महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
पायाभूत सोयी सुविधांच्या निर्माणामधून प्रशासनाची गतिमानता वाढते- पालकमंत्री डॉ. संजय कुटे सोमवार, १२ ऑगस्ट, २०१९

  • जिल्हा पोलीस अधिक्षक इमारत, उपविभागीय पोलीस इमारत व निवासस्थानांचे भूमीपुजन
  • जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयाची होणार सुसज्ज इमारत
  • ११५ निवासस्थाने, तीन कोटी रूपयांचा प्रोजेक्ट

बुलडाणा :  राज्यात कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम पोलीस विभाग करीत असतो. या विभागाच्या कामकाजामुळे राज्यात शांतता नांदत असते. प्रशासन कुठलेही असो, त्यासाठी पायाभूत सोयी-सुविधा असल्या पाहिजेत. पायाभूत सोयी सुविधांच्या निर्माणामधून प्रशासनाची गतिमानता वाढते, असे प्रतीपादन पालकमंत्री डॉ. संजय कुटे यांनी केले.

जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय व ११५  शासकीय निवासस्थानांचा भूमिपूजन समारंभ पोलीस मुख्यालयातील प्रभा हॉलमध्ये पार पडला. यावेळी आमदार हर्षवर्धन सपकाळ, अमरावती विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक मकरंद रानडे, जिल्हाधिकारी डॉ निरूपमा डांगे, महाराष्ट्र पोलीस गृहनिर्माण मंडळाच्या अधिक्षक अभियंता लीना उपाध्ये, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ दिलीप पाटील – भुजबळ आदी उपस्थित होते.

   
डॉ. कुटे यांनी कुदळ मारून भूमीपूजन केले. डॉ. कुटे म्हणाले, काम करण्याचे ठिकाण चांगले असल्यास कामाचा उत्साह वाढतो. तसेच क्षमता वृद्धी होते. जिल्ह्यात सर्वच पोलीस स्टेशनच्या इमारती सुसज्ज करण्याचा प्रयत्न राहणार आहे. तसेच पोलीस कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानेही प्रशस्त करण्यात येणार आहेत. जिल्ह्याचा समतोल विकास साधण्यासाठी निधीचा उपयोग केल्या जाणार आहे. मागास राहिलेले तालुके विकासाच्या प्रवाहात पुढे आणण्यासाठी त्या तालुक्यांमध्ये जास्तीचा निधी देण्यात येईल. मागास भागाचा विकास झाल्यानंतरच जिल्ह्याचा सर्वांगीण विकास होईल.

 
पोलीस मुख्यालयाची सध्याची इमारत ब्रिटीशकालीन असून जवळपास १०६ वर्ष जुनी आहे. या ठिकाणी आता भव्य सुसज्ज अशी इमारत साकारणार आहे. अधिकारी अथवा कर्मचारी ज्यावेळी कर्तव्य बजावत असतो. त्यावेळी त्याच्या कुटूंबालासुद्धा तो सोबत ठेवून काम करतो. अशावेळी त्याच्या मुलांनासुद्धा शिक्षण, आरोग्याच्या सोयी तेथे असल्या पाहिजेत. या भावनेतून जळगाव जामोद व संग्रामपूर या मागास भागात सुविधा निर्माण करण्यात येत आहे. राज्यातील एकमेव शासकीय सीबीएससी विद्यालय जळगांव जामोद येथे मंजूर झाले आहे. शिक्षणाच्या सोयी निर्माण झाल्यास या भागाचा विकास होईल, असेही त्यांनी सांगितले.

याप्रसंगी आमदार हर्षवर्धन सपकाळ, विशेष पोलीस महानिरीक्षक मकरंद रानडे, श्रीमती लिना उपाध्ये यांनी विचार व्यक्त केले. प्रास्ताविकात डॉ. दिलीप पाटील – भुजबळ म्हणाले, ११५ पोलीस कर्मचारी निवासस्थाने येथे होणार आहे. हा सर्व प्रोजेक्ट ३ कोटी रूपयांचा आहे. याप्रसंगी वास्तुविषारद जयंत सोनावणे यांचा सत्कार करण्यात आला.                                                

 

 

पूरग्रस्त भागातील नागरिकांच्या मदतीसाठी पुढे यावे- जिल्हाधिकारी डॉ. निरुपमा डांगे यांचे आवाहन

राज्यात  मोठ्या प्रमाणावर पूर परिस्थितीमुळे  जनजीवन विस्कळीत झाले आहे. यामध्ये अनेक नागरिक बेघर झाले आहेत.  अशा विदारक परिस्थितीत पूरग्रस्तांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. विशेषतः कोल्हापूर, सातारा व सांगलीसह इतर काही ठिकाणी मदतीची नितांत गरज आहे. यामुळे जिल्ह्यातील दानशूर व्यक्ती, स्वयंसेवी संस्था यांनी पुढाकार घेण्याची गरज आहे.  तरी पूरग्रस्तांना जिल्ह्यातून जास्तीत जास्त मदत पाठविण्यासाठी दानशूर व्यक्ती, संस्था यांनी पुढे यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ निरुपमा डांगे यांनी केले आहे.


जिल्ह्यातील दानशूर व्यक्ती, स्वयंसेवी संस्था यांनी वस्तू स्वरूपात किराणा, कपडे, गृहोपयोगी वस्तू, धान्य द्यावयाचे असल्यास जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच आर्थिक स्वरूपात मदत करावयाची असल्यास मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात रक्कम जमा करावी. तरी मोठ्या संख्येने नागरिकांनी पुढे यावे. ही मदत विभागीय आयुक्त, पुणे यांच्या मार्फत पूरग्रस्त यांच्यापर्यंत पोहचविण्यात येईल, असे आवाहनही जिल्हाधिकारी यांनी केले

 

'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा