महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
समाज माध्यमांच्या वापराबाबत जागृतीसाठी सायबर सेफ वुमन मोहिम अत्यंत महत्त्वपूर्ण - महापौर संगीता खोत शुक्रवार, ०३ जानेवारी, २०२०


महिलांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस दल सदैव सज्ज - पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा

सांगली - समाज माध्यमांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला असून त्यांच्या वापराबाबत जाणीव जागृती मोठ्या प्रमाणात होणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने राबविण्यात येत असलेली सायबर सेफ वुमन मोहिम अत्यंत महत्त्वपूर्ण आहे,  असे प्रतिपादन सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेच्या महापौर संगीता खोत यांनी केले. सायबर शाखेचे विशेष पोलीस महानिरिक्षक यांच्या आदेशाने पोलीस अधीक्षक कार्यालय सांगली सायबर पोलीस ठाणे व जिल्हा माहिती कार्यालय सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने सायबर सेफ वुमन मोहिमेंतर्गत कृष्णा मॅरेज हॉल विश्रामबाग येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

सायबर स्टॉकिंगला महिला मोठ्या प्रमाणावर बळी पडत आहेत. समाज माध्यमांच्या वापराबाबत महिलांना त्यांचे अधिकार माहिती असणे आवश्यक आहे. तुमची शांतता, सुरक्षितता, मानसिक स्वास्थ्य हिरावून घेण्याचा कोणालाही अधिकार नाही. तुमच्या सुरक्षिततेसाठी पोलीस दल सदैव सज्ज असून कोणत्याही दबावाला बळी पडू नका. कोणी तुम्हाला त्रास देत असल्यास निर्भय होऊन पोलीस यंत्रणेची मदत घ्या. कोणालाही घाबरू नका, असे सांगून पोलीस अधिक्षक सुहेल शर्मा यांनी ‘डरना मत, कहना मेरा भाई एस पी है’ अशा शब्दांत महिलांना आश्वस्त केले. यावेळी त्यांनी महिलांसाठी 1091 हा हेल्पलाईन क्रमांक सुरू आहे. तसेच सर्व पोलीस ठाण्यामध्ये सखी हेल्प डेस्क सुरू करण्यात आला असल्याची माहिती दिली.

या कार्यक्रमात प्रमुख व्याख्याते म्हणून बोलताना सायबरतज्ज्ञ विनायक राजाध्यक्ष म्हणाले, दिवसेंदिवस समाजमाध्यमांचा वापर वाढत असून सायबर क्षेत्रात महिलांबाबत असुरक्षितता वाढली आहे. प्रोफाईल हॅकिंग, लिंक बेटींग, ऑनलाईन शॉपींग, सायबर स्टेकींग, सायबर बुलींग यासारख्या बाबींना महिला मोठ्या प्रमाणावर बळी पडत आहेत. त्यामुळे बदलत्या काळात महिलांनी आधुनिक तंत्रज्ञान अवगत करून समाजमाध्यमांचा अधिक दक्षतेने वापर करावा.

ॲड. मुक्ता दुबे यांनी महिलांवरील अत्याचार व त्यासंबंधात असणाऱ्या कायद्यांबाबत, न्यायिक प्रक्रियेबाबत माहिती दिली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोलीस अधिक्षक सुहेल शर्मा होते. यावेळी अप्पर पोलीस अधिक्षक मनिषा डुबुले, सायबरतज्ज्ञ विनायक राज्याध्यक्ष, बार असोसिएशनच्या महिला सचिव ॲड. मुक्ता दुबे, जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे, सायबर शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक गजानन कांबळे विविध शाळा महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी, महिला सरपंच, ग्रामपंचायत सदस्या, शिक्षिका, अंगणवाडी सेविका, महिला दक्षता समितीच्या सदस्या, पोलीस यंत्रणेतील विविध अधिकारी कर्मचारी यांची उपस्थिती होती.

स्वागत व प्रास्ताविक अप्पर पोलीस अधीक्षक मनिषा डुबुले यांनी केले. आभार जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे यांनी मानले.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा