महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महापालिकेच्या व्यापारी संकुलातील गाळ्यांच्या अनामत रकमेबाबत लवकरच निर्णय- संभाजी पाटील-निलंगेकर रविवार, ०४ नोव्हेंबर, २०१८
जिल्हाधिकारी कार्यालयात रेव्हेन्यू फिटनेस क्लबचे उद्घाटन

लातूर :
लातूर शहर महानगरपालिकेच्या मालकीचे असलेले गंजगोलाई व गांधी चौकातील व्यापारी संकुलातील गाळ्यांसाठी रेडिरेकनर पद्धतीनेच भाडे आकारले जाईल. तसेच या गाळ्यांच्या अनामत रकमेबाबत (डिपॉजिट ) महापालिका प्रशासन व व्यापाऱ्यांमध्ये सुवर्णमध्य साधून एक फिक्स रक्कम अनामत म्हणून घेण्याबाबत लवकरच निर्णय होईल, असे पालकमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित महापालिका व्यापारी संकुलातील सोयीसुविधा व गाळे अनामत रकमेबाबत आयोजित बैठकीत श्री. निलंगेकर बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, महापौर सुरेश पवार, मनपा आयुक्त कौस्तुभ दिवेगावकर, उपमहापौर देविदास काळे, स्थायी समिती सभापती शैलेश गोजमगुंडे, माजी आमदार वैजनाथ शिंदे आदी उपस्थित होते.

श्री.निलंगेकर म्हणाले की, गंजगोलाईला 100 वर्षे पूर्ण होत आहेत. या गोलाईतील व्यापारी व व्यावसायिकांनी लातूर शहराला व्यापारी शहर म्हणून ओळख निर्माण करुन दिली आहे. या ठिकाणच्या व्यापारी/ व्यावसायिकांना ते पूर्वीपासून व्यवसायधारक असल्याचा विचार करुन गाळे देण्यात येतील. त्याप्रमाणेच व्यापाऱ्यांचा व्यवसाय सुस्थितीत कसा राहील याची काळजी घेतली जाऊन गंजगोलाई व गांधी चौक व्यापारी संकुलातील सर्व गाळेधारकांना पुढील काळात सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातील, असे ही त्यांनी सांगितले.

महापालिकेच्या व्यापारी संकुलातील सर्व गाळेधारकांनी रेडीरेकनर दराप्रमाणे भाडे भरणे आवश्यक आहे. तसेच प्रशासन व व्यापारी यांच्यात लवकरच अनामत रक्कम जमा करण्याबाबत महापालिका व व्यापारी यांच्यात सुवर्णमध्य साधून महापालिका व व्यापारी असे दोघांचेही हीत साधले जाईल, असे श्री. निलंगेकर यांनी सांगितले. तसेच एमआयडीसीमधील व्यापारी व उद्योजकांनी महापालिकेचा कर भरणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात जीमचे उद्घाटन

जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सुदृढ आरोग्यासाठी तयार करण्यात आलेल्या रेव्हेन्यू फिटनेस क्लबचे (जीम) उद्घाटन श्री.निलंगेकर यांनी केले. यावेळी त्यांनी जीमची पाहणी करुन सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या जीमचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. यावेळी जिल्हाधिकारी जी.श्रीकांत, महापौर सुरेश पवार, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.अनंत गव्हाणे आदिसह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा