महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
शासकीय योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवा - विभागीय आयुक्त शुक्रवार, ११ मे, २०१८
  • घरकुल, धडक विहीर, जलयुक्त शिवार, मागेल त्याला शेततळे विषयांचा आढावा
  • जलयुक्तमधील अपूर्ण कामे मे अखेर पूर्ण करावी
बुलडाणा- राज्य व केंद्र शासन विविध कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करीत आहे. या योजनांच्या माध्यमातून शेवटच्या घटकाचा पूर्ण विकास होऊन तो स्वयंपूर्ण झाला पाहिजे. शासनाचे हे ध्येय प्रत्यक्षात आणण्यासाठी शासकीय योजनांचा लाभ शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रशासकीय यंत्रणांनी कार्यवाही केली पाहिजे, अशा सूचना विभागीय आयुक्त पीयुष सिंह यांनी आज दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात विविध शासकीय उपक्रमांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी आढावा घेताना विभागीय आयुक्त बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्र.जिल्हाधिकारी षण्मुखराजन, उपायुक्त शहाजी पवार, निवासी उपजिल्हाधिकारी ललित वराडे, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी बी.बी.नेमाने, ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प अधिकारी राहुल साकोरे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी प्रमोद लहाळे आदी उपस्थित होते.

वृक्षलागवड मोहिमेचा आढावा घेताना विभागीय आयुक्त म्हणाले, यावर्षी ऐतिहासिक कामगिरी करायची आहे. राज्यात 13 कोटी वृक्षलागवड करायची आहे. जिल्ह्यात या मोहिमेसाठी प्रशासकीय यंत्रणांनी सज्ज रहावे. खड्डे खोदून अक्षांश – रेखांशनुसार खड्यांचे फोटो अपलोड करावे. खड्यांसाठी लँड बँक तयार करावी. प्रत्येक यंत्रणेने उद्दिष्टानुसार रोपे उपलब्ध करून लागवड करावी. जिवंत रोपे असण्याचे प्रमाण वाढविण्यात यावे. जलयुक्त शिवार अभियानातंर्गत अपूर्ण असलेली कामे येत्या मे अखेर पूर्ण करण्यात यावीत. कुठल्याही परिस्थितीत मागील अपूर्ण कामांना जुनमध्ये पूर्ण करू नये. तसेच पाण्याचा ताळेबंद पूर्ण असलेल्या गावांचा ‘एक्झिट प्रोटाकॉल’ ची माहिती द्यावी. यामध्ये मंजूर आराखड्यापासून गावाचे पर्जन्यमान, भूजल पातळी, जलयुक्त शिवारच्या कामानंतर पडलेला प्रभाव, पाण्याची उपलब्धता, जनावरांसाठी पाणी उपलब्धता अशी संपूर्ण माहिती एक्झिट प्रोटोकॉलमध्ये द्यावयाची आहे.

ते पुढे म्हणाले, एखाद्या कामाला कंत्राटदारांचा प्रतिसाद मिळत नसेल, तर जास्त वेळ न घालविता यंत्रणांनी स्वत:च ते काम पूर्ण करावे. यंत्रणांनी जबाबदारी घेत कामे पूर्ण करून गाव वॉटर न्युट्रल करावे. जिल्हास्तरीय समितीची मान्यता घेत यंत्रणेनी काम पूर्ण करावे. ज्या कामांचे जिओ टॅगिंग झाले नसेल त्या कामांचे टॅगिंगचे काम त्वरित पूर्ण करावे. सन 2018-19 मध्ये निवडलेल्या 165 गावांमध्ये कामे मंजूर असल्यास पूर्ण करावीत. कार्यारंभ आदेश दिलेले असताना काम सुरू न झाल्यास यंत्रणांनी जबाबदारी निश्चित करून कार्यवाही करण्यात येईल. त्यासाठी कार्यारंभ आदेश दिलेले असताना कामे त्वरित सुरू करावी. या वर्षात निवडलेल्या गावांमध्ये लाभार्थ्यांचे प्रशिक्षण घेण्यात यावे.

मागेल त्याला शेततळे व धडक सिंचन विहीर योजनेचा आढावा घेताना विभागीय आयुक्त म्हणाले, मागेल त्याला शेततळे योजनेमध्ये उद्दिष्टपूर्तीसाठी यंत्रणेने काम करावे. जिल्ह्यात उद्दिष्टापेक्षा जास्त काम व्हायला पाहिजे. तसेच शेततळ्याचे अनुदान काम पूर्ण झाल्यानंतर त्वरित लाभार्थ्याला देण्यात यावे. धडक सिंचन विहीर योजनेत काम अपूर्ण असलेल्या विहिरी त्वरित पूर्ण करण्यात याव्यात. याप्रसंगी तालुकानिहाय जलयुक्त शिवार अपूर्ण कामे, शेततळे योजनेचा आढावा घेण्यात आला. 
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा