महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
कृषी ग्रामसभेचा ‘नाशिक पॅटर्न’ संपूर्ण राज्यात राबवणार - कृषी व फलोत्पादन राज्यमंत्री खोत गुरुवार, १२ ऑक्टोंबर, २०१७
नाशिक : कृषी विभागामार्फत ग्रामीण भागात कृषी ग्राम सभांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याचा उपक्रम अत्यंत स्तुत्य व उपयुक्त आहे. कृषी ग्रामसभा हा ‘नाशिक पॅटर्न’ संपूर्ण राज्यभरात राबविण्यात येईल, असे प्रतिपादन कृषी व फलोत्पादन, पणन आणि पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केले.

नाशिक उंटवाडी येथील कृषी प्रशिक्षण केंद्रात आयोजित कृषी विभागाच्या आढावा बैठकीत श्री.खोत बोलत होते. यावेळी कृषी सहसंचालक दिलीप झेंडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी टी.एन. जगताप, जिल्हा शल्यचिकित्सक सुभाष जगदाळे यांच्यासह विभागातील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जिल्हा परिषदेचे कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक, क्षेत्रीय कर्मचारी आदी उपस्थित होते.

श्री. खोत म्हणाले, सर्व कृषी अधिकारी यांनी प्रत्यक्ष गावात भेटी देत शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घ्याव्यात. तसेच शेतकऱ्यांना त्यावर उपाययोजना सुचविण्यात याव्यात. शेतकऱ्यांसाठी असलेल्या योजनांची संपूर्ण माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवून त्याबाबत त्यांना मार्गदर्शन करावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.

कृषी निविष्ठा केंद्रात शासनाने प्रमाणित केलेल्या औषधांची यादीप्रमाणे विक्री होत असल्याबाबत कृषी निरीक्षकांनी दुकानांची तपासणी करावी. तसेच यासंदर्भात मार्गदर्शनासाठी मेळावे, बैठकांचे आयोजन करण्यात यावे, असे निर्देशही श्री. खोत यांनी दिले.

पाणीपुरवठा योजनांचा घेतला आढावा

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना आणि मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजना यांच्यासंदर्भात श्री.खोत यांनी जिल्हानिहाय आढावा घेतला. तसेच नोव्हेंबर 2017 पासून जिल्हास्तरीय आढावा बैठकांचे आयोजन करण्यात यावे आणि कामांना गती द्यावी, अशाही सूचना त्यांनी दिल्या.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा