महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
ओखी चक्रीवादळ नुकसानग्रस्त मच्छिमारांना सर्वतोपरी मदत देऊ - पालकमंत्री दीपक केसरकर बुधवार, ०६ डिसेंबर, २०१७
सिंधुदुर्ग : ओखी चक्रीवादळामुळे जिल्ह्याच्या किनारपट्टी भागातील मच्छिमार बांधवांच्या होड्यांचे नुकसान झालेले आहे. मासेमारी जाळी वाहून गेली आहेत. याबाबत फयान वादळ मदत धर्तीवर त्यांना मदत केली जाईल. आंबा व काजू पिकांच्या नुकसानीचा अंदाज सध्या घेता येत नाही. याबाबत पीक उत्पादनानंतर सरासरी काढून योग्य मदत दिली जाईल. देवगड बंदरात आश्रयासाठी आलेल्या परराज्यातील मच्छिमार बांधवांच्या होड्यासाठी डिझेल व गॅस पुरवठा केला जाईल, अशी ग्वाही पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आज दिली पालकमंत्री श्री.केसरकर यांनी काल रात्रौ उशिरा कर्ले ता. वेंगुर्ला व आज सकाळी देवगड, आचरा, मालवण येथील मच्छिमार बांधवांशी भेट घेऊन चर्चा केली. देवगड बंदरात आश्रयाला आलेल्या केरळ, तामिळनाडू, गुजरात राज्यातील मच्छिमार बांधवांशी संवाद साधला तसेच त्यांना देण्यात आलेल्या मदतीचा आढावा घेतला.

कर्ले, उभादांडा, मालवण, देवगड आदी ज्या ठिकाणी होडी, जाळी आदीचे नुकसान झाले आहे त्याचे वस्तुनिष्ठ पंचनामे मत्स्यव्यवसाय विभागाने करावेत व अहवाल सादर करावा, आचरा बंदर तसेच जिल्ह्यात इतर सखल किनारपट्टी भागात उधानामुळे स्थानिक विहिरींचे पाणी दुषित झाले आहे. त्या विहिरीतील पाणी उपसुन पाणी पिण्यास योग्य होण्यासाठी औषध प्रक्रिया करावी, उधानाच्या वेळी सागरी लाटांपासून किनाऱ्याचे संरक्षण व्हावे यासाठी पत्तन विभागाने बंधारे बांधण्याचे नियोजन करावे, देवगड तहसिलदार यांनी परप्रांतिय नौका किती, खलाशी किती त्यांना डिझेलची गरज किती याचा अहवाल तात्काळ तयार करुन त्यांचे मागणी नुसार डिझेल व गॅस पुरवठा करावा, माल व खलाशी वाहतुकीसाठी चार होड्यांची तात्काळ व्यवस्था करावी, देवगड येथील एक पोलीस गस्ती नौका मालवणकडे पाठवावी, आदी सूचना पालकमंत्री श्री.केसरकर यांनी यावेळी केल्या. या दौऱ्यात खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, नगराध्यक्ष दिलीप कांदळगावकर, उपविभागीय अधिकारी सुशांत खांडेकर, विकास सुर्यवंशी, तहसिलदार शरद गोसावी, वनिता पाटील, गटविकास अधिकारी जयप्रकाश परब, श्री.पराडकर, पोलीस उपनिरिक्षक पद्मजा चव्हाण कर्ले, नवाबाग, देवगड, आचरा, मालवण येथील मच्छिमार बांधव, ग्रामस्थ उपस्थित होते. तसेच या दौऱ्यात मत्स्यव्यवसाय, पत्तन, सार्वजनिक बांधकाम विभाग आदी विभागातील अधिकारी उपस्थित होते.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज देवगड बंदरावरील बंदर कार्यालयात पालकमंत्री दीपक केसरकर यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. या नंतर मालवण शहरातील बौद्ध विहार येथे भेट देऊन त्यांनी डॉ.आंबेडकर यांच्या अर्धपुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक आदी मान्यवर व अधिकारी उपस्थित होते.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा