महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
कन्या माझी भाग्यश्री योजना घराघरात पोहोचविणार - महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे शुक्रवार, १२ जानेवारी, २०१८
  • कन्या माझी भाग्यश्री योजना जाणीव जागृती अभियान रथयात्रेचा थाटात शुभारंभ
  • अंगणवाडी सेविका, मदतनीस यांना वाढीव मानधन 1 एप्रिल 2018 पासून

बुलडाणा :
समाज व्यवस्थेमध्ये मुलींचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. या समाजव्यवस्थेत मुलींचे स्थान टिकवून ठेवण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे. वंशाचा दिवा देणाऱ्या मुलीच्या जन्माला नाकारणाऱ्या राक्षसी प्रवृत्तीला सोडायला लावून `कन्या माझी भाग्यश्री` ही घराघरात पोहोचविण्यात येणार आहे. मुलीच्या जन्माचे समाजाने सर्वार्थाने स्वागत करून महिलांना सक्षम करावे, असे आवाहन राज्याच्या ग्रामविकास, महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी आज सिंदखेड राजा येथे केले.

सिंदखेड राजा येथील जिजामाता महाविद्यालयाच्या मैदानावर `कन्या माझी भाग्यश्री` योजनेच्या जाणीव जागृती रथयात्रेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी पालकमंत्री पांडुरंग फुंडकर, जि.प अध्यक्षा श्रीमती उमा तायडे, खासदार प्रतापराव जाधव, आमदार सर्वश्री शशीकांत खेडेकर, डॉ. संजय कुटे, आकाश फुंडकर, जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जि.प मुख्य कार्यकारी अधिकारी एस. षण्मुखराजन आदी उपस्थित होते.

`कन्या माझी भाग्यश्री` योजनेतंर्गत एका मुलीवर कुटूंब कल्याण शस्त्रक्रिया करणाऱ्या कुटूंबाला मुलीच्या नावे 50 हजार रूपये दीर्घ मुदतीचे डिपॉझीट देणार असल्याचे सांगत मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, सदर मुलगी इयत्ता 10 वी उत्तीर्ण झाल्यानंतर शिक्षणासाठी या जमा रकमेवरील व्याजाची रक्कम तिला देण्यात येईल. तसेच 18 वर्षापर्यंत अविवाहित राहिलेल्या मुलींना दीर्घ मुदतीची ठेव विवाहभेट म्हणून परत देण्यात येणार आहे. मुलींच्या जन्मासोबतच तिच्या शिक्षणासाठी कुटूंबाला आर्थिक सामर्थ्य देण्याचे कामही शासन करीत आहे. तसेच मुलींचे पोषण करण्यासाठी, त्यांना आरोग्य सुविधा देण्याचे कार्यही करण्यात येत आहे. मुलगी ही कुटूंबाचा वारसदार नाही हा समज आता चुकीचा असून ‘मुलगीच माझी वारसदार’ ही संकल्पना आता पुढे येत आहे.

अंगणवाडी सेविका, मदतनीस यांना 6 ऑक्टोबर 2017 रोजी निर्णय घेऊन वाढीव मानधन देण्यात येणार असल्याचे सांगत श्रीमती मुंडे म्हणाल्या, या वाढीव मानधनाची रक्कम 1 एप्रिल 2018 पासून खात्यात जमा करण्यात येणार आहे. तसेच भाऊबीज भेट दुप्पट करण्यात आली आहे. केवळ मुलींच्या जन्माचे स्वागत, शिक्षणाचा खर्च यावरच शासन थांबले नाही, तर महिला बचत गटांच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाची चळवळ राज्यात सुरू करण्यात येत आहे. या बचत गटांना शून्य टक्के व्याज दराने कर्जाचा पुरवठा करण्यात येणार आहे.

राज्यात 2019 पर्यंत ग्रामीण भागात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून 30 हजार किलोमीटर रस्ते बांधण्यात येणार आहे. बुलडाणा जिल्ह्यासाठी सुद्धा ग्रामीण रस्त्यांच्या बांधकामासाठी 114 कोटी रूपयांचा निधी देण्यात येत आहे. ग्रामीण रस्त्यांच्या मजबुतीकरणासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजना राबविणारे महाराष्ट्र हे देशात पहिले राज्य आहे. राजमाता जिजामाता यांच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडविण्यासाठी राज्य शासन काम करीत आहे. हा स्वप्नातीत महाराष्ट्र घडविल्याशिवाय आम्ही राहणार नाही. जाणीव जागृती रथयात्रा रमाई आंबेडकर यांच्या रत्नागिरी जिल्ह्यातील जन्मगावी मंडणगाव येथे, त्यानंतर अहिल्यादेवी होळकर यांच्या नगर जिल्ह्यातील चौंढी जन्मगावी आणि त्यानंतर सावित्रीबाई फुले यांच्या जन्मगावी सातारा जिल्ह्यातील नायगांव येथे जाणार आहे. रथयात्रेच्या माध्यमातून योजनेची मोठ्या प्रमाणावर जाणीव जागृती करण्यात येणार आहे.

पालकमंत्री पांडुरंग फुंडकर यावेळी म्हणाले, मुलगा-मुलगी हा भेद आता राहिला नाही. प्रत्येकाने मुलीच्या जन्माचे स्वागत केले पाहिजे. मुलगा-मुलगी हा भेद असल्यामुळे आपल्या समाज व्यवस्थेचे खूप नुकसान होत आहे. बेटी बचाओ बेटी पढाओ, कन्या माझी भाग्यश्री या योजनांच्या माध्यमातून निश्चितच समाजातील स्त्री भृण हत्या थांबविण्यात यश येणार आहे.

खासदार प्रतापराव जाधव यावेळी म्हणाले, जिजाऊंच्या हातून छत्रपती शिवाजी महाराज घडले. त्या मातेचा जन्म या सिंदखेड राजा नगरीतला आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र या दिवशी नतमस्तक होण्यासाठी मातृतीर्थ सिंदखेड राजा नगरीत येतो. या नगरीतून योजनेच्या जाणीव जागृती रथयात्रेचा शुभारंभ होत आहे, ही आनंदाची बाब आहे.

याप्रसंगी आमदार शशिकांत खेडेकर यांनीही मार्गदर्शन केले. प्रास्ताविक जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केले. प्रारंभी रथयात्रेचा शुभारंभ फित कापून महिला व बालविकास मंत्री पंकजाताई मुंडे यांच्याहस्ते करण्यात आला.

लाभार्थ्यांना व विजेत्यांना प्रमाणपत्र वितरण
कन्या माझी भाग्यश्री योजनेच्या लाभार्थ्यांना यावेळी प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. याप्रसंगी दोन मुली असलेल्या प्रणाली अविनाश हिवाळे रा. सातगांव म्ह ता. बुलडाणा, श्रावणी दीपाली चव्हाण रा. डोंगरखंडाळा ता. बुलडाणा, रविना संजय पुंडीधोत रा. आडोळ खु ता. जळगावं जामोद, प्रणीता समाधान चौधरी गांगलगांव ता. चिखली यांना प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. मंत्री पंकजाताई मुंडे यांनी याप्रसंगी त्यांच्या मुलींना कडेवर घेऊन त्यांचे स्वागत केले. योजनेवर आधारित निबंध व वर्क्तृत्व स्पर्धेतील विजेत्यांना यावेळी बक्षीस वितरण करण्यात आले. वर्क्तृत्व स्पर्धेत सुवर्णा सुभाष परिहार रा. भालगांव ता. चिखली, रोशनी कैलास निकाळजे रा. खरबडी ता. मोताळा, श्रेजल सुधीर सांगळकर मेहकर यांना बक्षीस वितरण करण्यात आले. निबंध स्पर्धेत गायत्री काळे पिं. उंडा, वैष्णवी कैलास फाळके भोनगांव जा. शेगांव यांना बक्षीस वितरण करण्यात आले.
'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा