महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
तुडतुडाग्रस्त धान उत्पादक शेतकऱ्यांशी केंद्रीय पथकाची चर्चा गुरुवार, १७ मे, २०१८
भंडारा : भंडारा जिल्ह्यात खरीप हंगाम 2017-18 मध्ये नोव्हेंबर महिन्यात आलेल्या तुडतुडा रोगामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या नुकसानीची मदत शेतकऱ्यांना मिळण्यासाठी राज्याने केंद्राकडे प्रस्ताव पाठविला असून या अनुषंगाने केंद्र सरकारच्या पथकाने आज जिल्ह्यातील भंडारा तालुक्यातील परसोडी, तुमसर तालुक्यातील बिनाखी, मोहाडी तालुक्यातील आंधळगाव व पालडोंगरी गावाला भेट देऊन शेतकऱ्यांशी चर्चा केली.

या भेटीत राज्याचे कृषी विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव विजयकुमार, विभागीय आयुक्त अनुपकुमार प्रामुख्याने उपस्थित होते. केंद्राच्या या पथकात डॉ. बी. गणेशराम नीती आयोग दिल्ली, डी. सी. डी. नागपूर चे संचालक डॉ. आर.पी.सिंग, केंद्रीय कापूस संशोधन केंद्राच्या कोईमतूर विभागाचे प्रकल्प समन्वयक डॉ ए. एच. प्रकाश, उपायुक्त (बियाणे) नवी दिल्लीचे एस. सेल्वराज, खर्च विभागाचे सल्लागार दिना नाथ, केंद्रीय विद्युत अधिकारिता विभागाचे उपसंचालक ओम प्रकाश सुमन, दिल्लीचे मत्स्य संशोधन आणि तपास अधिकारी डॉ. तरुणकुमार सिंग, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ राईस रिसर्च हैद्राबादचे संचालक एस. आर. वोलेटी, यांचा समावेश होता. मुख्य कार्यकारी अधिकारी मनोजकुमार सूर्यवंशी, अप्पर जिल्हाधिकारी दिलीप तलमले, उपविभागीय अधिकारी प्रविण महिरे, स्मिता पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. लोखंडे, तहसीलदार संजय पवार व गजेंद्र बालपांडे यावेळी उपस्थित होते.

परसोडी येथे केंद्रीय पथकाने भेट देऊन ग्रामपंचायत भवनात शेतकऱ्यांशी संवाद साधला. तुडतुड्यामुळे झालेल्या धानाच्या नुकसानीबाबत शेतकऱ्यांनी केंद्रीय पथकास माहिती दिली. धान पिकाचे संपूर्ण नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांनी यावेळी सांगितले. राज्यशासनाने केंद्राकडे मदतीसाठीच्या निधीचा प्रस्ताव पाठविला असून त्या अनुषंगाने पथक तपासणीसाठी आल्याचे पथकातील अधिकाऱ्यांनी नमुद केले. शेतकऱ्यांनी प्रमाणित बियाणे वापरणे गरजेचे असल्याचे पथकाच्या सदस्यांनी सूचविले. येणाऱ्या हंगामात शेतकऱ्यांनी प्रमाणित बियाणेच वापरावेत, असे आवाहन त्यांनी केले. या नंतर पथकाने तुमसर तालुक्यातील बिनाखी येथील शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या ऐकल्या. या ठिकाणी सुध्दा धान पिकाचे संपूर्ण नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. पथकाने मोहाडी तालुक्यातील आंधळगाव व पालडोंगरीला भेट देऊन तुडतुडाग्रस्त शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. या भेटीचा सकारात्मक अहवाल केंद्र शासनाला सादर करणार असल्याचे पथकातील सदस्यांनी शेतकऱ्यांना सांगितले.

भंडारा जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीची आचार संहिता असून आचार संहितेचा कुठलाही भंग होणार नाही यासाठी आयोगाच्या पुर्वपरवानगीने केंद्रीय पथकाचा हा पाहणी दौरा होत असल्याचे अप्पर मुख्य सचिव विजयकुमार यांनी नमूद केले. नोव्हेंबर 2017 मध्ये पडलेल्या तुडतुडा रोगामुळे भंडारा, गोंदिया जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. केंद्रीय पथक पाहणीसाठी आले असले तरी केंद्राच्या मदतीची वाट न पाहता राज्य शासन यावर सकारात्मक निर्णय घेत आहे, असे विजयकुमार यांनी सांगितले. पीक विम्याची रक्कमही मंजूर झाली असून त्याबाबतीत योग्य निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले. यावेळी शेतकऱ्यांनी विविध समस्या पथकासमोर मांडल्या. केंद्रीय पथकाने सुध्दा शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या प्रश्नांना योग्य उत्तरे दिली. शेतकऱ्यांनी आपल्या शेतात प्रमाणित बियाणेच पेरावे. याचा पथकातील सदस्यांनी पुर्नरुच्चार केला. यावेळी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा