महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
आपत्ती निवारण जनजागृती चित्ररथ उपक्रमास प्रारंभ मंगळवार, १० ऑक्टोंबर, २०१७
जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्या हस्ते उद्घाटन
पुणे :
दैनंदिन जीवन जगताना अनेक प्रकारच्या समस्यांना नागरिकांना सामोरे जावे लागते. मानवी चुकांमुळे घडणारे अपघात तसेच नैसर्गिक आपत्तीच्या काळात वेगवेगळ्या आव्हानांना नागरिकांना सामोरे जावे लागते. या आव्हानांचा सामना करताना अंमलात आणावयाच्या उपाययोजनांची माहिती नागरिकांना व्हावी यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्यावतीने चित्ररथ तयार करण्यात आला आहे. या चित्ररथाला आज जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी झेंडा दाखवून मार्गस्थ केले.

नूतन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता भारतकुमार बाविस्कर, आपत्ती निवारण व्यवस्थापन विशेषज्ञ रिया सहा, जिल्हा आपत्ती निवारण व्यवस्थापन अधिकारी विठ्ठल बनोटे उपस्थित होते.

आपत्ती निवारण कार्याची माहिती सर्वसामान्य नागरिकांना व्हावी यासाठी या चित्ररथाद्वारे जिल्ह्यात जनजागृती करण्यात येणार आहे. या चित्ररथासोबत रुक्मिणी कदम, शामा जळगावकर, मंगला हरिभक्त, अंजू परदेशी, चंद्रकला पाचकर, सीमा पवार, मीना शहा या प्रशिक्षित कार्यकर्त्यांचे पथक सहभागी झाले आहे.

नैसर्गिक आपत्ती मग ती कोणतीही असो, टाळता येत नसली तरी अशा संभाव्य आपत्तींना सामोरे जाण्याची नागरिकांची पूर्वतयारी असावी. यासाठी या चित्ररथाद्वारे जनजागृती करण्याचा उद्देश असल्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी स्पष्ट केले. या चित्ररथाद्वारे करण्यात येणाऱ्या जनजागृती अभियानाचा नागरिकांनी लाभ घेऊन आपत्ती निवारणासाठी सक्षम करावे, असे आवाहन केले.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा