महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
धार्मिक पर्यटनाच्या विकासासाठी प्रयत्नशील - पर्यटन मंत्री जयकुमार रावल मंगळवार, १३ फेब्रुवारी, २०१८
धुळे : महाराष्ट्र राज्याला ऐतिहासिक, धार्मिक तीर्थस्थळांचा मोठा वारसा लाभला आहे. त्यामुळे शेती व औद्योगिक विकासाबरोबरच राज्यातील निसर्ग पर्यटन आणि धार्मिक पर्यटन विकासासाठी देखील राज्य शासन प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन राज्याचे पर्यटन व रोजगार हमी योजना मंत्री जयकुमार रावल यांनी केले आहे.

बेटावद, ता. शिंदखेडा येथील कपिलेश्वर मंदिर परिसरात विविध विकास कामांसाठी 24 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यापैकी हायमास्टचे भूमीपूजन आज दुपारी मंत्री श्री. रावल यांच्या हस्ते झाले. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद सदस्य कामराज निकम, संजीवनी शिसोदे, बेटावदचे सरपंच प्रदीप महाजन, उपसरपंच अनिता चव्हाण, तहसीलदार सुदाम महाजन, नथू पाटील, श्यामसिंग राजपूत, भिकन शिरसाट आदी उपस्थित होते.

पर्यटन मंत्री श्री. रावल म्हणाले, कपिलेश्वर येथे येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे. या पार्श्वभूमीवर बेटावद ते कपिलेश्वर मंदिरादरम्यान पांझरा नदी पात्रावर पूल बांधण्यात येईल. त्यामुळे भाविकांची मोठ्या प्रमाणात सोय होईल. महाराष्ट्रातील धार्मिक स्थळांना भेट देण्यासाठी येणाऱ्या विदेशी पर्यटकांची संख्या दरवर्षी वाढत आहे. या पार्श्वभूमीवर धार्मिक पर्यटनस्थळांचा विकास करण्यात येईल. कपिलेश्वर येथे हाऊस बोट संकल्पना राबविणार आहे, असेही त्यांनी नमूद केले.

धुळे जिल्ह्यातील लळिंग, थाळनेर, सोनगीर या ऐतिहासिक पर्यटनस्थळांचा विकास करण्यात येईल. याबरोबरच नंदुरबार जिल्ह्यातील रावलापाणी या ऐतिहासिक पर्यटन स्थळाचा विकास करण्यात येणार असल्याचेही मंत्री श्री.रावल यांनी सांगितले. याशिवाय बेटावद येथे बालाजी रथासाठी निवारा शेड, वारुड येथे लोटन बाबा मंदिर परिसरास संरक्षण भिंत, दसवेल येथे गणेश मंदिर परिसरात हायमास्ट, वायपूर येथे दत्त मंदिराचे सुशोभिकरण करण्यात येणार आहे. तसेच पाटण येथे आशापुरी मंदिर परिसर, सुलवाडे येथे महादेव मंदिर परिसर, कमखेडा येथे विठ्ठल मंदिर परिसर, सवाई मुकटी येथे मक्तेश्वर मंदिर परिसर, दत्ताणे येथे दत्त मंदिर परिसर, रोहाणे येथे आशापुरी मंदिर परिसर विकसित करण्यात येणार आहे.

तत्पूर्वी कुरुकवाडे, ता. शिंदखेडा येथे 44 लाख रुपये खर्च करुन होणाऱ्या पाणीपुरवठा योजनेचे भूमीपूजन मंत्री श्री. रावल यांच्या हस्ते झाले. यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा