महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
महान्यूज बातम्यातील महाराष्ट्र
केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतला विविध योजनांचा आढावा शनिवार, ०९ फेब्रुवारी, २०१९

सोलापूर : जिल्ह्यातील अनुसुचित जाती, जमाती, विजाभज, इमाव व विमाप्र आदींना मिळणारा शासकीय योजनांचा लाभ जास्तीत जास्त तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवा, असे निर्देश राज्यमंत्री रामदास आठवले यांनी  बैठकीत दिले.  

शासकीय विश्रामगृहामध्ये आयोजित बैठकीस महात्मा फुले विकास महामंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ सरवदे, पोलीस अधीक्षक मनोज पाटील, महापालिका आयुक्त अविनाश ढाकणे, अप्पर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांच्यासह समाजकल्याण विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

केंद्रीय राज्यमंत्री आठवले यांनी सोलापूर जिल्ह्यातील भारत सरकार शिष्यवृत्ती प्राप्त अनुसूचित जाती, विमुक्त जाती भटक्या जमाजी, इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या शिष्यवृत्तीबाबत समाजकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेऊन त्यांना मार्गदर्शन केले. तसेच त्यांनी यावेळी जिल्ह्यातील अॅट्रोसिटी कायद्यांतर्गत सन 2015-16 ते जानेवारी 2019 पर्यंत शहरी व ग्रामीण भागात किती गुन्हे दाखल करण्यात आले व प्रलंबित गुन्ह्यातील प्रकरणांचा आढावा घेऊन अशा गुन्ह्यातील पीडितांना किती अर्थसहाय्य देण्यात आले, व अर्थसहाय्य न दिलेल्या प्रकरणांच्या त्रुटीबाबत माहिती घेऊन सविस्तर चर्चा केली.              

श्री.आठवले यांनी जिल्ह्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठीची शासकीय वसतीगृहे चालू स्थितीत असुन, किती बंद आहेत  तसेच चालू असलेल्या वसतीगृहांत मिळणाऱ्या सोयीसुविधा व वसतीगृहात शिकणाऱ्या विद्यार्थांना मिळणाऱ्या सुविधा व अनुदानाबाबत माहिती घेऊन मार्गदर्शन केले. श्री.आठवले यांनी महानगरपालिका क्षेत्रामध्ये रमाई आवास घरकुल योजनेंतर्गत मंजूर घरकुले, पूर्ण झालेली घरकुले, प्रगती पथावरील घरकुले, व अद्याप बांधकाम सुरु न झालेली घरकुले व त्यासाठी किती निधी प्राप्त झाला याबाबत सविस्तर चर्चा केली.

'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
Share बातमी छापा