महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
पदाचा उपयोग जनतेच्या विकासाकरिता करणार – विधानसभा अध्यक्ष नाना पटोले शनिवार, ०४ जानेवारी, २०२०


पूरक नळ योजनेच्या जलकुंभाचे भूमीपूजन

भंडारा :
जनतेच्या माध्यमातून मिळालेल्या पदाचा फायदा हा जनतेच्या सर्वांगिण विकासाकरिता व्हायला पाहिजे. या परिसरातील पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविण्यासाठी निम्न चुलबंद प्रकल्पाचे पाणी पूर्ण क्षमतेने अडविल्यानंतरच ही समस्या मार्गी लागेल. त्या दृष्टीकोनातून प्रयत्न सुरु केलेले आहेत, असे प्रतिपादन विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी ग्राम पळसगाव येथे आयोजित जलकुंभ भूमिपूजन प्रसंगी केले.

यावेळी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष सदाशिव वलथरे, तहसीलदार बाळासाहेब तेळे, उपविभागीय अभियंता प्रेम सावरकर, शाखा अभियंता हर्षल गणवीर, जिल्हा परिषद सदस्य दीपक मेंढे, होमराज कापगते, पंचायत समितीच्या उपसभापती वर्षाताई कापगते, पंचायत समिती सदस्य लालचंद लेथे, सरपंच मंगला खोटेले, उपसरपंच प्रकाश बागळे आदी उपस्थित होते.

श्री. पटोले म्हणाले, शासनाच्या विविध योजनेपासून वंचित असलेले वनजमीन अतिक्रमित असलेल्या शेतकऱ्यांना वनजमिनीचे पट्टे मिळावे व सातबारावर मालकी हक्क मिळावा याकरिता संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले आहे तसेच बेरोजगारांचे प्रश्न, व्यवसायाकरिता योजना आराखडा तयार करुन ग्रामिण क्षेत्रातील शेतकरी, बेरोजगार युवकांना दुग्ध व्यवसायासाठी प्रोत्साहित करण्यासाठी प्रयत्न सुरु केल्याचे त्यांनी सांगितले.

राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम अंतर्गत पळसगाव/सो पूरक नळ योजनेच्या जलकुंभाचे भूमिपूजन पटोले यांच्या हस्ते करण्यात आले. याचा अंदाजपत्रकीय खर्च ९४ लक्ष ११ हजार ७९५ असून साठवण क्षमता १ लक्ष लिटर इतकी आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपसरपंच प्रकाश बागळे यांनी केले तर आभार प्रेमलाल कोरे यांनी मानले. या प्रसंगी परिसरातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा