येणाऱ्या काळात सुसज्ज अद्ययावत सिमेंट रस्ता पहायला मिळणार आहे. खामगांव-पंढरपुर सिमेंट-कॉंक्रीट महामार्ग राज्यात मॉडेल ठरेल, असा विश्वासही पालकमंत्री श्री.लोणीकर यांनी यावेळी व्यक्त केला.

पालखी महामार्गामुळे सहा लाख वारकऱ्यांचा प्रश्न मार्गी लागणार असून हा रस्ता विदर्भ, मराठवाडा मार्गे पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा असून सर्वात कमी लांबीचा रस्ता राहणार असून दोन हजार कोटी रुपये या संपूर्ण रस्त्यावर खर्च करण्यात येत असून यामुळे मराठवाड्याच्या विकासाला मोठ्या प्रमाणात चालना मिळणार आहे. या रस्त्यामुळे मंठा व परतूर शहर महाराष्ट्राच्या नकाशावर येणार आहे. यामुळे या दोन्ही शहरासह तालुक्यातील दळणवळणाची सुविधा वाढण्यास मदत होणार आहे, त्यामुळे स्थानिक रोजगार वाढण्यास मदत होणार असल्याचेही पालकमंत्री श्री.लोणीकर यांनी यावेळी सांगितले.

शेगाव-पंढरपूर या रस्त्याच्या कामासाठी लागणारी माती, मुरुम, खडी आदी बाबींसाठी कंत्राटदारास शासनाकडे रॉयल्टी भरावी लागते. परंतू या संदर्भात वृत्तपत्राच्या माध्यमातून नकारात्मक बातम्या येत असल्याचे सांगत या रस्त्याच्या कामापोटी वापरण्यात आलेल्या मुरूम, खडी, माती यासाठी परतूर व मंठा या तालुक्यातील प्रत्येकी 3 कोटी रुपये रॉयल्टी म्हणून संबंधित कंत्राटदाराने शासनाला अदा केले असल्याचेही पालकमंत्री श्री.लोणीकर यांनी यावेळी सांगितले.

जालना, परतूर व मंठा तालुक्यातील 176 गावांना ग्रीडद्वारे पाणी पुरवठ्यासाठीचे काम अत्यंत वेगाने करण्यात येत असल्याचे सांगत या योजनेचे 60 टक्के काम पूर्ण झाले आहे. येणाऱ्या काळात या योजनेच्या माध्यमातुन 176 गावांना स्वच्छ व शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यात येणार असल्याचे सांगुन मंठा व परतूर तालुक्याचा सर्वांगिण विकास करण्यावर भर देण्यात येत आहे. मंठा व परतूर येथे न्यायालयाच्या इमारतीसाठी 6 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. या दोनही तालुक्यातील जनतेला त्यांच्या न्यायालयीन प्रकरणांसाठी जालना येथील सत्र न्यायालयात यावे लागते. या भागातील जनतेचा त्रास वाचावा व त्यांना कमी वेळात न्याय मिळण्याबरोबरच त्यांचा श्रम व पैसा वाचावा यासाठी परतूर येथे अतिरिक्त न्यायालयास मंजुरी मिळाली असल्याचे सांगत परतूर शहरातील 18 ट्रान्सफार्मवर 400 पोलच्या केबलसाठी 6 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहितीही पालकमंत्री श्री.लोणीकर यांनी यावेळी दिली.

कार्यक्रमास पदाधिकारी, अधिकारी यांच्यासह नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा