महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
पुनर्रचना समितीच्या अहवालानुसार 3165 नवीन तलाठी साझाची निर्मिती - अनूप कुमार बुधवार, १७ मे, २०१७
नागपूर : तलाठी साझा व महसूल मंडळ पुनर्रचनेसाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीच्या अहवालातील सर्व शिफारशी मान्य करून राज्यात 3165 नवीन तलाठी साझे तसेच 528 नव्या मंडळ कार्यालयाच्या निर्मितीला राज्यमंत्रीमंडळाने मान्यता दिली असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष विभागीय आयुक्त अनूप कुमार यांनी दिली.

राज्यातील भौगोलिक, प्रादेशिक विविधता व इतर अनुषंगिक बाबीच्या आधारे तलाठी साझा पुनर्ररचना विषय समितीने महानगरपालिका क्षेत्र, महानगरपालिका क्षेत्राचा 10 कि.मी. पर्यंतचे क्षेत्र (झालर क्षेत्र), अ व ब नगरपालिका, अ व ब नगरपालिका क्षेत्राच्या 5 कि.मी. पर्यंतचे क्षेत्र, क वर्ग नगरपालिका, गिरीस्थान नगरपालिका व नगर पंचायती, ग्रामीण भाग, आदिवासी भाग, माडा, मिनीपाडा, टिएसपी तसेच तटीय क्षेत्राचा महत्त्वाचे नवीन क्षेत्र म्हणून विचारात घेण्यात आली आहे.

या निर्णयामुळे करवसुलीशिवाय भूमिअभिलेख विषयक बाबी, दुष्काळ-नैसर्गिक आपत्तीत मदत कार्य, जनगणना, निवडणुका, विशेष सहाय्य योजना, विविध दाखल्यांचे वाटप, आदी कामे गतीने होण्यास मदत होणार आहे. पहिल्या टप्प्यात महानगरपालिका, अ व ब नगरपरिषदा तसेच त्याचे परिघीय क्षेत्र आणि क वर्ग नगरपरिषदा यांचा विचार करून या नागरी भागातील 415 व आदिवासी क्षेत्रातील 351 अशा एकूण 766 नवीन तलाठी साझे व 128 महसूल मंडळांची निर्मिती 2017-18 या वर्षामध्ये करण्यात येणार आहे. तसेच दुसऱ्या टप्प्यात 2018-19 मध्ये अ व ब वर्ग गावांसाठी 800 साझे व 133 महसूल मंडळे निर्माण करण्यात येतील, तर 2019-20 व 2020-21 या वर्षात अनुक्रमे 800 व 793 तलाठी साझे आणि 133 व134 महसूल मंडळांची निर्मिती करण्यात येणार आहे.

या निर्णयानुसार निर्माण करण्यात येणाऱ्या तलाठी साझे आणि विभागनिहाय महसूल मंडळ, कोकण-744 तलाठी साझे व 124 महसूल मंडळ, नाशिक – 689 तलाठी साझे व 115 महसूल मंडळ, पुणे – 463 तलाठी साझे व 77 महसूल मंडळ, औरंगाबाद – 685 तलाठी साझे व 114 महसूल मंडळ, नागपूर – 478 तलाठी साझे व 80 महसूल मंडळ, अमरावती – 106 तलाठी साझे व 18 महसूल मंडळ.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा