महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
वसतीगृहामुळे खुल्या प्रवर्गातील सर्वसामान्य मुलांना लाभ - पालकमंत्री राम शिंदे बुधवार, ११ सप्टेंबर, २०१९


अहमदनगर  :
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून डॉ.पंजाबराव देशमुख निर्वाह योजने अंतर्गत जिल्हानिहाय वसतिगृह सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला. मराठा समाजातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत असणारे विद्यार्थी उच्च शिक्षणापासून वंचित राहू नयेत, त्यांच्यात गुणवत्ता असूनही राहण्याची सोय नसल्याने त्यांना अर्धवट शिक्षण सोडून देण्याची वेळ येऊ नये अशा मुलांसाठी राहण्याची व जेवणाची सोय व्हावी म्हणून राज्यसरकारने मराठा समाजातील मुलांसाठी वसतिगृह सुरु करण्याचा क्रांतिकारी निर्णय घेतला. त्यात अहमदनगर जिल्हयात हे पहिले वसतीगृह असून त्याचा लाभ सर्वसामान्य विद्यार्थ्याना होईल, असे प्रतिपादन राज्याचे पणन व वस्त्रोद्योग मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी केले.

राज्य सरकारच्या मान्यतेने डॉ.पंजाबराव देशमुख निर्वाह योजने अंतर्गत केडगाव येथील वसुंधरा कृषी व ग्रामीण विकास संस्थेच्या वतीने केडगाव येथे मराठा मुलांसाठी जिल्ह्यातील पहिले वसतिगृह सुरु करण्यात आले. प्रा. शिंदे यांच्या हस्ते दीप प्रज्वलीत करुन या वसतिगृहाचे आज लोकार्पण करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, महापौर बाबासाहेब वाकळे, अभय आगरकर, राजाभाऊ मुळे, सहधर्मादाय आयुक्त हिरा शेळके, शासकीय तंत्र निकेतनचे डॉ.सातारकर, अनिल मोहिते गणेश ननवरे आदी यावेळी उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री प्रा. शिंदे यांनी या वस्तीगृहाची पाहणी केली. त्यावेळी ते म्हणाले, अहमदनगर जिल्हयात हे पहिले वसतीगृह असून या वसतीगृहात ५० विद्यार्थ्यांची राहण्याची क्षमता असून वसतीगृहात भोजनाचाही व्यवस्था करण्यात आली आहे. सकल मराठा समाजाच्या मागणीनंतर राज्यसरकारने मुलांसाठी वसतिगृह सुरु करण्यासाठी प्रयत्न सुरु करण्याचा निर्णय घेतला. या वसतिगृहाचा लाभ मराठा समाजातील सर्वसामान्य कुटुंबातील गुणवत्ताधारक मुलांना उच्च शिक्षण घेण्यासाठी होणार आहे. येथे उच्च दर्जाची सुविधा व अभ्यासासाठी पोषक वातावरण निर्माण व्हावे यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

प्रास्ताविक वसुंधरा संस्थेचे अध्यक्ष अनिल मोहिते यांनी केले. त्यांनी या वसतिगृहात देण्यात येणाऱ्या सुविधांची माहिती दिली. डॉ मुकुंद सातारकर, कार्यकारी अभियंता राऊत, बाप्पू निंबाळकर, रवींद्र मुळे, डॉ दादासाहेब करंजुले, अमर कळमकर, योगेश जोशी, श्रीराम राजेश्वर, अशोक गायकवाड आदि यावेळी उपस्थीत होते . आभार बाप्पू निंबाळकर यांनी मानले
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा