महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
ज्ञानाला तंत्रज्ञानाची जोड - राज्यमंत्री रवींद्र चव्हाण गुरुवार, ०३ मे, २०१८
वैद्यकीय विद्यार्थ्यांना मिळणार व्हर्च्युअल व्याख्यानातून मार्गदर्शन

ठाणे :
आजच्या जगात सर्वच गोष्टी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून होत आहेत, राज्यात सर्वदूर पसरलेल्या वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने मार्गदर्शन करण्याचा प्रकल्प सुरु करून ज्ञानाला तंत्रज्ञानाची जोड देण्याचे पहिले पाऊल राज्य सरकारने टाकले आहे, असे मत राज्याचे वैद्यकीय शिक्षण, बंदरे, माहिती-तंत्रज्ञान राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांनी व्यक्त केले.

वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय आणि पार्थ नॉलेज नेटवर्क यांच्या संयुक्त विद्यमाने ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिस्ट यांच्या सहभागाने वैद्यकीय शिक्षणाची व्हर्च्युअल व्याख्यानमाला सुरु करण्यात आली आहे. त्या व्याख्यानमालेचे उद्घाटन रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते आज झाले. त्यावेळी ते बोलत होते.

या कार्यक्रमास वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागाचे संचालक डॉ. प्रवीण शिनगारे आणि पार्थ नॉलेज नेटवर्कचे अध्यक्ष आणि संस्थापक बबनराव मगदूम उपस्थित होते. सतरा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील हजारहून अधिक विद्यार्थी या कार्यक्रमात सहभागी झाले.

डिजिटल महाराष्ट्रचे मिशन

श्री.चव्हाण म्हणाले, की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे डिजिटल इंडियाचे स्वप्न साकारण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डिजिटल महाराष्ट्रचे मिशन हाती घेतले आहे. डिजिटल माध्यमातून समाजाच्या तळागाळापर्यत पोहचण्याचा प्रयत्न आहे. त्याच अंतर्गत राज्याच्या विविध भागात पसरलेल्या वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना व्हर्च्युअल मार्गदर्शन करण्याचा हा उपक्रम आज सुरु होत आहे.

ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिस्टचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी पहिली दहा व्याख्याने प्रायोजित करण्याचे मान्य केले. हळूहळू अजूनही पाठबळ मिळेल आणि हा उपक्रम यशस्वी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शासनाच्या माध्यमातून सर्वतोपरी मदत आपण करू, असे आश्वासनही त्यांनी दिले.

डॉ.शिनगारे म्हणाले, गेल्या काही वर्षात महाराष्ट्राला वैद्यकीय शिक्षणासाठीच्या जागा वाढवून मिळाल्या आहेत. परंतु त्या प्रमाणात वैद्यकीय महाविद्यालयातील अध्यापकांच्या जागा भरल्या गेल्या नाहीत. आजही खूप जागा रिक्त आहेत. त्यावर काय करता येईल याचा विचार सुरू असतानाच व्हर्च्युअल मार्गदर्शनाची सोय करता येईल का असा प्रवाह पुढे आला होता. तेव्हाच पार्थ नॉलेज नेटवर्कची माहिती मिळाली. त्यातून हा उपक्रम सुरु करण्याचा ठरविले पण आर्थिक निधीची कमतरतेमुळे थोडा मागे पडला. मात्र या उपक्रमाचे महत्त्व लक्षात घेऊन राज्यमंत्री श्री.चव्हाण लोकसहभागासाठी पाठपुरावा केला आणि आज तो प्रयत्न प्रत्यक्षात उतरत आहे. प्रायोगिक तत्त्वावर दोन व्याख्याने झाली तिला विद्यार्थ्यांनी दिलेला प्रतिसाद बघून वर्षभर चालविण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्रातील तज्ज्ञ डॉक्टर तसेच विविध भागातील डॉक्टर प्राध्यापक यातून व्याख्याने देतील. आपल्या मार्गदर्शनाचा फायदा राज्यातील विद्यार्थ्यांना होणार या कल्पनेमुळे अध्यापकही खूष आहेत. वर्षभरात प्रत्येक वर्षाची मिळून नव्वद व्याख्याने होणार आहेत. महाविद्यालयातील व्याख्याने ही महत्त्वाची असून हा उपक्रम फक्त पूरक आहे हे लक्षात घ्यावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

डॉक्टरांना देवाचे रूप मानले जाते, त्यांच्या सेवेची संधी पार्थ नॉलेज नेटवर्कला मिळाली, त्यासाठी रविंद्र चव्हाण यांचा मी ऋणी आहे, असे उद्गार पार्थचे अध्यक्ष बबनराव मगदुम यांनी काढले. पार्थचे तंत्रज्ञान वापरून वैद्यकीय शिक्षणात डिजिटल ज्ञानगंगा गावोगावी पोहचवणारे महाराष्ट्र सरकार पहिले ठरले आहे, याचा अभिमान वाटतो, असेही त्यांनी सांगितले. महाराष्ट्रातल्या डॉक्टरांनी परदेशातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे आणि त्यासाठी पार्थ हे माध्यम ठरावे, असे आपले स्वप्न असल्याचे त्यांनी सांगितले.

या उद्घाटन समारंभानंतर मुंबईच्या ग्रॅण्ड वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्राध्यापिका डॉ. उषा रंगनाथन यांचे कम्युनिटी मेडिसिन यावर व्याख्यान झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रश्मी म्हांब्रे यांनी केले तर पार्थचे आशिष दीक्षित यांनी आभार मानले.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा