महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
शेतकऱ्यांना मोठे करण्यासाठी योजनांची यशस्वी अंमलबजावणी व्हावी- पालकमंत्री रवींद्र चव्हाण शुक्रवार, १२ जुलै, २०१९


पालघर
: शेतकरी मोठा झाला पाहिजे यासाठी शासन विविध महत्वाकांक्षी योजना राबवित आहे. पालघर जिल्ह्यात भाताचे पिक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते, शासनाचा उद्देश सफल होण्यासाठी जव्हार तालुक्यातील भात खरेदीचे प्रमाण वाढविण्याबाबत संबंधित यंत्रणांनी प्रयत्न करावेत, असे निर्देश राज्यमंत्री तथा पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिले. जव्हार तालुक्यात भात प्रक्रिया केंद्र सुरू करण्याबाबत प्रयत्न व्हावेत, अशी सूचनाही त्यांनी केली.

जव्हार तालुक्यातील विकास कामांचा श्री चव्हाण यांनी शुक्रवारी आढावा घेतला. आदिवासी विकास विभागाच्या सभागृहात या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विजय खरपडे, आमदार पास्कल धनारे, मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद बोरीकर, आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी अजित कुंभार, अपर जिल्हाधिकारी श्रीधर डुबे पाटील यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी, सर्व विभागांचे वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.

श्री चव्हाण म्हणाले, केंद्र आणि राज्य शासन ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांसाठी विविध महत्वकांक्षी योजना राबवित आहेत. विशेषतः शेतकरी आणि आर्थिक दुर्बल घटकांसाठी या योजना अत्यंत उपयुक्त अशा आहेत. या योजनांची अंमलबजावणी करताना लाभार्थ्यांना या योजनांचे महत्त्व समजावून सांगावे, अशी सूचना पालकमंत्र्यांनी केली.

ते म्हणाले, आयुष्मान भारत, किसान सन्मान निधी, कृषी विभागांतर्गत वैयक्तिक लाभाच्या योजना यासह पाणीपुरवठा योजना, भात खरेदी केंद्र, वीज पुरवठा केंद्र अशा ग्रामीण भागासाठी महत्त्वपूर्ण योजना शासनामार्फत राबविण्यात येतात. या सर्व योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. तालुका कुपोषणमुक्त होण्यासाठी या प्रयत्नांमध्ये वाढ होणे गरजेचे आहे. रायतळी येथे पाणीपुरवठा प्रकल्प उभारण्यासाठी संबंधित गावांमधून विशेष ग्रामसभा घेऊन ठराव करणे आणि त्यास वन विभागाची मान्यता ही प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, विजेचा प्रश्न सोडविण्यासाठी नियोजित चालतवड येथे जागा उपलब्ध होत नसल्याने बोराळे उपकेंद्र शेजारी जागा उपलब्ध करून घेण्याची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी, आयुष्मान भारत योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना कार्ड वाटप लवकर पूर्ण करून त्यांना या योजनेचे महत्त्व समजावून सांगावे, किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची माहिती तातडीने पूर्ण करावी, जातीच्या दाखल्याचे वाटप तातडीने पूर्ण करावे अशा सूचना देखील पालकमंत्र्यांनी केल्या.

आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात उभारण्यात आलेल्या आदिवासी कलाकृतींचे प्रदर्शनी दालन व विक्री केंद्र 'ट्राईब्ज पालघर' चे उदघाटन पालकमंत्री श्री चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.

पालकमंत्र्यांनी येथील पतंगशाह कुटीर रुग्णालयास भेट देऊन खरोंडा येथील आईने विष दिल्यानंतर बचावलेल्या बालकाच्या प्रकृतीची विचारपूस केली.

या दौऱ्याप्रसंगी येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या आवारात पालकमंत्री श्री चव्हाण आणि मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा