महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
नागरिकांनी सामाजिक सलोखा जोपासला पाहिजे - पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर रविवार, ०७ जानेवारी, २०१८
लातूर : प्रत्येक नागरिकांनी कोणत्याही जाती-पंथाचा विचार न करता प्रथम आपण या देशाचे नागरिक आहोत ही भावना ठेवून सामाजिक सलोखा जोपासला पाहिजे. भारत देश हाच आपला धर्म मानला पाहिजे, असे प्रतिपादन कामगार कल्याण, कौशल्य विकास, भूकंप पुनर्वसन व माजी सैनिक कल्याण मंत्री तथा पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी केले.

मारवाडी विद्यालयाच्या प्रांगणात आयोजित श्री. मारवाडी राजस्थान शिक्षण संस्थेच्या 78 व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात पालकमंत्री श्री. निलंगेकर बोलत होते. यावेळी महापौर सुरेश पवार, उपमहापौर देविदास काळे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी, मारवाडी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शैलेश लाहोटी आदिसह इतर मान्यवर, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. निलंगेकर पुढे म्हणाले की, आपण सर्वजण प्रथम भारत देशाचे नागरिक असून प्रत्येकाने सामाजिक सलोखा जोपासण्याची गरज आहे. तसेच भविष्यकाळ चांगला जाण्यासाठी निर्सगाची जोपासना करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले.

श्री. मारवाडी राजस्थान शिक्षण संस्थेने सामाजिक सलोखा जोपासून शैक्षणिक क्षेत्रात चांगले काम केले असल्याचे श्री. निलंगेकर यांनी सांगून मारवाडी राजस्थान विद्यालयाच्या समोरील रस्ता अरुंद असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून येथील विद्यार्थ्यांनाही त्रास होत आहे. त्यामुळे संस्थेने रस्ता रुंदीकरणासाठी संस्थेची जागा महापालिकेला द्यावी व हा रस्ता महापालिकेमार्फत त्वरीत पूर्ण करुन दिला जाईल, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी यांनी संस्थेच्या कामाचा आढावा घेतला. तर मारवाडी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शैलेश लाहोटी यांनी संस्थेमार्फत विद्यार्थ्यांना शैक्षणीक व क्रीडा क्षेत्रातील सर्व अद्ययावत ज्ञान व तंत्रज्ञान उपलब्ध करुन देण्यात येईल असे सांगितले. यावेळी सौर उर्जाबाबत शालेय विद्यार्थी, पालक व नागरिकांना श्री. सांगळे यांनी माहिती देऊन प्रबोधन केले.

श्री. निलंगेकर यांच्या हस्ते संस्थेच्या विविध क्रीडा प्रकारात पुरस्कार प्राप्त विद्यार्थी, सेवा निवृत्त शिक्षक आदींचा सत्कार करण्यात आला. तसेच संस्थेच्या ‘झेप’ या स्मरणीकेचे प्रकाशनही यावेळी श्री. निलंगेकर यांच्या हस्ते झाले.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक संस्थेचे सचिव आशिष बाजपेई यांनी करुन संस्थेच्या कामाची माहिती दिली. तर संस्थेंतर्गत येणाऱ्या शाळांमधील विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण यावेळी केले.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा